अभिनयात विद्यार्थी घडविणारा संकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2022   
Total Views |

Sanket1
 
 
 
कलाकारांना घडविण्याचे काम ‘वेध अकादमी’च्या माध्यमातून डोंबिवलीतील संकेत ओक करीत आहेत. संकेत यांचा हा जीवनप्रवास कसा आहे, तो जाणून घेऊया.
 
 
 
संकेत ओक यांनी महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षाला असतानाच ‘वेध’ ही संस्था सुरू केली. त्यावेळी एकांकिकांद्वारे नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यानंतर २०११ मध्ये ५ ते १५ व १६ ते ५० वयोगटासाठी अभिनय व व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देणारी पूर्ण वेळ ‘वेध अ‍ॅक्टिंग अकॅडमी’ची स्थापना केली. आत्तापर्यंत ‘वेध अकॅडमी’मधून एक हजारांहून अधिक कलाकार घडले आहेत. विविध मालिका, चित्रपट, जाहिरात यात आता ‘वेध अ‍ॅक्टिंग अकॅडमी’चे कलाकार आपले नाणे खणखणीत वाजवत आहेत. संकेत ओक यांचा जन्म कल्याणचा. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर पेंढरकर महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली. मुंबई विद्यापीठाच्या ‘थिएटर आर्ट्स’ विभागामधून त्यांनी मास्टर्स केले. नाटकात पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले आहे.
 
 
 
लहानपणापासूनच वक्तृत्व स्पर्धेत संकेत ओक सहभागी होत होते. त्यांची आई त्यांच्याकडून वक्तृत्त्व स्पर्धेची तयारी करून घेत होती. त्यांनी शाळेत अनेक पारितोषिके मिळविली होती. त्यांच्या नाटकाची सुरुवात तशी शाळेत झाली. संकेत यांनी सातवीत असताना सोसायटीतील गणेशोत्सवात प्रथमत: नाटक केले होते. हे नाटक विनोदी होते. त्यात एका वृद्धाची भूमिका संकेत यांनी वठविली होती. त्यात त्यांनी पारितोषिकही मिळविले होते. गोष्ट सांगणे, संस्कृत कथाकथन, एकपात्री अभिनय यामध्येही अनेक बक्षिसे त्यांनी मिळविली होती. महाविद्यालयीन जीवनात संकेतच्या ‘थिएटर’च्या ‘करिअर’ला खरी दिशा मिळाली. ‘आयएनटी’ या मोठ्या स्पर्धेत संकेत यांनी सहभाग घेतला होता. लेखक शिरीष लाटकर यांची संहिता होती. त्यात मुख्य भूमिका संकेतची होती. त्यानंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून ते सहभागी होत होते. त्यावेळी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे, असा विचार त्यांच्या मनात आला. महाविद्यालयात हौस म्हणूनच नाटक सुरू झाले. पण पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना एका स्पर्धेत अभिनयात त्यांना पारितोषिक मिळाले होते. या स्पर्धेनंतर विद्यापीठाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम का करत नाही, असे एकाने त्यांना विचारले आणि मग त्यांनी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
 
 
 
हा अभ्यासक्रम झाल्यावर या क्षेत्रातच ‘करिअर’ करण्याचा विचार त्यांच्या मनात पक्का झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना लगेचच दोन मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये ‘चिमणी पाखरं’ नावाची सह्याद्रीवरची गाजलेली मालिका होती. अमोल कोल्हेंची ‘स्टार’वरील ‘राजा छत्रपती’ नावाची मालिकाही होती. या दोन्ही मालिकांमध्ये पदवीनंतर लगेचच त्यांनी काम केले होते. त्यामुळे अभिनयाकडे करिअर म्हणून निर्धाराने वळण्याआधीच करिअरला सुरुवात झाली होती, असे संकेत सांगतात. नाटकशास्त्रात एमए करत करत असताना वामन केंद्रे, पुरू बेर्डे, शफाअत खान, विजय केंकरे यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. पण अभिनय प्रशिक्षणासाठी ‘कलासंस्कार’च्या काळेबाईंनी त्यांना ‘श्री कलासंस्कार’ची शिबिरे घेशील का, असे विचारले होते. इथूनच त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. त्यांना दीपालीबाईंचा खूप मोठा पाठिंबा होता. शिबीर करण्यासाठी बाईंनी विश्वास दिला होता.
 
 
 
संकेत ‘कला संस्कार’ला साहाय्यक म्हणून जात होते. त्यानंतर स्मिता तळवळकरांच्या ‘अस्मिता अकॅडमी’, सुहास जोशींच्या ‘सुभाष अकॅडमी’ इथेही त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केलं. त्याबरोबरच एकांकिका, मालिकाही सुरू होत्या. नाटकांचीही सुरुवात झाली होती. आनंद म्हसेवकरच्या ‘कथा’ त्यांनी नाटकाला साहाय्य केले होते आणि नाटक या क्षेत्रातही संकेतचे पाऊल या ‘कथा’ नाटकाने पडले होते. वामन केंद्रेंचे ‘प्रिया बावरी’ हे नाटक संकेत यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. वर्ल्ड रेकॉर्ड या नाटकाने केले. एकाच दिवशी एकाच थिएटरला तीन वेगवेगळ्या भाषेत सलग तीन प्रयोग सादर केले होते. या नाटकाचे ‘फेस्टिवल शो’ अजून सुरू आहेत. नसिरूद्दीन शाह या नाटकांच्या प्रयोगासाठी उपस्थित होते. पुरूषोत्तम बेर्डे यांचे ‘२६/११ हाय अलर्ट’ नावाचे नाटकही संकेत यांनी केले. ‘आविष्कार’ संस्था मुंबई यांच्याकडे त्यांनी दोन नाटके केली होती. विजय केंकरे यांचे ‘सदू, सदूची बायको’ हे नाटकही त्यांनी केले होते. आनंद म्हसवेकरकडून त्यांनी व्यावसायिक नाटके केली आहेत. संकेत यांनी या काळात प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके केली.
 
 
 
संकेत यांनी आतापर्यंत पाच व्यावसायिक, ३२ प्रायोगिक, ५०हून अधिक एकांकिका केल्या आहेत. त्यानंतर ‘कास्टिंग’, ‘थिएटर डायरेक्शन’, ‘ट्रेनिंग’ला सुरुवात केली. तोपर्यंत अभिनयाचे काम जास्त सुरू होते. ‘वेध अकॅडमी’वर ‘फोकस’ केला. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अपघाताने आल्याचे संकेत यांनी सांगितले. ‘वेध अ‍ॅक्टिंग अकॅडमी’तून मुलांना मालिका किंवा कुठेही काम देऊ, असे पालकांना सांगितले जात नाही. पण अनेक मालिकांमध्ये कलाकार हवे असतील, तर ते ‘वेध’लाच संपर्क साधतात. विद्यार्थीही आपलं नाणं खणखणीत वाजवतात, असे संकेत यांनी सांगितले आहे. ‘वेध’चा ‘भटकंती’ म्हणून कार्यक्रम सुरू आहे. त्याला चांगले ‘व्ह्यू’ आहेत. चित्रपट दिग्दर्शन करण्याचा मानस आहे. दोन ‘शॉर्ट फिल्म्स’ आत्तापर्यंत दिग्दर्शित केल्या आहेत. संकेतसारख्या हरहुन्नरी कलाकाराला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
 
 
@@AUTHORINFO_V1@@