हेच त्यांचे पुरोगामित्व...!

23 Jan 2022 20:28:20

Sharad Pawar Amol Kolhe
 
 
 
 
शरद पवार यांचे म्हणणे की, “अमोल कोल्हेंनी कलाकार म्हणून नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे.” थोडक्यात, अमोल कोल्हेंना शरद पवार यांनी ‘क्लिन चीट’ दिली. त्यामुळे ‘नाना’ हा चित्रपट चित्रपटगृहात झळकू देतील का? जितेंद्र आव्हाड नेहमीप्रमाणे समर्थकांकरवी अमोल कोल्हेंना आपल्या बंगल्यावर बोलवून चौकशी करतील का, या शक्यता धुसर झाल्या आहेत. मात्र, काही लोकांचे म्हणणे आहे की, नाना मोदींना मारू शकतो. शिव्या देऊ शकतात किंवा जितेंद्र आव्हाड आपल्या पोषाखावर ‘सेव्ह गाझा’ लिहून गाझापट्टी इथे ठाण्या-मुंब्र्यात बसून रक्षण करतात, तर हे दोघे अमोल कोल्हेंच्या या कृत्याबद्दल नक्की काही तरी करतील. कारण, या दोघांना नथुराम गोडसेंचा भयंकर राग आहे म्हणे... मुद्दा असा की, कोणत्याही कलाकृतीला, साहित्याला विरोध करणारे ‘थर्डग्रेड’ लोक यांना इतिहासाशी, त्यातल्या घडामोडींशी काही देणेघेणे नसते. मग छत्रपती शिवाजी महाराज असू देत की, स्वातंत्र्यवीर सावरकर असू देत की, काही दशकांपूर्वीचे नथुराम गोडसे असू देत. या लोकांना केवळ राजकारण हवे असते. प्रश्न नथुराम किंवा गांधीजींच्या संदर्भातला नाही. प्रश्न आहे, साहित्य कलाकृतीला आपापल्या स्वार्थासाठी वापरणार्‍यांचा. आपल्या स्वत:च्या वैचारिक चौकटीत बंदिस्त करणार्‍यांचा. साहित्याचा विपर्यास करत भांडारकर फोडणार्‍यांचा आणि पुतळे हटवणार्‍यांचा आपल्याला फायदेशीर असणारी कलाकृती, कलाकार हे कसेही असले, तरी त्यांना अभय आणि विरोधी विचारांना समर्थन करणारे कलाकार आणि कलाकृती वाईट, ‘नॉटी’ वगैरे वगैरे... ही जी काही वैचारिक घाण आहे ना? त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर खरंच कलंक लागला आहे. आता तर काय सत्तेत बारामतीकरच आहेत, वांद्य्राचे साहेब आता कुठे ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येणार आहेत म्हणे. बाकी नाना पटोलेंचे ‘काँग्रेस उरलो केवळ हरण्यापुरता...’ तर अशा महाराष्ट्राच्या सत्ताधीशांकडून साहित्य आणि कलाकृतींच्या उत्थानाबाबत आशा बाळगणे म्हणजे स्वप्नरंजनच. त्यामुळे शेवटी एक प्रश्न आहे, अमोल कोल्हे भाजपशी किंवा रा. स्व. संघाशी संबंधित असते आणि त्यांनी जर नथुराम गोडसेंची भूमिका साकारली असती, तर समस्त पुरोगामी निधर्मी आणि तथाकथित गांधीवाद्यांनी कोणती भूमिका घेतली असती? याचे जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर उठलेले प्रश्नचिन्ह आहेत.
 
 
 
नेमके हेच नक्षल्यांना नको
 
गडचिरोली येथील इरपनार गावामध्ये नक्षल्यांनी १८ वाहने जाळली. सुरजागड प्रकल्प बंद करावा, अशी त्यांनी मागणी केली. जाळलेल्या वाहनांच्या जवळ या नक्षल्यांनी मोदी सरकारच्या विचारांच्या विरोधात प्रसार करा, अशा आशयाचे बॅनरही लावले. केंद्र सरकारच्या कारवायांनी अतिरेकी नक्षली खरेच हवालदिल झाले आहेत. दि. २२ जानेवारीच्या रात्री नक्षल्यांनी झारखंडच्या गिरीडोह येथे बराकर नदीचा मोठा पूल आणि मोबाईल टॉवर उडवून दिला. एक चिठ्ठी लिहिली, ज्यात लिहिले होते की कायदेशीर कारवाईत अटक झालेल्या नक्षली प्रशांत बोस आणि त्याच्या पत्नीला उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी. या गडचिरोली आणि झारखंडच्या घटना यासाठी मांडल्या की, या दोन्ही घटनांमधून नक्षल्यांची दुटप्पी आणि क्रूर मानसिकता दिसून येते. दुर्गम भागात राहणार्‍या बांधवांपर्यंत कोणत्याही सेवासुविधा पोहोचू नयेत, त्यांना विकासाचे, प्रगतीचे कोणतीही माध्यम उपलब्ध होऊ नयेत, यासाठी नक्षली या ठिकाणी हल्ले करतात. म्हणजे, दुर्गम भागातले गरीब लोक सुविधांअभावी मरूदेत. मात्र, या नक्षल्यांच्या साथीदारांना चांगल्या सुविधा पाहिजेत. बकासुराची जी कथा तीच नक्षल्यांची कथा. यांच्या टोळीसाठी गावातल्या एकेका घराने दररोज जेवण बनवायचे आणि त्यांची सेवा करायची. घरातल्या लेकीबाळींची तर खैर नसणारच. हे सगळे सुरळीत राहण्यासाठी नक्षल्यांना पोलीस, प्रशासकीय यंत्रणा नको असतात. त्यामुळे दुर्गम भागाला जोडणारे रस्ते, पूल, प्रशासकीय सेवा यांच्यावर नक्षली हल्ले करतात. त्यांचा प्रयत्न असतो की, सरकारी यंत्रणा इथपर्यंत येऊ नये. मात्र, या भागात येशूची दया सांगणार्‍यांचा प्रवेश ‘सुखेनैव’ सुरू असतो. या सगळ्या प्रकाराला मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आळा बसला. मोदी आणि पर्यायाने भाजप, रा. स्व. संघाच्या देशप्रेमी विचारांना लोकांचा पाठिंबा वाढू लागला.त्यामुळे मोदींच्या विचारांच्या विरोधात प्रसार करा, असे म्हणत क्रूर हिंसा करण्याची वेळ या नक्षल्यांवर आली आहे. मोदींच्या विचारांना विरोध आहे. कारण, मोदी म्हणतात, “भय-भूक-भ्रष्टाचारापासून देशाला मुक्त करायचे आहे.” नक्षल्यांना मोदी नकोत. कारण, ‘मोदी सब समाज को साथ लिए’ विकासाची संकल्पना मांडतात. नेमके हेच नक्षल्यांना नको आहे. त्यामुळेच तर हल्ले करून जळलेल्या वाहनांवर त्यांनी ‘बॅनर’ लावले की, मोदींच्या विचारांच्या विरोधात प्रसार करा.
 
 
९५९४९६९६३८
 
 
Powered By Sangraha 9.0