'मिशन बुलेटट्रेन'साठी मनमाडकरांची निवड!

23 Jan 2022 16:59:37

S.P.Thackeray
 
 
 
नाशिक : मनमाडच्या रेल्वे वर्कशॉपने कोकण रेल्वे, जम्मू काश्मीर रेल्वे यासह अतिदुर्गम भागांसाठीच्या रेल्वे पुलांचे सुटे भाग तयार केले आहेत. या क्षेत्रातील वर्कशॉपचा ११५ पेक्षाही अधिक वर्षांचा अनुभव आहे. वर्कशॉपची पुन्हा नवी ओळख निर्माण होणार असून इथले कर्मचारी एस.पी.ठाकरे यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी निवड झाली आहे.
 
 
 
देशभरात रेल्वे पूल, रेल्वेशी निगडित कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या मनमाड रेल्वे कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी कोकण रेल्वे, जम्मू काश्मीर रेल्वे यासह देशाच्या अतिदुर्गम भागातील रेल्वेचे पूल, विदेशातील अनेक रेल्वेचे पूल बनविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. जपान सरकारच्या सहकार्याने 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून हे काम होणार आहे. मनमाडचे ठाकरे हे या उपक्रमात सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करणार आहेत. जपान सरकारच्या सहकार्याने हे काम होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करण्याची संधी ठाकरे यांना मिळणार आहे. त्याचा उपयोग आगामी काळात देशातील इतर रेल्वे मार्गांसाठी होईल.
 
 
 
केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यात त्यांचा एनआरएमयू संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तिथले कर्मचारीही उपस्थित होते. मनमाडचा रेल्वे कारखाना ब्रिटिशांच्या काळातील असून या कारखान्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. बुलेट ट्रेन हायस्पीड असल्याने या ट्रेनच्या निर्मितीत व पुलांच्या निर्मितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सदर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करण्याची संधी या नमित्ताने ठाकरे यांना मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी मनमाडच्या रेल्वे कर्मचाऱ्याचा सहभाग वर्कशॉपच्या नावलौकिकात भर पाडणार आहे .
 
 
Powered By Sangraha 9.0