‘बिहू’ : आसामचा अत्युच्च आनंदाचा सण

    22-Jan-2022
Total Views |
bhogi.jpg

आसाममध्ये ‘बिहू’ हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ‘बिहू’ हा भारताच्या आसाम राज्यातील तीन महत्त्वांच्या आसामी सणांचा एक संच आहे. एप्रिलमध्ये साजरा केला जातो तो ‘रोंगाली’ किंवा ‘बोहाग बिहू’, ऑक्टोबरमध्ये येतो ‘कोंगली’ किंवा ‘काटी बिहू’ आणि आता म्हणजे जानेवारीमध्ये आसाममध्ये ‘भोगली’ किंवा ‘माघ बिहू’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.



‘रोंगाली बिहू’ हा तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाचा सण. आपण जो वसंतोत्सव साजरा करतो ना, त्याचंच हे आसामी स्वरूप! ‘भोगाली बिहू’ किंवा ‘माघ बिहू’ हा एक कापणीचा सण आहे. या दिवसात कापण्या होऊन धनधान्य शेतकर्‍यांच्या घरात आलेलं असतं, येत असतं. त्यामुळे थंडीत शेकोटी पेटवून त्याभोवती नृत्य, खेळ, वेगवेगळे पदार्थ बनवणे, सामुदायिक मेजवान्या झोडणे असा आनंद ‘भोगाली बिहू’च्या निमित्ताने गावागावांत, घरोघरी साजरा केला जातो. आणि तिसरा ‘कोंगाली बिहू’ किंवा ‘काटी बिहू’ हा अत्यंत कमी खर्चाचा हंगाम प्रतिबिंबित करणारा काटकसरीचा सण आहे.


‘बिहू’ हा शब्द ‘देवरी’ (बोरो-गारो भाषा) शब्द ‘बिसू’ वरून आला आहे. ज्याचा अर्थ ‘अत्यानंद’ असा होतो. ‘बिहू’चे मूळ रूप ‘चुटिया’, ‘सोनोवाल कचारी’ आणि ‘देवरी’ जनजातीय समाजांत एकसमानच आहे. ‘सादियाल कचारी’ म्हणून ओळखले जाणारे हे गट सादियाच्या प्राचीन राज्याचे भाग होते. बोडो-कचारींच्या इतर शाखा ज्यात ‘बोरो’, ‘दिमासा’, ‘राभा’, ‘तिवा’ इत्यादी जनजातीय समुदायांचा समावेश आहे, ते देखील प्राचीन काळापासून ‘बिहू’ हा सण साजरा करत आहेत. बोरो लोक त्यास ‘बैसागु’ म्हणतात, तर ‘दिमासा’, ‘तिवा’ आणि ‘राभा’ अनुक्रमे ‘बुशू’ किंवा ‘बुशू दिमा’, ‘पिसू’, ‘दुमसी’ म्हणतात.



स्थानिक लोककथांमध्ये, असे म्हटले जाते की, ‘बोर्डोसी’ला (बोडो भाषेत ‘बर्दाई सिखला’) (आसामीमध्ये उत्तर-पश्चिमी वारे) ही देवता पृथ्वीची मुलगी होती. तिने एका दूरच्या वराशी लग्न केले. बोर्डोसीला वसंत ऋतूमध्ये वर्षातून एकदा तिच्या आईच्या घरी जाते. इथे ‘बिहू’ची सुरुवात असते आणि काही दिवसांनी परत आपल्या सासरी निघून जाते. तेव्हा ‘बिहू’च्या समाप्तीचे संकेत असतात. आसाममध्ये या काळात जोरदार वारे वाहतात. असं कशाला, सगळ्या भारतातच या काळात वारे वाहत असतात. गुजरातचा पतंगोत्सव याच काळात तर साजरा करतात ना आणि वसंताच्या सुरुवातीला आसामात जे वारे वाहतात, ते काही प्रमाणात नुकसानही करतात. त्यामुळे ही पृथ्वीकन्या देवता परत सासरी चालली की, वार्‍याला दुःख होते आणि तो वेगात वाहतो नुकसान करतो, असे समजले जाते. यानंतर पुढे वसंत ऋतू सुरु होतो. ‘बोर्डोसीला’हा शब्द बोडो भाषेतील ‘बोर्डाई सिखला’ वरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘वादळाची मुलगी’ (‘सिखला’ म्हणजे मुलगी आणि ‘बर्दाई’ म्हणजे वादळ). ‘बैसागु’ दरम्यान बोरो (बोडो) लोकांमध्ये याच नावाचे एक नृत्यदेखील केले जाते, ज्यात ‘बोडो-कचारी’ गटांमधील ‘बिहू’च्या उत्पत्तीविषयी कथा गुंफल्या आहेत.



इंग्रजी वर्षाच्या जानेवारी महिन्यात हिंदी कालगणनेप्रमाणे मोजला जाणारा माघ महिना येतो. म्हणून हा सण ‘माघ बिहू’ म्हणून ओळखला जातो. मकरसंक्रांतीचं हे अस्सल आसामी रूप. या दरम्यान आठवडाभर विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे. त्यामुळे या प्रसंगी भरपूर खाद्यपदार्थ तयार केले जातात आणि खाल्ले जातात, त्यामुळे याला ‘माघ बिहू’ सोबत ’भोगली बिहू’ असेही म्हणतात. हा सण मेजवानी आणि बोनफायर्सने चिन्हांकित केला जातो. तरुण लोक तात्पुरत्या झोपड्या बांधतात, ज्यांना ‘मेजी’ किंवा ‘भेलाघर’म्हणून ओळखले जाते. बांबू, काटक्या, छोटीमोठी लाकडे, गळलेली पाने यांवर चुली पेटवून भेलाघरमध्ये ते मेजवानीसाठी अन्न तयार करतात आणि नंतर दुसर्‍या दिवशी सकाळी या झोपड्या जाळून टाकल्या जातात. या उत्सवांमध्ये ‘टेकली भोंगा’ (भांडे फोडणे) आणि रेड्यांची झुंज यांसारखे पारंपरिक आसामी खेळदेखील आहेत. ‘माघ बिहू’ उत्सव मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ‘पूह’ (पौष) महिन्याच्या शेवटच्या दिवशी सुरू होतो, सामान्यतः ‘पूह’ची २९ तारीख १४ जानेवारी असते. आदल्या रात्री ‘उरुका’ (‘पूह’ची २८ तारीख), जेव्हा लोक आगीभोवती जमतात, रात्रीचे जेवण बनवतात. सगळी रात्र आनंदात साजरी करतात. आधुनिक काळानुसार ‘माघ बिहू’ हा एकच दिवस साजरा करतात. पूर्वी हा सण संपूर्ण माघ महिना चालत असे. ‘माघ बिहू’चा पहिला दिवस ‘उरुका’ किंवा ‘बिहू संध्या’ म्हणून ओळखला जातो. ‘उरुका’ हा शब्द मूलतः ‘देवरी-चुटिया’ भाषेतील ‘उरुकुवा’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ समाप्त होणे असा होतो. कापणीचा हंगाम आणि पौष महिना संपला, असे यातून सुचित केले जाते.



या दिवशी स्त्रिया चिरा, पिठा, नारळाचे आणि तिळाचे लारू (लाडू), दही अशा खाद्यपदार्थांसह दुसर्‍या दिवसाची तयारी करतात. रात्रीच्या वेळी जी मेजवानी आयोजित केली जाते, त्याला ‘भुज’ म्हणतात.(संस्कृत शब्द भोजनापासून व्युत्पन्न). विविध जनजातीय समुदाय तांदळाची दारू तयार करतात. त्यांची वेगवेगळी नावेही आहेत. ‘चुटिया’ समाजात बनवली जाते ती ‘चुजी’, तर ‘ताई-अहोम’ समाजात ‘नाम-लाओ’ बनते. बोडो लोकांच्या दारूला ‘झू’ म्हणतात तर मिशिंग लोक ‘आपाँग’ बनवतात. ‘उरुका’ मेजवानी कौटुंबिकही असते किंवा बरेच लोक कधीकधी अख्खा गाव एकत्र येऊन ही मेजवानी करतात. मेजवानीच्यानंतर भेलाघर नावाच्या झोपडीसदृश वास्तूतच लोक रात्री राहतात. बरेचदा गावातील तरुण गावकर्‍यांच्या अंगणातून चोरून भाजीपाला आणतात आणि तोच या मेजवानीसाठी वापरण्याची परंपरा आहे. आपल्याकडे नाही का, होळीसाठी लाकडं चोरून आणायची पद्धत आहे!! तरुण मुलांच्या चावटपणा करण्याच्या नैसर्गिक इच्छेचा विचारही आपल्या साध्यासुध्या सणांमध्ये किती खुबीने केला आहे... रात्री हा कार्यक्रम पार पडला की, ‘बिहू’चा दिवस पहाटे ‘मेजी’ नावाच्या समारंभाने सुरू होतो. यामध्ये, शेतात शेकोटी पेटवून लोक त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळावे म्हणून प्रार्थना करतात.



‘मेजी’ हा शब्द ‘देवरी-चुटिया’ भाषेतील शब्द ‘मिडी-ये-जी’ वरून आला आहे. जेथे ‘मिडी’ म्हणजे ‘पूर्वजांचे देव’, ‘ये’ म्हणजे ‘आग’ आणि जी म्हणजे उडणे, पूर्वजांच्या आत्म्यांचे आवाहन करून त्यांची प्रार्थना केली जाते. लोकपरंपरेप्रमाणे शेकोटी लावण्यापूर्वी आंघोळ करतात. ‘मेजी ज्वालुवा’ (मेजी पेटवून देणे) हा विधी खूप आनंददायी आहे. ‘भोरल’ आणि ‘मेजी’ची पूजा चिकन, पिठा (तांदुळाचा विशिष्ट प्रकारचा केक), तांदुळाची दारू, ‘चिरा’, ‘अखोई’, ‘होरूम’, दही आणि इतर खाण्याचे पदार्थ देऊन केली जाते. सगळ्यात शेवटी, भेलाघर जाळले जाते. यानंतर लोक ‘मह-कराई’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशेष पदार्थाचे सेवन करतात. ते तांदूळ, काळे हरभरे भाजून त्यांच्या मिश्रणापासून बनवतात. न्याहारी आणि दुपारच्या जेवणात, लोक विविध पारंपरिक पदार्थ जसे की, विविध मासे, चिकन, डुकराचे मांस, बदक, मटण करी तसेच भात आणि तांदूळ खातात. मेजी शेकोटी आणि भेलाघरच्या राखेचा उपयोग बागेची किंवा शेताची सुपीकता वाढवण्यासाठी झाडे आणि पिकांमध्ये केला जातो.असा हा ‘बिहू’ अनुभवायला एकदा तरी आसामला जायलाच हवं.. नाही का?

-  अमिता आपटे