नवी दिल्ली : ‘ऑक्सफॅम इंडिया’, ‘कॉमन कॉज’, ‘जामिया मिलिया इस्लामिया’, ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अॅण्ड लायब्ररी’, कोलकातास्थित ‘सत्यजित रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’, ‘इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूट’ (आयएमए) आणि ‘इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर’ (आयआयसीसी) या सहा हजार संस्थांना ‘एफसीआरए’ कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या संख्येने संस्था आणि संघटनांना यादीतून काढून टाकण्याचे कारण म्हणजे संस्थांनी परदेशी निधी मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज केलेला नसणे अथवा केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या अर्जाचे नूतनीकरण न करणे, हे आहे. त्याचप्रमाणे आता ६ हजार, ३ संस्था काढून टाकल्यामुळे देशातील ‘एफसीआरए’ नोंदणीकृत संस्थांची यादी २२ हजार, ८३२ वरून १६ हजार, ८२९ एवढी झाली आहे.
परवाना रद्द झालेल्या संस्थांमध्ये ‘हमदर्द एज्युकेशन सोसायटी’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (हौज खास), ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ (आयआयपीए), ‘नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मनी’, ‘दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’, ‘गोवा फुटबॉल असोसिएशन’, ‘प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’, ‘द लेप्रा इंडिया ट्रस्ट’ आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (कोलकाता), ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ (आयएमए), ‘इमॅन्युएल हॉस्पिटल असोसिएशन’, ‘ट्युबरक्युलासिस असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘विश्व धर्मायतन’, ‘महर्षी आयुर्वेद प्रतिष्ठान’, ’राष्ट्रीय महासंघ फिशरमेन्स को-ऑपरेटिव्हज लिमिटेड’, ‘भारतीय संस्कृती परिषद’, ‘डीएव्ही कॉलेज ट्रस्ट आणि मॅनेजमेंट सोसायटी’, ’गोदरेज मेमोरियल ट्रस्ट’ आदींचा समावेश आहे.