मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राने कोरोनाचे नियम पाळायला हवेत, असे आवाहन जनतेला करत आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या काही नेत्यांकडून त्यांच्या या आवाहनाला दाद देत नसल्याचे स्पष्ट दिसून आले. ओमिक्रोनच्या भीतीने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते का? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. तर, इकडे अंधेरीमधील डी. एन. नगरमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या मैदानावरच मालवणी जत्रोत्सव सुरु असल्याचे समोर आले.
अंधेरीतील डी. एन. नगरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच भरवलेल्या मालवणी जत्रोत्सवाला तुफान गर्दी झाल्याचे दिसून आले. इथे कुठल्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. यावरून आता भाजप आक्रमक होत, शिवसेनेच्या कार्यक्रमांना कोरोनाच्या नियमांचे बंधन नाही का? असा सवाल विचारला आहे.
"मुंबईत अंधेरी येथील डी एन नगर येथे शिवसेनेच्या कार्यक्रमांना कोरोनाच्या नियमांचे बंधन नाही आहे का? बीएमसीने कोरोनाच्या नियमात बदल केले आहेत का? मुंबईत कोरोना वाढला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची जबाबदारी कोण घेणार?" असे सवाल भाजपकडून करण्यात आले आहेत.
कोरोनाचे नियम आणि १४४ कलम हा फक्त सामान्य मुंबईकरांनाच लागू आहेत का? शिवसैनिकांना वेगळे नियम आहेत का? असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जात आहे.