नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आता निवृत्तीची घोषणा केली आहे. २०२२ हा तिचा शेवटचा हंगाम असल्याचे तिने जाहीर केले आहे. गेले काहीकाळ सानियासाठी चांगला राहिलेला नसून साजेशी अशी कामगिरी तिला टेनिसमध्ये करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत भारताची सानिया आणि युक्रेनची नादिया किचनोक यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर तिने ही घोषणा केली आहे.
सानिया मिर्झाने म्हंटले आहे की, "२०२२ हा हंगाम माझ्या कारकिर्दीतील शेवटचा हंगाम असेल. मी प्रत्येक आठवड्याला पुढची तयारी करत आहे. पण मी पुढचा संपूर्ण हंगाम खेळेन का नाही, याचीही खात्री नाही. मी आणखी चांगली खेळू शकते, पण शरीर साथ देत नाही, हे माझ्यासाठी दु:खदायक आहे." सानिया ही भारतीय टेनिसमधील सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून ओळखली जाते. आत्तापर्यंत तिने ६ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यामध्ये ३ महिला दुहेरीत तर ३ मिश्र दुहेरीत हे जेतेपद पटकावली आहेत.