अहंमन्यता: खेळाडूसाठी एक दुधारी अस्त्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2022
Total Views |

sports
खेळाच्या रणांगणात, मग तो खेळ कुठलाही असेल, आत्मविश्वासाचे सातत्य अत्यंत महत्त्वाचे. या आत्मविश्वासाच्या एका ध्रुवबिंदूवर खेळाडूत त्याच्या सक्षमतेबद्दल आत्मविश्वास दिसत नाही, तर दुसऱ्या ध्रुवबिंदूवर खेळाडूत एकप्रकारची निराधार अजिंक्यपणाची अहंमन्यता दिसून येते. आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की, ही दोन्ही ध्रुवाची टोके खेळाडूसाठी सुदृढपणाचे किंवा आश्वासकतेचे लक्षण नाही. हाच जो आत्मविश्वासाचा सलग मार्ग आहे, त्यावर विशेष समतोल साधणं महत्त्वाचं ठरतं. खेळ असो वा इतर काही असो, आत्मविश्वासाचा परिणाम कुणीही नाकारणार नाही. आपण खेळाडूचे उदाहरण घेऊ. दुसऱ्या जागतिक युद्धात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांनी सुंदर भाष्य केले आहे. ते म्हणतात, “मी जणू माझ्याच नियतीच्या संगतीने चालत होतो आणि गतजन्मातसुद्धा मी याच महायुद्धाच्या घडीसाठी जे काही करायला पाहिजे ते सारे करत होतो.” या त्यांच्या भाष्यात टीपेला पोहोचलेला अहंमन्यतेचा दर्प दिसतो. तरीही तो विकृत वाटत नाही. कारण, ते खरंच ब्रिटनचे पंतप्रधान झाले. त्यांनी आपली या जन्माची मनीषा सम्राटाच्या थाटात पूर्ण केली. त्यांची अदम्य व असीमित ऊर्जा आणि कुणालाही हरकत घेता न येणारा करारीपणा, यामुळे इतर लोकांना त्यावेळी त्यांच्याबरोबर काम करता येणे सुलभ नव्हते. तरीही या घडीला आपल्याकडे हाच एकमेव माणूस आहे, या सत्याकडे कुणाला दुर्लक्ष करता आले नाही. अर्थात, राजकीय वर्तुळात ही एकमेवाद्वितीय हस्ती अपवादात्मक असते आणि तो आकाशातल्या अढळ ध्रुव ताऱ्यासारखी राहते. खेळात मात्र अपवादानेच तसे होते. कारण,आजपर्यंत विराजमान झालेली पूर्वीची रेकॉर्ड्स तोडणे, हे स्पर्धात्मक खेळाचा आणि खेळाडूंच्या पेशाचा एक नैसर्गिक भाग आहे. अहंकार किंवा अहंमन्यता हे खेळाडूंच्या जगात दुधारी शस्त्र आहे. चुकीच्या जागी आणि चुकीच्या प्रमाणात अहंकार विध्वंसक आणि हास्यास्पद ठरतो, तर योग्यक्षणी आणि योग्य प्रमाणात हाच अहंकार प्रशंसनीय आणि विरेचित ठरतो. खरंतर खेळाडूंना तो थाटात शोभतो. इमरान खान हा एकेकाळचा सुप्रसिद्ध गोलंदाज आणि आपल्या ‘मूड’प्रमाणे फलंदाजीही उत्तम करायचा. त्याच्या चालण्या-बोलण्यात एकप्रकारचा विलक्षण आकर्षक असा ताठा दिसून यायचा. आपल्या खेळाडूंकडे तो कुत्सितपणे वा हेटाळणीच्या दृष्टीने पाहतो, असे अनेक भारतीयांना वाटायचे आणि आपण सगळेच त्याला शिव्या हासडायचो. आज हे खिलाडी त्याच अहंमन्यतेने पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून विराजमान आहेत. परंतु, आता त्यांच्या या अहंकारी स्वभावाची चांगलीच खिल्ली उडवली जाते.
 
क्रीडाजगतात खेळाडूचा ताठा किंवा अभिमान वा अहंकार सकारात्मक भावना समजली जाते आणि ती यशासाठी आवश्यकही समजली जाते. या खेळाडूंची जेव्हा अमाप प्रशंसा केली जाते, त्यांच्याकडून यशाची खात्री मिळवली जाते, त्यांनी मिळवलेल्या यशाचे सार्वजनिक समारंभात जल्लोषपूर्वक स्वागत केले जाते, तेव्हा खेळाडूंनाही जाणवते की, ते इतरांपेक्षा ‘लय भारी’ आहेत. यश हे स्वाभिमान वर्धित करते आणि आत्मविश्वास जोपासते. स्वाभिमान, दबदबा आणि काही प्रमाणात अहंमन्यता या गोष्टी यश मिळवण्यासाठी खात्रीलायक समजल्या जातात. पूर्वीचे सुप्रसिद्ध बेसबॉल ‘हॉल ऑफ फेम’ खेळाडू डॉन सटॉन नेहमी म्हणत असत की, “प्रत्येकाने आपण जे काही करतो, त्यात खास रस घ्यावा. त्याबद्दल अभिमान बाळगावा आणि आपल्याकडून त्यात योग्य ती भर घालावी.” अनेक प्रगल्भ खेळाडूंच्या मते हा जो खेळाचा ताठा जो काही खेळाडूंकडे असतो, त्यात आत्मविश्वास, आंतरिक ऊर्जा यांसारख्या अनेक गोष्टी अंतर्भूत आहेतच, पण त्यात जीवनाला कलाटणी देणारी आंतरिक शिस्त आहे. त्यात एक मोक्याच्या क्षणी उत्त्थान करणारा आंतरिक छुपा आवाज आहे; जो सांगतो, “चल उठ, तयार हो आणि तुझा सर्वोत्तम खेळ दाखव! तुला आज या खेळासाठी जितके जास्त देता येईल तितके तू देऊन टाक! तुझी भूमिका पार पाड. जबाबदारीने वाग!” या ताठ्यात अहंमन्यता जेव्हा खेळासाठी उत्तम दर्जाचा आदर ठरते, आपल्या ‘लिग’साठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी ओतप्रेत प्रेम आणि इमान असते, तेव्हा इतिहास घडतो. एका व्यक्तीची त्याच्या खेळापेक्षा अधिक पटीने उंची वाढते. त्या खेळाच्या वलयापलीकडे जाऊन खेळातले एक नेतृत्व घडते. हा खेळाडू स्वकेंद्रित यशाच्या सीमेपलीकडे जाऊन त्या नावेचा खऱ्या अर्थाने नाविक बनतो, अशा खेळाडूकडून पराभूत होताना प्रतिस्पर्ध्याला आणि प्रतिपक्षालासुद्धा आपला सन्मान झाला आहे, असं वाटतं. असे खेळाडू जे आपले सर्वस्व आपल्या खेळात आणि कौशल्यात ओततात तेव्हा ते पराजित झाले तरीही ते जेत्याच्या यशाची अनुभूती घेतात. कारण, ‘दे हॅव्ह डन देअर बेस्ट’ त्या ताठ्यात किंवा अहंकारात वाळवंटातही हिरवाई आणता येईल, अशी विशुद्ध सृजनशीलता आहे.
- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@