गोरेगावमध्ये 'रेडिओ काॅलर' लावलेल्या बिबट्याचे दर्शन; वनविभागाने पटवली ओळख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2022
Total Views |
leopard



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोरेगाव पूर्व येथीव गोकुळधाम परिसरातील इमारतीच्या आवारात रविवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाले. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या बिबट्याच्या गळ्यात रेडिओ काॅलर असल्याचे निदर्शनास आले. यावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून या बिबट्याची ओळख पटवण्यात आली असून संशोधकांकडून या बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत असल्याची स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीला लागूनच गोकुळधाम परिसर आहे. या परिसरातून यापूर्वीही बिबट्याचा वावर समोर आला आहे. गेल्या आठवड्यात शनिवार आणि रविवारच्या रात्री या परिसरात एक बिबट्या पुन्हा फेरफटका मारुन गेला. त्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बिबट्याच्या गळ्यात रेडिओ काॅलर लावल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, "व्हिडिओमध्ये दिसणारा बिबट्या हा मादी असून तिचे नाव डेल्टा आहे. वनविभाग आणि संशोधकांची टीम याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहे आणि घाबरण्यासारखे काहीही नाही. वनविभागाच्या पथकांना परिसरात गस्त घालून जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."


 
गेल्यावर्षी गोरेगावच्या आरे वसाहतीमध्ये मानव-बिबट्या संघर्ष चिघळला होता. या संघर्षामध्ये नऊ व्यक्तींवर बिबट्याचा हल्ला झाला होता. हा संघर्ष थोपवण्यासाठी वन विभागाकडून दोन मादी बिबट्यांना पकडण्यात आले. या संघर्षाला एक मादी कारणीभूत असल्याचे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या मादीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या मादीला सोडण्यापूर्वी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गळ्यात रेडिओ काॅलर सोडण्यात आले. तिचे नाव डेल्टा असे ठेवण्यात आले. सोडल्यानंतर या मादीने आरेपासून येऊर वनपरिक्षेत्रांपर्यंत स्थलांतर केले. तिथून ही मादी पुन्हा आरे वसाहतीमध्ये परतली. तेव्हापासून ही मादी आरे दुग्धवसाहत आणि चित्रनगरी परिसरात वावरत आहे.


@@AUTHORINFO_V1@@