कर्णधारपदासाठीच्या अपेक्षा

17 Jan 2022 22:50:42

Virat
 
 
 
 
भारतीय पुरुष क्रिकेट संघात कर्णधारपदावरून सुरू झालेल्या वादाचा पेच गेल्या काही दिवसांपासून सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. कर्णधारपद, विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील वाद हे चित्र आता नित्यनियमाचे झाले असून, यावर आता कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींकडून करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या प्रकारानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे (बीसीसीआय) आता कसोटी क्रिकेटसाठीही नव्या कर्णधाराची नियुक्ती करण्याचे आव्हान आहे. यासाठी सध्या अनेक खेळाडूंच्या नावांची पडताळणी सुरू आहे. कर्णधारपदासाठी रोहित शर्माचे नाव सध्या आघाडीवर असून, लोकेश राहुल आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांचीही नावे चर्चेत आहेत. कर्णधारपदाची माळ ‘बीसीसीआय’ नेमक्या कोणत्या खेळाडूच्या गळ्यात घालणार, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. परंतु, ‘बीसीसीआय’पुढे मुख्य आव्हान असणार, ते म्हणजे दीर्घकालीन कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्वपद सांभाळण्याच्या दृष्टीने एखाद्या खेळाडूची निवड करणे. कारण, कसोटी क्रिकेट म्हणजे संयमाचा खेळ. या प्रकारात तेच खेळणारे खेळाडू यशस्वी ठरतात, जे संयमाने मैदानावर अनेक वेळापर्यंत टिकून राहाण्याचे ध्येय ठेवतात. त्यामुळे अशा प्रकारच्या खेळासाठी संघातील कर्णधारपदही एका जबाबदार खेळाडूकडे सोपविण्याची गरज आहे, जेणेकरून आगामी काळात कसोटी क्रिकेटचे महत्त्व टिकून राहाण्यास मदत होईल. परदेश दौर्‍यादरम्यान वारंवार अपयश येत असल्याच्या नैराश्येतून २०१४ साली महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. धोनीने नेतृत्वपदाचा त्याग करताना कसोटी क्रिकेटच्या प्रकारामधूनही निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर विराट कोहलीकडे संघाच्या नेतृत्वपदाची धुरा सोपविण्यात आली. सात वर्षांनंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराट आणखी काही काळ कसोटी क्रिकेटच्या नेतृत्वपदाची धुरा सांभाळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या नैराश्येतून त्यानेही तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पुढचा पर्याय शोधण्याची वेळ ‘बीसीसीआय’वर आली आहे.
 
 
 
खेळाडूच्या भूमिकेची अग्निपरीक्षा
क्रिकेटमधील तिन्ही प्रकारच्या सामन्यांमधून कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली हा खेळाडू म्हणून आगामी काळात संघात कायम राहणार आहे. कसोटी, ‘टी-२०’ आणि एकदिवसीय अशा तिन्ही प्रकारांमध्ये विराट कोहली हा भारतीय पुरुष क्रिकेट संघामध्ये एका वरिष्ठ खेळाडूची भूमिका बजावताना येत्या काळात आपल्याला दिसणार आहे. जवळपास सात वर्षांहून अधिक काळापर्यंत संघाचे नेतृत्व केल्यानंतर पुन्हा एकदा संघामध्ये खेळाडूच्या भूमिकेत सुरुवात करणे म्हणजे विराटसाठी देखील ही एक अग्निपरीक्षाच ठरणार आहे. ‘यशस्वी कर्णधार ते पुन्हा संघातील खेळाडू’ असा प्रवास आता विराटला करावा लागणार असून, त्याची पुढील वाटचाल ही सोपी नसल्याचे अनेक क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. सर्वात आधी विराटला दडपणातून सावरण्याची गरज असून, त्याने याआधी स्वतःसाठीकाही वेळ देण्याची गरज असल्याचे परखड मत समीक्षकांनी मांडले आहे. एक खेळाडू म्हणून विराट आजही संघात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विराटने खेळाडू म्हणून भारताला अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला असून, त्याचे योगदान न विसरण्यासारखे आहे. म्हणूनच कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतरही विराटने या दडपणातून सावरत एक यशस्वी खेळाडू बनण्याकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे. महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदी असताना एक खेळाडू म्हणून विराटची जी यशस्वी कारकीर्द होती, ते वलय पुन्हा प्राप्त करण्यासाठी विराटने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी त्याने भारतीय संघातील माजी खेळाडूंचा आदर्श घेण्याची गरज आहे. कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आदी सर्व वरिष्ठ आणि मातब्बर खेळाडूंनादेखील एकेकाळी कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागल्याचा इतिहास आहे. परंतु, या सर्व खेळाडूंनी पुन्हा संघात खेळाडू म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आपली कारकीर्द यशस्वीरित्या गाजवली. त्यामुळे विराटने या सर्वांपासून प्रेरणा घेण्याची गरज असून, भारतीय संघासाठी एक उत्तम खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली असल्याचे जागतिक दर्जाच्या क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. विराट या परीक्षेत नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही तमाम भारतीयांना आहे.

- रामचंद्र नाईक
 
Powered By Sangraha 9.0