रायगड, कुलाबा किल्ल्यानंतर थेट मंदिरात अनधिकृत ‘मजार’!

17 Jan 2022 17:12:38

majar
 
 
 
नाशिक : गड-किल्ल्यांवर अनधिकृत मजार बांधण्याचे प्रकार उघडकीस येत असतानाच थेट मंदिरातच मजार बांधण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील पत्रमहर्षी नारद मुनींच्या पुरातन मंदिरातील गाभार्‍यात मजार उभारण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काही जिहादी प्रवृत्तीच्या कट्टरपंथीयांकडून जागा बळकाविण्यासाठी अशा प्रकारचे षड्यंत्र रचले जात असून, याविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रायगडावर अशाच प्रकारे अनधिकृत मजार उभारण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आल्यानंतर याविरोधात कारवाई करण्यात आली होती. अलिबाग येथील कुलाबा किल्ला परिसरातही अशाच प्रकारे अनधिकृतरित्या मजार उभारण्यात आली होती. त्यानंतर आता थेट मंदिरातच मजार उभारण्याचे धाडस करत दोन धर्मांमध्ये जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कारस्थान काही धर्मांधाकडून रचण्यात आल्याचा आरोप होत आहे.
 
 
 
पत्रमहर्षी नारदमुनींचे नेवासा येथील हे भारतातील एकमेव मंदिर आहे. महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांपैकी हे एक म्हणून सर्वत्र प्रचलित असून, एक स्फूर्तीदायक स्थळ म्हणूनही ते ओळखले जाते. समुद्रमंथनाच्यावेळी निघालेल्या अमृतकणाला वाचविण्यासाठी भगवान विष्णूंनी याच ठिकाणी मोहिनी अवतार घेतल्याचा इतिहास आहे. त्यावेळी नारदमुनींनी केलेल्या मदतीप्रती धन्यवाद व्यक्त करण्याच्या दृष्टीने स्वतः भगवान विष्णूंनीच हे मंदिर उभारल्याची आख्यायिका सांगितली जाते. याच पौराणिक आख्यायिकेमुळे केवळ महाराष्ट्रातील नव्हेच, भारतभरातून अनेक नागरिक या स्थळाला भेटी देत असतात. या प्राचीन मंदिरामुळेच नेवासाचे नावही जगाच्या नकाशावर उमटले गेले आहे.अशा प्राचीन मंदिरांमध्ये गड- किल्ल्यांच्या परिसरांमध्ये धर्मांधांकडून होणारे अतिक्रमण हा काही नवीन विषय नाही. पर्यटनाच्या दृष्टीनेही अशा स्थानांचे महत्त्व असून याठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. त्यामुळे येथील मंदिर परिसरात काही जिहादी प्रवृत्तीच्या कट्टरपंथीयांकडून अनधिकृत मजार उभारण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.
 
 
 
जिहादी प्रवृत्ती वेळीच ठेचावी, अन्यथा...
नेवासा येथील नारदमुनींच्या मंदिरात मजार उभारण्याची हिंमत महाराष्ट्रातील कट्टरपंथीयांकडून कशी काय होते? सध्याच्या मविआ सरकारचे नेतृत्व करणार्‍या शिवसेनेची वैचारिक सुंथा झाल्यामुळेच अशा जिहादी प्रवृत्ती महाराष्ट्रात फोफावत आहेत. शासनाने याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी; अन्यथा अशा जिहादी मानसिकतेला ठेचण्यासाठी हिंदू समाजाला मैदानात उतरावे लागेल.
- मोहन सालेकर, महामंत्री, विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांत
 
 
Powered By Sangraha 9.0