मुंबईकरांना दिलासा ; कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम

17 Jan 2022 23:18:26
 
corona
 
 
 
मुंबई : मागील काही दिवसांपासून अस्थिरतेच्या टप्प्यावर असलेली मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत चालली आहे. बुधवार, दि. १२ जानेवारीपासून घटत जाणारी रुग्णसंख्या सोमवार, दि. १७ जानेवारी रोजी थेट ६ हजारापर्यंत येऊन ठेपली आहे. दरम्यान, मुंबईतील कमी होत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकर आणि पालिका प्रशासन मात्र सुटकेचा निःश्वास टाकत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
सोमवारी शहरात एकूण ५ हजार ९५६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची सध्याची संख्या सुमारे ५०,७५७ इतकी आहे. सोमवारी मुंबईत बारा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी मुंबईत सुमारे १५ हजार ५५१ बाधितांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्याने मुंबईतील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ३५ हजार ९३४ वर पोहचली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर ५५ दिवसांवर आला असून रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत एकूण ४७ इमारती सील केल्या आहेत.
 
 
ऑक्सिजन बेडवर उपचार सुरु असलेल्या रुग्णांची सोमवारची संख्या : ४५
उपलब्ध आयसीयू बेड्सची संख्या : ३,१७६
उपलब्ध व्हेंटीलेटर्सची संख्या : १,५७३
उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या : १२,२८२
मुंबईतील एकूण चाचण्या : १,४६,७०,१०४
१७ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या चाचण्या : ४७,५७४
Powered By Sangraha 9.0