मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना मनसेचा 'हा' इशारा

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांविरुद्ध मनसे नेते संदीप देशपांडे यांचे ट्विट

    दिनांक  14-Jan-2022 13:28:11
|

MNS Sandip deshpande
 
 
मुंबई : महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक आणि मोठ्या अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता मनसेदेखील मैदानात उतरली आहे. काही दुकानदार यावर सहमत आहेत, तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'मनसे स्टाईल' उत्तर देऊन एक इशाराच दिला आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केले की, "ज्या व्यापारांचा मराठी पाटी ला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?" असा सूचक इशाराच दिला आहे.
 
 
 
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गुरुवारी या मुद्द्यावरुन विरोध करणाऱ्यांना इशारा दिला होता. महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे.तसेच याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. हे संपूर्ण श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि महाराष्ट्र सैनिकांनी केलेल्या आंदोलनाचे आहे, असे म्हणत कुणीही यातून राजकारण करण्याचा आचरटपणा करू नये, असे कडक शब्दांत सुनावले आहे. तसेच मराठी पाट्यांच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.