६७ लाख देऊनही नाही मिळाले तिकीट ; बसप नेत्याचा दावा

उत्तर प्रदेश पोलिसांसमोर नेत्याने फोडला टाहो

    दिनांक  14-Jan-2022 15:47:43
|

arshad rana
नवी दिल्ली : एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांच्या पूर्वीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तर बहुजन समाज पक्षाच्या तिकीट वाटपानंतर पक्षातील एक अजब किस्सा समोर आला आहे. पक्षात सुरु असलेल्या तिकीट विक्रीचे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहचले आहे. चरथावल विधानसभा मतदारसंघाचे बसप प्रभारी अरशद राणा मुझफ्फरनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पोहचून ६७ लाख देऊनही तिकीट दिले नसल्याचे आरोप केले. यावेळी प्रभारी निरीक्षक आनंद देव मिश्रा तक्रार करताना ते चक्क धाय मोकलून रडायला लागले.
 
 
बसप नेता अरशद राणा यांनी यावेळी सांगितले की, "१८ डिसेंबर २०१८ रोजी जिल्ह्याच्या मुझफ्फरनगरमधील जिल्हा कार्यालयात जिल्ह्यातील विधानसभा जागांचे प्रभारी नेमले जाणार होते. याच्या एक-दोन दिवस आधी बसपचे पश्चिम उत्तर प्रदेश प्रभारी शमशुद्दीन राईन यांनी आश्वासन दिले होते की मला चारथावल विधानसभा जागेसाठी उमेदवार म्हणून नियुक्त केले जाईल. यासाठी त्यांना काही पैसे द्यावे लागतील, त्यासाठी मी होकारही दिला होता."
 
 
अरशद राणा यांनी पुढे म्हंटले आहे की, "विधानसभा मतदारसंघात उमेदवार नेमण्यासाठी ४ लाख ५० हजार रुपये आणि नंतर ५० हजार रुपये घेण्यात आले. यानंतर १५-१५ लाखांचे तीन हप्ते घेण्यात आले. यानंतरही सतपाल कटारिया आणि नरेश गौतम यांच्या उपस्थितीत पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी शमशुद्दीन राईन यांनी थोडे-थोडे १७ लाख रुपये घेतले. चरथावल विधानसभेच्या जागेवर तुमची उमेदवारी करण्यात आली असून तुम्ही मनापासून काम करू असा पूर्ण विश्वास त्यांनी दिला."
 
 
पुढे जिल्हाध्यक्षांवर आरोप करताना त्यांने म्हंटले की, "आता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर मी बसपाचे जिल्हाध्यक्ष सतीश कुमार यांना चरथावल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी पक्षाकडून तिकीट मागितले, तेव्हा त्यांनी तुम्हाला आणखी ५० लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल, असे सांगितले. पण असे असतानाही सलमान सईदला चरथावल विधानसभेचे उमेदवार घोषित करण्यात आले."
 
 
बसपा नेते अरशद राणा यांच्या तक्रारीवरून निरीक्षक आनंद देव मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना अरशद राणा म्हणाले की, 'जर न्याय मिळाला नाही तर लखनऊ येथील बसपा कार्यालयात जाऊन आत्महत्या करेन', असे वक्तव्य केले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.