२ लाखांचे २४ हजार कोटी रुपये : ‘बायजू’ची बिझनेस गाथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2022   
Total Views |

Byju's
 
 
‘डिजिटल’ उद्योगाची भाषा आत्मसात करत आज अनेक तरुण आपले उद्योग-व्यवसाय उभारत आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक उद्योगापेक्षा हे ‘डिजिटल’ उद्योग झपाट्याने वाढत आहेत. पारंपरिक उद्योजकांना कोटींची उड्डाणे घेण्यास जिथे कित्येक वर्षे लागली, तिथे हे ‘डिजिटल’ उद्योजक काहीच वर्षांत अरबपती झालेले दिसून येतात. अशाच काही अरबपती ‘डिजिटल’ उद्योजकांपैकी एक आहे बायजू रवींद्रन, ‘बायजूज’चे संस्थापक!
दि. १२ जानेवारीला संपूर्ण देशात ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा ‘युवा दिन’ म्हणून साजरा होतो. जगात खऱ्या अर्थाने आज भारतात युवाशक्ती आहे. भारतीय लोकसंख्येच्या २२ टक्के संख्या ही तरुणांची आहे. हा वर्ग १८ ते २९ वयोगटातला आहे. सध्या भारताचे सरासरी आयुर्मान काढले, तर ते २९ आहे, ज्यामुळे जगात भारत सर्वांत तरुण देश म्हणून ओळखला जात आहे. अशा या तरुण देशाची उद्योजकीय भाषादेखील तरुण झालेली आपल्याला दिसून येते. ही भाषा आहे ‘डिजिटल.’ ‘डिजिटल’ उद्योगाची भाषा आत्मसात करत आज अनेक तरुण आपले उद्योग-व्यवसाय उभारत आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक उद्योगापेक्षा हे ‘डिजिटल’ उद्योग झपाट्याने वाढत आहेत. पारंपरिक उद्योजकांना कोटींची उड्डाणे घेण्यास जिथे कित्येक वर्षे लागली, तिथे हे ‘डिजिटल’ उद्योजक काहीच वर्षांत अरबपती झालेले दिसून येतात. अशाच काही अरबपती ‘डिजिटल’ उद्योजकांपैकी एक आहे बायजू रवींद्रन, ‘बायजूज’चे संस्थापक!
 
बायजू रवींद्रनचा जन्म १९८० मध्ये केरळमधील अझिकोडे या किनाऱ्यावरील गावातील एका मल्याळी कुटुंबात झाला. हे एक संयुक्त कुटुंब होतं, ज्यामध्ये बायजूचे काका, आत्या आणि त्यांची मुलेही राहत होती. त्याचे आईवडील दोघेही शिक्षक होते. त्यांच्या वडिलांचे नाव रवींद्रन आहे. त्यांच्या आईचे नाव शोभनवल्ली. बायजूचे वडील सेवानिवृत्त भौतिकशास्त्राचे शिक्षक आहेत आणि आई गणिताची निवृत्त शिक्षिका आहे.
 
बायजू रवींद्रन अझिकोडे येथील स्थानिक मल्याळम माध्यम शाळेत शिकला, जिथे त्याचे आईवडील दोघेही शिक्षक होते. त्यानंतर बायजूने कालिकत विद्यापीठाच्या कन्नूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ची पदवी प्राप्त केली.
 
लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड होती. शालेय आणि महाविद्यालयाच्या दिवसात तो क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस खेळत असे. त्याचे आईवडील त्याला नेहमी वेगवेगळ्या खेळांसाठी प्रोत्साहन देत असत आणि खेळाचे महत्त्व पटवून देत. मात्र, बायजू खेळाच्या मागे धावला नाही. वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडवायचे त्याने ठरवले होते. त्याने ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ होण्याचा निर्णय घेतला. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, बायजूला एका बहुराष्ट्रीय ‘शिपिंग फर्म’मध्ये ‘सर्व्हिस इंजिनिअर’ म्हणून नोकरी मिळाली. या नोकरीमुळे त्याला जगभरात प्रवास करण्याची संधी मिळाली.
 
बायजू एक हुशार विद्यार्थी होता. एमबीए करणाऱ्या बायजूच्या काही मित्रांनी बायजूला अभ्यासात मदत करण्याची विनंती केली. बायजू गणितात खूप हुशार होता आणि आपल्या मित्रांना तो शिकवू लागला. एक गंमत म्हणून त्यानेदेखील परीक्षा दिली. अंतिम परीक्षेत १०० टक्के गुण मिळाल्यावर तो स्वत: थक्क झाला. त्याचे विस्मयचकित करणारे निकाल पाहिल्यानंतर, त्याच्या मित्रांनी बायजूला ‘कोचिंग क्लास’ सुरू करण्याचा सल्ला दिला.
 
मित्रांचा सल्ला पठ्ठ्याने मान्य केला. उच्च पगाराच्या नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे कोचिंग क्लास सुरू केले. बायजूने आपल्या जवळच्या मित्राच्या घराच्या गच्चीवर विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली आणि इथूनच बायजूचा यशस्वी उद्योजक बनण्याचा प्रवास सुरू झाला.
 
सुरुवातीला बायजू फक्त एमबीएच्या विद्यार्थ्यांनाच शिकवायचा. नंतर बायजूने पूर्णवेळ ‘कोचिंग क्लास’ चालवायला सुरुवात केली. तो विद्यार्थ्यांना आठवडाभर मोफत शिकवत असे. जसजशी विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली, तसे बायजूने २०११ मध्ये ‘बायजू’ (थिंक अ‍ॅण्ड लर्न प्रायव्हेट लिमिटेड) या नावाने‘ एज्युकेशन टेक्नोलॉजी फर्म’ सुरू केली. त्याच्या काही विद्यार्थ्यांनी ‘आयआयएम’मधून नुकतेच पदवी शिक्षण पूर्ण केले होते. त्या मुलांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामग्री तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले.
 
कालांतराने बायजूने त्यांचा वर्ग गच्चीवरून वर्गात हलवला. अवघ्या दोन लाख रुपयांपासून त्यांनी कोचिंग क्लास सुरू केला. बायजूने ‘कॅट’साठी ‘ऑनलाईन-व्हिडिओ’-आधारित शिक्षण कार्यक्रम सुरू केला अशाप्रकारे बायजूने शिकवणीत तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांची ‘कोचिंग’ची पद्धत इतकी लोकप्रिय होती की, एक काळ असा होता की, बायजू रवींद्रन यांच्याकडे मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू आणि चेन्नईसह विविध राज्यांमध्ये २० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी होते.
 
२०१५ मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘बायजू- दी लर्निंग अ‍ॅप’ हे त्यांचे प्रमुख उत्पादन सुरू केले. हे लर्निंग मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यासाठी चार वर्षे लागली. पुढे ‘कॅट’, राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET), नागरी सेवा परीक्षा, पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (GMAT), संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE), आणि ग्रॅज्युएट रेकॉर्ड परीक्षा (GRE) साठीदेखील लर्निंग अ‍ॅप तयार केले. लर्निंग अ‍ॅपचा उद्देश चौथी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी देणे हा होता. बायजूने ते प्रभावी तसेच मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला.
 
‘बायजू लर्निंग मोबाईल अ‍ॅप’ जसे लोकप्रिय झाले तसे त्याच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. त्याच्या ‘लर्निंग अ‍ॅप’मध्ये साडे तीन लाखांपेक्षा जास्त वार्षिक ‘सबस्क्रिप्शन’ होते, जे दररोज सरासरी ४० मिनिटे ‘लर्निंग अ‍ॅप’ वापरत आणि सहा दशलक्षांहून अधिक ‘डाऊनलोड’ करत. ‘बायजूज’चे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन भारतातील दोन हजारांहून अधिक महानगरे आणि लहान शहरांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहे.
 
बायजूने अलीकडेच ‘ट्युटर विस्ता’ आणि ‘एड्युराईट’ या ‘ऑनलाईन ट्युटरिंग’ ब्रॅण्डची खरेदी केली आहे. २०१९ मध्ये, बायजू भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा अधिकृत प्रायोजक बनला.
 
मोहनदास पै आणि रंजन पै यांनी २०१३ मध्ये ‘बायजूज क्लासेस’मध्ये ५० कोटी रुपये गुंतवले. ‘बायजूज’मधील ही पहिली गुंतवणूक होती. बायजू हे आशियातील एकमेव स्टार्टअप आहे, ज्याला मार्क झुकरबर्गने निधी दिला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये बायजूला ‘चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्ह’कडून ५० दशलक्ष डॉलर मिळाले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी डॉ. प्रिसिला यांची ही संस्था आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, एप्रिल २०२१ मध्ये बायजूने ७,३०० कोटी रुपयांच्या कराराने ‘आकाश एज्युकेशन सर्व्हिस’ विकत घेतली. त्यानंतर सिंगापूर आणि कॅलिफोर्निया येथील कंपन्या अनुक्रमे ४,५०० कोटी आणि ३,७०० कोटी रुपयांना विकत घेतल्या. २०२१ मध्ये निव्वळ १५ हजार कोटी रुपये कंपन्या खरेदी करण्यासाठी वापरले गेले. ‘आयआयएफएल वेल्थ हुरुन’ने श्रीमंत भारतीयांची यादी प्रसिद्ध केली. यात बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती २४ हजार, ३०० कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे.
 
शैक्षणिक अ‍ॅप बनविल्यानंतर, ‘बायजू’चा महसूल २०११-१२ मध्ये चार कोटी रुपये, २०१२-१३ मध्ये १२ कोटी रुपये, २०१३-१४ मध्ये २० कोटी रुपये असा वाढत २०१६-१७च्या आर्थिक वर्षात हे प्रमाण २६० कोटी रुपये झाले होते. सध्या, बायजूकडे ७०० हून अधिक ‘प्रॉडक्ट डेव्हलपमेंट’ टीम, २०० ‘कंटेन्ट क्रिएटर’ जे ‘कंटेन्ट’ विकसित करतात. मनोरंजक व्हिडिओ बनवण्यासाठी १५० ‘क्रिएटिव्ह’ मीडिया टीम आणि १०० पेक्षा जास्त तंत्रज्ञानसंबंधी टीम कार्यरत आहे.
 
निव्वळ ११ वर्षांत २ लाख रुपये ते २४ हजार कोटी रुपये हा बायजू रवींद्रनचा प्रवास थक्क करणारा आहे, खऱ्या अर्थाने हा ‘डिजिटल’ भारताचा परिणाम आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@