हिंदुत्वासह विकासाचे ‘योगी मॉडेल’

    दिनांक  14-Jan-2022 12:10:08   
|

Yogi Adityanath
 
 
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. मात्र, तोपर्यंत त्यांची ओळख गोरखपूरचे खासदार आणि गोरक्षनाथ पिठाचे महंत एवढीच मर्यादित होती. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘हिंदुत्वासह विकास’ हे मॉडेल यशस्वी करून दाखविले. यापूर्वी गुजरातमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते मॉडेल यशस्वी केले होते.
 
 
गतवेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाची तीन प्रमुख कारणे सांगता येतात. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी मांडलेला राष्ट्रवाद, केंद्र सरकारच्या उज्ज्वला, शौचालय, जन-धन आदी योजनांची झालेली यशस्वी अंमलबजावणी आणि प्रादेशिक पक्षांसोबत भाजपने केलेली युती! गतवेळच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात ३१२ जागा भाजपला अगदी सहजतेने प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हाच एकमेव प्रबळ चेहरा भाजपकडे होता. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. मात्र, तोपर्यंत त्यांची ओळख गोरखपूरचे खासदार आणि गोरक्षनाथ पिठाचे महंत एवढीच मर्यादित होती. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘हिंदुत्वासह विकास’ हे मॉडेल यशस्वी करून दाखविले. यापूर्वी गुजरातमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते मॉडेल यशस्वी केले होते.
 
 
योगी आदित्यनाथ यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात शासन-प्रशासन चालविण्यासोबतच हिंदुत्व अधिक मजबूत करण्याचेही काम केले. कोणतीही लाज अथवा संकोच न बाळगता, मुख्यमंत्री झाल्यानंतरही भगवी वस्त्रे परिधान करण्यासोबतच राज्यात अधिकाधिक गुंतवणूक खेचून आणणे, बहुराष्ट्रीय उद्योगांना राज्यात प्रस्थापित करणे, पायाभूत सुविधांचा वेगवान विकास करणे, सर्वदूर रस्त्यांचे जाळे विणणे आदींमुळे योगी आदित्यनाथ यांनी आपला जनाधार अनेक पटींनी वाढविला आहे.
 
त्यामुळे आज उत्तर प्रदेशात भाजप स्वबळावर मजबूत बनलेला पक्ष ठरला आहे. उत्तर प्रदेशसारख्या अतिशय मोठ्या आणि राजकीय वैविध्याने भरलेल्या राज्यात मजबूत पक्षसंघटन असणे आणि तेवढाच मोठा जनाधार असणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळेच भाजप आज उत्तर प्रदेशात अन्य तीन पक्षांचे आव्हान अतिशय सहजतेने पेलताना दिसत आहे. अर्थात, भाजपच्या लोकप्रियतेस गळती लागल्याचे दावेही केले जात आहेत. गेल्या काही दिवसांत सत्ताधारी भाजपमधून बाहेर पडलेल्या मंत्री, आमदारांमुळे तसे वाटणे साहजिक आहे. त्यापैकी स्वामीप्रसाद मौर्य यांची सर्वाधिक चर्चा होताना दिसते. काही उत्साही मंडळींनी तर मौर्य यांना राजकीय हवामान तज्ज्ञाचीही उपाधी बहाल करून टाकली आहे (जी उपाधी दिवंगत रामविलास पासवान यांनी अगदी सार्थ ठरविली होती!)
 
मात्र, बसपामधून भाजपमध्ये आलेल्या आणि आता सपामध्ये गेलेले स्वामीप्रसाद मौर्य खरोखर भाजपला फटका देतील का, याचे उत्तर मात्र नकारात्मक आहे. कारण, आज राजकीय हवामान तज्ज्ञ बनलेल्या मौर्य यांना बसपामध्ये असताना २००९, २०१२ आणि २०१४ साली बसपाच्या झालेल्या दुर्दशेचाअंदाज लावता आला नव्हता. त्यानंतर, २०१६ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचे खरे कारण म्हणजे बसपातून हकालपट्टी होण्याचा त्यांना आलेला अंदाज. भाजपने मौर्य यांना पक्षात घेण्याचे कारण म्हणजे रायबरेली जिल्ह्यातल्या डलमऊ ऊंचाहार परिसरामध्ये मौर्य यांचा बऱ्यापैकी असलेला जनाधार, त्याचा लाभ भाजपला २०१७ सालच्या निवडणुकीत व्यवस्थिपणे झाला. मात्र, त्या निवडणुकीत ऊंचाहारमधून आपल्या पुत्रास विजयी करणेही मौर्य यांना जमले नव्हते, ते विसरून चालणार नाही. त्यात आता मौर्य ज्या समाजवादी पार्टीमध्ये जाण्याची तयारी करीत आहेत, त्या समाजवादी पार्टीचे अतिशय मजबूत संघटन ऊंचाहार क्षेत्रात आहे. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात जनाधार असलेले जवळपास डझनभर नेते पक्षात आहेत, ज्यांचा स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासोबत ३६चा आकडा आहे. त्यामुळे मौर्य यांच्या समाजवादी पार्टी प्रवेशामुळे कदाचित सपाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे, मौर्य असो अथवा भाजपमधीलच काही असंतुष्ट असो, त्यांच्या नाराजीचा भाजपला मोठा फटका बसेल, असे समजणे हे अतिशय भाबडेपणाचे आहे.
 
दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी विधानसभा निवडणूक अयोध्येतून लढविण्याची तयारी चालविली असल्याची चर्चा आहे. सध्या उमेदवार ठरविण्यासाठी उत्तर प्रदेश भाजप आणि केंद्रीय भाजप नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या उमेदवारीविषयी येत्या एक ते दोन दिवसांत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी जर अयोध्येतून विधानसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले, तर भाजपसाठी ते अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
 
योगी यांची अयोध्येतून निवडणूक लढवणे हे स्थानिक समीकरणे, धार्मिक पैलू आणि राजकीय परिणाम यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रीरामजन्मभूमीसह अयोध्येतील सर्व महत्त्वाची धार्मिक स्थाने या मतदारसंघामध्ये येतात. गोरक्षपीठाचे महंत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपचे विद्यमान आमदार वेदप्रकाश गुप्ता यांनी या जागेवर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. योगी यांनी येथून निवडणूक लढविल्यास गुप्ता यांनी हा मतदारसंघ सोडण्याचीही तयारी दाखविली आहे.
 
महंत दिग्विजयनाथ यांच्या काळापासून अयोध्या हा गोरखपूर आणि अवधचा दुवा आहे. महंत दिग्विजयनाथ, महंत अवैद्यनाथ आणि आता योगी आदित्यनाथ हे श्रीराम मंदिर आंदोलनात सक्रिय आहेत. योगींनी अयोध्येतून निवडणूक लढविली, तर एकप्रकारे आपल्या गुरूंचे स्वप्न साकारत असल्याचा संदेश संपूर्ण पूर्वांचल पट्ट्यात जाण्याची स्पष्ट शक्यता आहे. त्याचप्रमाणे योगी यांनी येथून निवडणूक लढविल्यास त्याचा प्रभाव अवध क्षेत्रातील गोंडा, बलरामपूर, बहराइच, बाराबांकी, संत कबीर नगर, कुशीनगर या जिल्ह्यांमधील मतदारसंघांवर पडेल. कारण, सध्या याच प्रदेशातील भाजपच्या असंतुष्टांनी पक्षांतर केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविल्यामुळे पूर्वांचलमध्ये जसा भाजपचा प्रभाव वाढला; अगदी तसाच प्रभाव योगी आदित्यनाथ यांच्या अयोध्येतील उमेदवारीमुळे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात जातीय समीकरणे बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बसपा यांच्या रणनितीवर ‘हिंदुत्व’ हे प्रभावी ठरण्याची सर्वाधिक शक्यता आहे. तसे झाल्यास ‘हिंदुत्वासह विकास’ हे मॉडेल अधिक बळकट होणार, यात कोणतीही शंका नाही.
 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ही केवळ त्या राज्यापुरती मर्यादित नसते, तर संपूर्ण देशाच्या राजकारणावर त्याचा परिणाम होत असतो. यंदाची निवडणूक देखील त्याला अपवाद नाही. लोकसभेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, त्यामुळे प्रत्येक पक्ष उत्तर प्रदेशला महत्त्व देतो. महिन्याभरात सुरू होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीने आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला आहे. एवढेच काय, तर राष्ट्रीय म्हणवणाऱ्या; मात्र प्रत्यक्षात पुणे महसूल विभागापुरते प्राबल्य असलेल्या, राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही तब्बल एक जागा लढविण्याचे ठरविले आहे. त्यासोबतच दरवेळी निवडणूक आयोगाच्या तिजोरीत अनामत रकमेची भर घालण्यासाठी शिवसेनाही ५० वगैरे जागा लढविण्याची शक्यता आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या झंझावातापुढे हे पक्ष कितपत टिकतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.