गृहसुरक्षेसाठी हवा गृह विमा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2022   
Total Views |

home insurance
 
 
इतर विम्याच्या प्रकारांप्रमाणेच, पण भारतात फारसा प्रचलित नसलेला प्रकार म्हणजे गृह विमा. तेव्हा या विमाविषयी सर्वंकष माहिती देणारा हा लेख...
 
 
स्वत:चे, हक्काचे घर असावे, असे बहुतेकांचे स्वप्न असते. पण हे घर आग, नैसर्गिक आपत्ती, पडझड यापासून सुरक्षित राहावे व जर घराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचली, तर झालेल्या आर्थिक नुकसानीची काही प्रमाणात भरपाई व्हावी म्हणून घराचा विमा उतरविणे, हा एकच पर्याय उपलब्ध आहे. घराला हानी पोहोचेलच हे कशावरून? घराला हानी पोहोचण्याचे प्रमाण कितीसे आहे? उगाच घराचा विमा उतरवून, ‘प्रीमियम’ची रक्कम कशासाठी भरायची, असा विचार करणारेही बरेच भारतीय आहेत. पण, हा विचार चुकीचाही ठरू शकतो. कारण, संकटे काही सांगून येत नाहीत. कर्ज काढून, स्वत:चा पैसा घालून विकत घेतलेले घर किंवा बांधलेले घर यांच्या संरक्षणाला, सुरक्षितेला महत्त्व द्यायलाच हवे.
 
घराच्या विम्यात घराबरोबर घरातील वस्तूंनाही संरक्षण मिळू शकते. याशिवाय कोणलाही जर घरांच्या वस्तूंसाठी वेगळी विमा पॉलिसी घ्यावयाची असेल, तर तीही मिळू शकते. या पॉलिसीला ‘हाऊसहोल्ड पॉलिसी’ असे म्हणतात.
 
बऱ्याच विमा कंपन्यांच्या बऱ्याच प्रकारच्या ‘गृह विमा पॉलिसी’ उपलब्ध आहेत. यातील कोणत्या कंपनीची ‘पॉलिसी’ विकत घ्यावी, याबद्दल ‘पॉलिसी’ घेणाऱ्यांच्या मनात संंभ्रम निर्माण होऊ शकतो. या ‘पॉलिसी’ सार्वजनिक उद्योगातील चार कंपन्यांही विकतात, तसेच खासगी कंपन्याही विकतात. पण, ‘पॉलिसी’ घेणाऱ्यांचा कल हा मुख्यत्वे सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांकडून ‘पॉलिसी’ घेण्याकडे असतो. ही ‘पॉलिसी’ घेताना ज्या बाबी विचारात घ्यायच्या, त्या पुढीलप्रमाणे- घराच्या वास्तूला किंवा त्यातील वस्तूंचे नुकसान झाले, त्या खराब झाल्या, तर त्यांना गृह विमा पॉलिसीतून नुकसानभरपाई मिळू शकते. घरमालक स्वत: घर किंवा बंगला वापरत असेल, तर तो हा विमा उतरवू शकतो, तसेच भाड्याने राहणारा भाडेकरुदेखील हा विमा उतरवू शकतो. या पॉलिसीत दोन प्रकारचे संरक्षण मिळते. उभ्या असलेल्या वास्तूस भूकंप, पूर, ढगफुटी, दरड कोसळणे इ. नैसर्गिक कारणांमुळे हानी पोहोचली, तर नुकसानभरपाई मिळू शकते. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, जडजवाहर, सोने-चांदी, फर्निचर इत्यादी वस्तूंमध्ये बिघाड झाला, त्या नादुरुस्त झाल्या, उपयोग करण्यायोग्य राहिल्या नाहीत, तर यांची नुकसानभरपाईही मिळू शकते.
 
तुम्ही जे संरक्षण घ्याल, त्यानुसार ‘प्रीमियम’ भरावा लागतो. मोबाईल फोनसाठी स्वतंत्र पॉलिसी घेण्याचा पर्यायही हल्ली उपलब्ध आहे. मोबाईल हरवला, चोरीला गेला, तुटलाफुटला वगैरे त्यावेळी नुकसानभरपाई मिळू शकते. चोरी झाल्यामुळे विम्याचा दावा करायचा असेल, तर त्यासाठी पोलिसात केलेल्या तक्रारीची कागदपत्रे जोडावी लागतात. नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीसाठी दावा करावयाचा असेल, तर त्यासाठी सरकारी यंत्रणेमार्फत झालेल्या पंचनाम्याची कागदपत्रे जोडावी लागतात.
 
 
तुमचे घर कुठे आहे, यावर तुम्ही कोणत्या प्रकारचे संरक्षण घ्यावे, हे ठरते. तुमचे घर हे चिपळूणसारख्या पूरग्रस्त भागात, डोंगराच्या पायथ्याशी, भूकंपप्रवण विभागात आहे का, हे मुद्दे हा विमा उतरविताना महत्त्वाचे ठरु शकतात. चोरीबाबत म्हणाल तर भारतात कुठेही चोरी होऊ शकते. त्यामुळे चोरी, डाका, घरफोडी, लूटमार कुठेही होऊ शकते. तुमचे घर जर समुद्राजवळ असेल, तर तुम्हाला ‘इलेक्ट्रॉनिक’ वस्तूंचा विमा उतरवावयासच हवा. कारण, त्या समुद्राच्या खाऱ्या हवेमुळे गंजून वरेचवर खराब होतात. हल्ली जगभरात वादळांचे प्रमाण फार वाढले आहे. विकासाच्या नावाखाली मानव जो निसर्गावर अन्याय करीत आहेत, त्यामुळे वादळांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे वादळापासून होणाऱ्या नुकसानीचे ‘कव्हरेज’ही पॉलिसीत समाविष्ट असावे.
 
घराचा प्रकार
 
गृह विमा उतरविताना घराचा प्रकार ही बाबही महत्त्वाची ठरते. घर अपार्टमेंटमध्ये आहे, भूखंड आहे, बंगला आहे की भाड्याच्या घरात वास्तव्य आहे, तेही पाहणे महत्त्वाचे. कारण, या प्रत्येक प्रकारात जोखीम वेगवेगळी असते. त्यामुळे संरक्षणाचा प्रकारही वेगवेगळा असतो. तुमचा प्रॉपर्टीचा वापर किती यावर ‘प्रीमियम’ची रक्कम ठरते. वापर जास्त असेल, तर जोखीम जास्त असते. गॅस बरोबर बंद केला नाही, गॅस ‘लिकेज’ असेल, वायरिंग जुने असेल, घरात गळती असेल, अशाप्रकारच्या जोखीम जास्त असतात. कार्यालये, फॅक्टरी, गोदामे यांना रहिवासी घरांपेक्षा जास्त ‘प्रीमियम’ आकारला जातो.
 
‘प्रॉपर्टी’चे वय
 
जर ‘प्रॉपर्टी’ जुनी असेल, तर जोखीम जास्त. परिणामी, जास्त ‘प्रीमियम’ आकारला जातो. आपल्या देशात निकृष्ट बांधकामामुळे नव्या इमारती कोसळण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे शक्यतो नामांकित बांधकाम उद्योजकाकडून ‘प्रॉपर्टी’ विकत घ्यावी.
 
 
‘प्रॉपर्टी’चा वस्तूंच्या मूळ मूल्यातून घसारा मूल्य कमी करुन, विम्याचा दावा संमत केला जातो. हा विमा घेताना जो अर्ज भरावा लागतो, त्यात खरीखुरी व अचूक माहिती भरावी. ‘प्रॉपर्टी’ कितव्या मजल्यावर आहे? अचूक ‘बिल्ट-अप’ एरिया किती आहे? आतमध्ये किती सामना आहे? त्यांचे मूल्य, ते सामान विकत घेतानाची त्यांची बिले, सोने-चांदी, जडजवाहर यांचे अचूक वजन, त्यांची बिले, सध्याच्या किंवा चालू दराने त्यांचे मूल्य, याची जर योग्य माहिती विमा कंपनीला दिली तर ते सर्वोत्कृष्ट संरक्षण देऊ शकतात. चुकीची माहिती दिली किंवा माहिती लपविली, तर दावा संमत होताना अडचणी निर्माण होऊ शकतात. अचूक माहिती देण्यामुळे, विम्याच्या ‘प्रीमियम’ची रक्कम वाढत असेल तर वाढू द्या. ती भरा, पण खोटी किंवा चुकीची माहिती देऊन स्वतःचेनुकसान करून घेऊ नका. जशी जीवन विम्याच्या व आरोग्य विम्याच्या भरलेल्या ‘प्रीमियम’वर प्राप्तिकर सवलत मिळते, तशी या ‘प्रीमियम’वर मिळत नाही. प्रत्येक पॉलिसीत ‘एक्सक्लुजन’(Exclusions) असतात. म्हणजे ज्या कारणांसाठी दाव्याची रक्कम संमत होणार नाही, त्यांना ‘एक्सक्लुजन’ म्हणतात. या पॉलिसीत काय काय ‘एक्सक्लुजन क्लॉज’ आहेत, याची माहिती ‘पॉलिसी’धारकास असावयास हवी. स्वतःहून मुद्दाम किंवा रागाच्या भरात ‘प्रॉपर्टी’ची नासधूस केली, तर अशा वेळी दावा संमत केला जात नाही.
 
युद्ध, ज्वालामुखी (भारतात याचा विशेष प्रभाव नाही) कालवा, धरण, पाण्याचा साठा यांना भेग पडून झालेली गळती, दूषित हवामानामुळे झालेले नुकसान याबाबी बहुतेक कंपन्या ‘एक्सक्लुजन’मध्ये टाकतात. जर ‘एक्सक्लुजन’मधली बाब तुम्हाला तुमच्या ‘पॉलिसी’त समाविष्ट करुन घ्यावयाची असेल, तर काही कंपन्या अतिरिक्त ‘प्रीमियम’ आकारुन, ‘पॉलिसी’धारकास ती सुविधा देतात. तुम्हाला जर तुमच्या मूळ ‘पॉलिसी’च्या ढाँच्यात काही ‘अ‍ॅडस्-ऑन’ क्लॉजेस समाविष्ट करुन घ्यायचे असतील, तर काही कंपन्या ती सवलत अधिक ‘प्रीमियम’ आकारुन देतात. ‘अ‍ॅड-ऑन’मध्ये तुम्ही ‘पोर्टेबल’ (वाहून नेता येणारी) ‘इलेक्ट्रॉनिक’ उपकरणे ती म्हणजे कॅमेरा, ‘ऑडिओ-व्हिज्युअल’ उपकरण, ‘डायगनॉस्टिक’ व वैद्यकीय उपकरणे, अंगावर असणारे दागिने, अतिरेक्यांपासून नुकसान झाल्यास त्याचे संरक्षण, भाडेकरुंनी भाडे थकविल्यास त्यापासूनचे संरक्षण या बाबी जास्त ‘प्रीमियम’ भरून मूळ पॉलिसीत ‘अ‍ॅड-ऑन’ म्हणजे समाविष्ट करता येऊ शकतात. काही पॉलिसीत वरील सर्व संरक्षणे ‘अ‍ॅड-ऑन’ करता येतील. काही ‘पॉलिसीं’त यापैकी काही समाविष्ट करण्यात येत असतील, काही ‘पॉलिसीं’त यापैकी एकही संरक्षण ‘अ‍ॅड-ऑन’ करता येत नसेल. हे सर्व प्रत्येक ‘पॉलिसी’वर/‘पॉलिसी’च्या प्रकारावर अवलंबून असते. त्यामुळे ‘पॉलिसी’ उतरविण्यापूर्वी ही सर्व माहिती जाणून घ्यावी. ‘एजंट’ सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून कोणतीही ‘पॉलिसी’ घेऊ नये. जर मूळ ‘पॉलिसी’त नसेर तर डाका, घरफोडी यासाठीही ‘अ‍ॅड-ऑन’ संरक्षण घ्यावे.
 
दावा दाखल करताना चुकीची किंवा अपूर्ण किंवा त्रोटक माहिती दिली, तर तुमचा दावा असंमत होऊ शकतो किंवा रेंगाळू शकतो. ‘क्लेम फॉर्म’ विमा कंपनीतर्फे दिला जातो. तो पूर्ण व्यवस्थित भरावा. इमारतीचा प्लान, ‘फर्स्ट इर्न्फमेशन रिपोर्ट’ (एफआयआर) जर नुकसान आगीने असेल किंवा इमारत कोसळण्याने असेल, तर ‘फायर बिग्रेड’ रिपोर्ट, बिल, रीसिट, केवायसी कागदपत्रे याशिवाय विमा कंपनीला जी कागदपत्रे हवी असतील, ती दाव्याच्या अर्जाबरोबर सादर करावीत. तसेच ज्या खात्यात खातेदाराला नुकसानीची रक्कम क्रेडिट करुन घ्यायची असेल, त्या खात्याचा रद्द केलेला ‘चेक’ही सोबत जोडावा लागतो. हल्ली सर्व प्रकारच्या विम्याच्या दाव्याची रक्कम थेट बँक खात्यातच जमा होते. सध्या जीवन क्षणभंगुर आहे. संकट/संकटे कधीही येऊ शकतात. अशावेळी आपले घर/आपला बंगला ही आपली मर्मबंधातली ठेव असते. तिला नुकसानीपासून वाचविण्यासाठी, तिच्या संरक्षणासाठी घराचा विमा काढावा, हा चांगला निर्णय ठरू शकतो.
 
 
@@AUTHORINFO_V1@@