राज्याच्या कांदळवनात ४ चौ.किमी वाढ; मुंबई उपनगरात मात्र घट

    दिनांक  13-Jan-2022 22:26:36
|
mumbai mangroveमुंबई (विशेष प्रतिनिधी) -
गेल्या दोन वर्षांमध्ये राज्याच्या कांदळवन क्षेत्रात अवघ्या ४ चौ.किमीची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या भारतीय वन सर्वेक्षण अहवालामधून ही आकडेवारी प्रसिद्ध झाली. राज्याच्या कांदळवन क्षेत्रात तुटपुंजी वाढ झालेली असली तरी, गंभीर बाब म्हणजे मुंबई उपनगरातील ( mumbai mangrove ) कांदळवन क्षेत्रात घट झाली आहे.

गुरुवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी २०२१ सालचा भारतीय वन सर्वेक्षण अहवाल प्रकाशित केला. या अहवालाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये राज्याच्या कांदळवन क्षेत्रात झालेली वाढ प्रसिद्ध झाली आहे. २०१९ च्या अहवालानुसार राज्याच्या किनारपट्टीवरील ३२० चौ.किमी क्षेत्रावर कांदळवने होती. त्यावेेळी राज्याच्या कांदळवन क्षेत्रात १६ चौ.किमी अशी भरघोस वाढ झाली होती. मात्र, आता दोन वर्षांनंतर यामध्ये केवळ ४ चौ.किमीने वाढ झाली आहे. आता राज्यातील ३२४ चौ.किमी क्षेत्र कांदळवनांनी आच्छादलेले आहे. राज्याच्या एकंदरीत कांदळवन क्षेत्रात वाढ झालेली असली, तरी काही ठिकाणी मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे. खास करुन मुंबई उपनगराच्या ( mumbai mangrove ) कांदळवन क्षेत्रातील घट लक्षणीय आहे.

मुंबई उपनगरातील ( mumbai mangrove ) कांदळवन क्षेत्रात २०१९ च्या तुलनेत १.०८ चौ.किमीने घट झाली आहे. उपनगरातील कांदळवनामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे आणि विकास प्रकल्पांसाठी तोडलेल्या कांदळवनांमुळे ही घट झालेली असू शकते. याविषयी उपनगरातील कांदळवनांकडे बारकाईने लक्ष ठेवून असलेले पर्यावरणवादी हरीश पांडे यांनी सांगितले की, "उपनगरातील मालाड, बोरिवली, दहिसर, मिरा भाईंदर या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. दहिसरमधील गणपत पाटील नगर हे कांदळवनांवरच भराव करुन वसलेले आहे. वन विभागाच्या अधिपत्याखालील कांदळवने ही सुरक्षित आहेत. मात्र, उपनगरामधील जिल्ह्याधिकाऱ्यांच्या मालकीच्या जागेवरील कांदळवने असुरक्षित आहेत. या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याविषयी वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही."


२०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये कांदळवन क्षेत्रात झालेली वाढ
मुंबई शहर : ०.०० चौ.किमी
मुंबई उपनगर : - १.०८ चौ.किमी
रायगड : ६.०२ चौ.किमी
रत्नागिरी : ०.१८ चौ.किमी
सिंधुदुर्ग : - ०.१२ चौ.किमी
ठाणे : - ०.९८ चौ.किमीआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.