पंतप्रधान सुरक्षा त्रुटी – निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा समिती करणार तपास

12 Jan 2022 12:12:00
SC

‘लवकरात लवकर’ अहवाल देण्याचे निर्देश
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटींची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी त्याविषयीची आदेश जारी केला असून समितीस आपला अहवाल ‘लवकरात लवकर’ सादर करण्याचेदेखील निर्देश दिले आहेत.
 
 
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी समितीविषयीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. समितीमध्ये न्या. मल्होत्रा यांच्यासह राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएचे महासंचालक, पंजाब पोलिस महासंचालक (सुरक्षा), पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांचा समावेश समितीमध्ये करण्यात आला आहे. ही समिती सुरक्षेच्या भंगाचे कारण तपासण्यासोबतच पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपायदेखील सुचविणार आहे. समितीस आपला अहवाल ‘लवकरात लवकर’ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा त्रुटींविषयी ‘लॉयर्स व्हॉइस’ या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यापूर्वी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याचवेळी केंद्र सरकार आणि पंजाब सरकारने याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समित्यांना आपले काम थांबविण्याचेबी निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0