‘नेटफ्लिक्स’ आणि दक्षिण चिनी समुद्र

    दिनांक  11-Jan-2022 13:07:09   
|

Pine Gap
 
 
 
गतवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला ऑस्ट्रेलियन गुप्तचर मालिका ‘पाईन गॅप’चे दोन भाग काढून टाकावे लागले. फिलिपिन्स आणि व्हिएतनामने या गुप्तहेर मालिकेच्या दोन भागांवर आक्षेप घेतला. या मालिकेमध्ये दक्षिण चीन समुद्राचा जो नकाशा वापरण्यात आला होता, त्यात ‘नाईन डॅश लाईन’दाखविण्यात आली होती. ‘नाईन डॅश लाईन’ ही सीमारेषा आहे, ज्याद्वारे चीन संपूर्ण दक्षिण चीन सागरी क्षेत्रावर आपला दावा सांगत आहे. मात्र, या क्षेत्रातील इतर देश ते स्वीकारत नाहीत. दक्षिण चीन समुद्राचा संपूर्ण वाद या ‘नाईन डॅश लाईन’वर आधारित आहे. तसे, हा वाद अनेक दशके जुना आहे. पण, अलीकडच्या काळात चीनने दक्षिण चीन समुद्रावर आपला दावा मजबूत करण्यासाठी ज्या प्रकारची आक्रमकता दाखवली, त्यामुळे ही सीमारेषा खूप महत्त्वाची ठरली आहे. कोणत्याही प्रदेशावर दावा सिद्ध करण्यासाठी नकाशांची भूमिका खूप महत्त्वाची असते. चीनने आपला दावा बळकट करण्यासाठी जुन्या नकाशांचा हवाला देणे ही नवीन गोष्ट नाही. नकाशे हा चीनच्या ’तीन युद्धांच्या सिद्धांता’चा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे जनमताचे युद्ध, मानसिक युद्ध आणि कायदेशीर लढाई. दक्षिण चिनी समुद्रात चीन युद्धाच्या या तीन आयामांचा अतिशय संस्थात्मक पद्धतीने वापर करत आहे. समुद्रावर आपला हक्क सांगण्यासाठी चीन १९५० पासून विविध सांस्कृतिक उत्पादने वापरत आहे. ‘पाईन गॅप मालिका’ ही त्याची सर्वात अलीकडील बळी ठरली आहे.
 
 
 
दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० सालाच्या सुरुवातीला ‘गुगल प्ले स्टोअर’ आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरून ‘लिटल पांडाज् वर्ल्ड अ‍ॅडव्हेंचर’ नावाचा व्हिडिओ गेम काढून टाकण्यात आला. व्हिडिओ गेमची निर्मिती शांघायस्थित ‘क्षी योंग’ या माहिती तंत्रज्ञानविषयक कंपनीने केली होती. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये ‘ड्रीमवर्क्स अ‍ॅनिमेशन’ आणि शांघाय-आधारित ‘पर्ल स्टुडिओ’द्वारे निर्मित ‘अबोमिनेबल’ या सिनेमास बंद करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांमध्ये दक्षिण चीन समुद्रात चीनने दावा केलेली ‘नाईन डॅश लाईन’ दाखवण्यात आली होती. त्याचप्रमाणे ऑगस्ट २०२० मध्ये ‘पुट युअर हेड ऑन माय शोल्डर्स’ या ‘नेटफ्लिक्स’वरील कार्यक्रमामध्येही ‘नाईन डॅश लाईन’ असलेले नकाशे दाखवल्याबद्दल सेन्सॉर करण्यात आले. एप्रिल २०२१ मध्ये स्वीडिश फॅशन रिटेलर ‘एच अ‍ॅण्ड एम’ने शांघायमध्ये त्याच्या जाहिरातीसाठी हाच नकाशा वापरला, तेव्हाही ट्विटरवर त्याचा तीव्र निषेध झाला होता. असे प्रकार वारंवार केल्याने हळूहळू बेकायदेशीर दाव्यांचे समर्थन करण्यामध्ये त्याचा वापर होण्यास मदत मिळते. ‘नेटफ्लिक्स’चा अलीकडील वाद आणि त्यापूर्वी नमूद केलेल्या प्रकरणांवरून, दक्षिण चीन समुद्राच्या बर्‍याच भागांवर चीनचा दावा चीनच्या भूमिकेचे समर्थन करत असल्याचे दिसून आले. हे आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे. चीनच्या प्रशासकीय व्यवस्थेचे वैशिष्ट असलेला माहितीचा विपर्यास आणि कठोर सरकारी याचा लाभ चीन घेत आहे. त्यामुळेच फिलीपिन्सच्या फिल्म बोर्डाने ‘नाईन डॅश लाईन’ नकाशे चुकून वापरले गेले नाहीत, तर चीनची ‘नाईन डॅश लाईन’ खरोखरच अस्तित्वात आहे, असा संदेश देण्यासाठी हे जाणूनबुजून वापरले गेले आहेत, असे अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
 
 
 
चीनकडून हेरगिरीचा वेग आणि व्याप्ती वाढत आहे. चीन आपल्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षा सामरिक मार्गाने जोपासत आहे. त्यासाठी चीन सर्व प्रकारचे मार्ग वापरत आहे. ‘नेटफ्लिक्स’चा वापर करणे हा त्याचाच एक भाग आहे. दक्षिण चीन समुद्र हा प्रदेश चीनने आता नवा आखाडा बनवला आहे, त्यामुळे येथे सर्व प्रकारच्या राजकारणाचा वापर आता होणार आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील इतर देश असोत किंवा युरोपियन युनियनसारखी राष्ट्रे, या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवत आहेत, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, चीनच्या बेलगाम पावलांवर नियंत्रण ठेवायचे असेल, तर ‘क्वाड’ आणि इतर त्रिपक्षीय मंचांच्या माध्यमातून यावर लक्ष देण्याची गरज आहे.नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी मार्ग शोधण्याची गरज आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.