छत्रपतींचे नाव घेणारा पक्ष सत्तेत, मात्र तरीही गडांवर मशिदींचे बांधकाम

सुनील देवधर यांचा शिवसेनेला सणसणीत टोला

    दिनांक  11-Jan-2022 16:50:59
|
SD
 
राज्यातील सत्ताधाऱ्यांचे शिवप्रेम बेगडी 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : आपल्या पक्षाच्या शाखांना गड – किल्ल्यांची सजावट देणारा पक्ष सध्या सत्तेत आहे. मात्र, तरीदेखील पवित्र गड – किल्ल्यांवर बेकायदेशीर मशिदींचे बांधकाम होत आहे. हा प्रकार अतिशय संतापजनक असून सत्ताधाऱ्यांचे बेगडी शिवप्रेम दाखविणारा आहे, असा टोला भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगाविला.
 
 
 
 
महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणारा पक्ष सत्तेत आहे. या पक्षाने आपल्या शाखांना गड – किल्ल्यांची सजावट केली होती आणि शिवप्रेमी असल्याचा आव आणला होता. मात्र, त्यांच्या राज्यात पवित्र गड – किल्ल्यांवर मजार आणि मशिदींची बेकायदेशीर बांधकामे होत आहेत. अनेक ठिकाणी तर बेकायदेशीरपणे उरुसही सुरु आहेत. याविरोधात केंद्रीय संस्कृती मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून पुरातत्व विभागास तातडीने कारवाई करण्याते निर्देश दिल्याचे देवधर यांनी नमूद केले.
 
 
 
 
राज्यातील गड – किल्ल्यांवर मजार आणि मशिदींच्या होणाऱ्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात भाजप खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना निवेदन दिले. केंद्रीय मंत्री मेघवाल यांनी या प्रकाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.