जो ‘इगो’ किंवा ‘अहंकार’ खेळाडूंच्या यशासाठी आवश्यक आहे, तो खास पद्धतीने जोपासायला लागतो, ज्याजोगे खेळाडूंच्या यशवृद्धीकडे तो ‘इगो’ त्याचा विधायक पद्धतीने वापर करू शकतो. पण, हे खेळाडू जेव्हा स्वयंकेंद्रित बनतात, स्वार्थी बनतात, तेव्हा त्यांचा भावनिक तोल ढळतो.
आपण खेळाच्या क्षेत्रात विशेष करून स्पर्धेसाठी खेळल्या जाणार्या खेळात अशा काही खेळाडूंबद्दल ऐकले आहे की, ते खेळत असणार्या खेळापेक्षा जास्त लक्षात राहिले ते त्याच्या बेबंद अहंकारांमुळे! काही खेळाडू आकाशाशी भिडणारी क्षमता असूनसुद्धा अवचित जमिनीवर आदळले, ते त्यांच्या घसरत गेलेल्या आत्मविश्वासामुळे! खेळाच्या मानसशास्त्रात या दोन्ही गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे ठरते.सामान्य प्रतीचा आत्मविश्वास तुम्हाला असामान्य गोष्टी करू देणार नाही, हे निश्चित. महिमा दाखणार्या गोष्टी या शेवटी असामान्य आत्मविश्वासातून निर्माण होतात. खेळातील अप्रतिम जादुई क्षण वा प्रसंग हे परम पातळीवरच्या आत्मविश्वासांतूनच येतात आणि नंतर खेळाडू इतिहासातील ‘त्या’ सर्वोच्च क्षणांचे मानकरी होतात. त्या क्षणांपासून त्या खेळाडूंची आख्यायिका प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळते व त्याचा एक ऐतिहासिक वारसा बनतो.
भारताच्या इतिहासात कपिल देवने हातात घेतलेल्या विश्वचषकाची आख्यायिका आजही रसिकांच्या मनात अनेक विजयी तरंग निर्माण करते. नीरज चोप्राने भालाफेकीत ‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये मिळविलेले सुवर्णपदक हे भारताचे पहिलेवहिले अविस्मरणीय सुवर्णपदक. नीरज चोप्रानेसुद्धा अत्यंत तरुण वयात उदात्त आत्मविश्वासाच्या बळावर (जो त्याच्या देहबोलीत क्षणाक्षणाला व्यक्त होत होता) मिळविले. हे अव्वल दर्जाचे खेळाडू ‘ना भूतो ना भविष्यति’ अशी त्याक्षणी जेव्हा कामगिरी करतात. अशी त्या क्षणी जेव्हा कामगिरी करतात, तेव्हा त्यांची आत्मविश्वासाची लांबी-रुंदी-उंची-खोली सगळीच सामान्य परिमाणांपलीकडे पोहोचलेले असते. खेळाच्या क्षेत्रात त्याला ‘इगो’ किंवा ‘अहंभाव’ म्हणतात. जागतिक क्षेत्रातले इतिहास दणाणून सोडणारे आजच्या काळातील खेळाडू ख्रिस्टिनो रोनाल्डो आणि लायोनेल मेसी हे प्रचंड मोठ्या अहंभावासाठी खास जगात सुप्रसिद्ध आहेत. जगात कित्येक लाख लोक आपला खेळ पाहत आहेत.
जवळजवळ ६० हजार लोक स्टेडियममध्ये आपला खेळ पाहण्यास उभे आहेत. अशावेळी उच्च प्रतीचा खेळ दाखवताना या खेळाडूूंमधला ‘सुपरडूपर’ अहंभाव शक्तिमान ठरतो. त्यांचा पराकोटीचा आत्मविश्वास त्यांच्याकडून अशी ऐतिहासिक कामगिरी करुन घेऊ शकतो. याला या खेळाडूंचा ‘इगो’ असे आपण म्हणतो. हा जो ‘इगो’ किंवा ‘अहंकार’ खेळाडूंच्या यशासाठी आवश्यक आहे, तो खास पद्धतीने जोपासायला लागतो, ज्याजोगे खेळाडूंच्या यशवृद्धीकडे तो ‘इगो’ त्याचा विधायक पद्धतीने वापर करू शकतो. पण, हे खेळाडू जेव्हा स्वयंकेंद्रित बनतात, स्वार्थी बनतात, तेव्हा त्यांचा भावनिक तोल ढळतो. ते त्यांच्या सहकार्यांबरोबर, प्रतिस्पर्ध्याबरोबर आणि प्रशिक्षकांबरोबरचे स्नेहसंबंध बिघडवितात. त्यांच्या मानसिक पार्श्वभूमीमध्ये घसरण होते. खेळाडूंमध्ये काही खेळाडू स्वभावत:च दैवी क्षमता घेऊन आलेले असतात, मग ते फुटबॉलसारखे मैदानी खेळ असोत व बुद्धिबळासारखे बौद्धिक खेळ असोत. अगदी तरुण वयातच त्यांना भरपूर प्रसिद्धी, शाबासकी मिळत जाते आणि मग अहंभावाने भारलेली त्यांची मन:स्थिती घडून जाते. त्यांच्या खेळाची स्तुती करावी, अशीच त्यांची क्षमता व खेळावरचे त्यांचे वर्चस्व असते. पण, हळूहळू त्यांना ती स्वत:ची व्यक्ती म्हणून स्तुती वाटते व त्यामुळे त्यांच्या डोक्यात गर्वाची ‘अहं ब्रह्मास्मि’ अशी हवा भरते.
किंबहुना, त्यांना आपण आपले एकमेकाद्वितीय व्यक्तित्व तर घालवून बसणार नाही ना, अशी असुरक्षित भावना मनात निर्माण होते. असे खेळाडू स्वतःलाचहळूहळू हरवतात. आपण हरणार किंवा हरलो तर? अशीही भीती त्यांच्यात अलगद निर्माण होते. ते आव्हान स्वीकारत नाही. खेळाडूंचे कसे आहे की, प्रयत्न करत राहायचे असतात. हातून घडणार्या चुका ओळखायच्या असतात. त्या चुकांची दुरुस्ती त्यांना करायची असते. ‘ट्रायल अॅण्ड एरर’च्या पद्धतीने त्यांना आपला खेळ सुधारणे आवश्यक असते, पण खेळापेक्षा आता जेव्हा खेळाडूच मोठा होतो, तेव्हा खेळापेक्षा अहंकार जगायला लागतो. मग खेळातील मन स्वतःच्या प्रतिमेत गुंतत जाते. असे खेळाडू दुर्दैवाने जमिनीवर आदळून सपाट तरी होतात किंवा स्वतःचाच विध्वंस करतात वा खेळाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिमत्त्वाच्या समस्या निर्माण करतात. शेवटी ते स्वतःला संपवतात. स्वतः ‘खेळाचा राजा’ आहे, असा प्राबल्याचा दावा ते करतात.
यशाची आशा ही त्यांच्यासाठी खिलाडी प्रकृतीचा भाग न राहता ती एक विकृत गरज बनते आणि मग विकृत राजकारणही ही मंडळी करतात. तोरा, अहंभाव किंवा ‘इगो’ खेळाडूसाठी नक्कीच उपयुक्त ठरले, पण केव्हा? तर जेव्हा खेळाडूला त्याचे विधायक नियोजन करता येईल तेव्हा, जेव्हा त्या अहंभावात एक सात्त्विकता आणि विधायकता येईल. त्या खेळाडूसाठी ती अनमोल ताकद ठरू शकते. ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर आणि ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी ही या संचिताची उत्तम उदाहरणे आहेत. जेव्हा आत्मविश्वास आणि सक्षम कौशल्य याबरोबर खेळाबद्दलची निष्ठा आणि वैयक्तिक समर्पण येते, तेव्हाच खेळाडू स्वतःचाच उत्तम आविष्कार घडवू शकतो. (क्रमशः)