सातारा - ऊस कापणीवेळी ताटातूट झालेल्या कोल्ह्याच्या पिल्लाची आईसोबत पुनर्भेट

10 Jan 2022 18:52:07
jackal


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
उसाच्या कापणीवेळी आईपासून दुरावलेल्या कोल्ह्याच्या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्यामध्ये वन विभाग सातारा आणि स्थानिक वन्यजीवप्रेमी संस्थेला यश मिळाले आहे. रविवारी रात्री सातारा जिल्ह्यातील जिहे-कटापूर येथे ही घटना घडली.


ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाल्यापासून त्यामध्ये अधिवास करणाऱ्या अनेक वन्यजीवांची पिल्ले बेवारस अवस्थेत सापडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोल्हा, बिबट्या, रानमांजर, वाघाटी आणि अगदी मोराच्या पिल्लांचा देखील समावेेश आहे. अशाच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील जिहे-कटापूर येथे ऊस तोडणीवेळी कोल्ह्याचे एक पिल्लू वनवासी मजूरांना सापडले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यातील काही मजूर आदिवासी भागातील आहेत. ते अनेकदा ऊस तोडणीवेळी शेतात मिळेल ते पकडून खातात. तसाच काही प्रकार जिहे-कटापूर येथे घडला. सापडलेले कोल्ह्याचे पिल्लू हे काही मजूरांनी पिशवीत दडवून ठेवले होते. मात्र सुदैवाने, प्राणीप्रेमी स्थानिक विराज फडतरे व त्यांचे लहान भाऊ वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि पिल्ला ताब्यात घेतले.



पिल्लाला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी याबद्दलची माहिती स्थानिक प्राणिमित्र संस्था 'डब्लूएलपीआरएस'ला दिली. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण आणि वनरक्षक महेश सोनावले यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पिल्लाला सापडलेल्या ठिकाणीच एका बाॅक्समध्ये ठेवण्यात आले. अखेरीस मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास मादी कोल्हा येऊन पिल्लाला घेऊन गेल्याची माहिती 'डब्लूएलपीआरएस'चे अमित सय्यद यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0