‘गौरव महाराष्ट्रा’चा पुरवणी विशेषांकाचे ठाण्यात दिमाखदार प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2022
Total Views |

Gaurav Maharashtracha 1
 
 
 
ठाणे : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६१ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘अक्षरमंच सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘हाय मीडिया लॅबोरेटरी’ यांच्या सहकार्याने ‘गौरव महाराष्ट्राचा’ या पुरवणी विशेषांकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा रविवार, दि. ९ जानेवारी रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला. याप्रसंगी ३५ प्रभूतींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, ख्यातनाम कवी, गीतकार प्रवीण दवणे, अभिनेत्री संजीवनी जाधव आदींनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘अक्षरमंच’च्या या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कार्यक्रमाचे निमंत्रक दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार आणि ‘अक्षरमंच’चे सचिव हेमंत नेहते यांनी अतिथींचे स्वागत केले. ‘अक्षरमंच’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीसह विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि ‘गौरव महाराष्ट्राचा’ या उपक्रमाची भूमिका समजावून सांगितली.
 
 
 
महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत योगदान दिलेल्या मान्यवरांची ओळख समाजाला व्हावी. या हेतूने ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये ‘गौरव महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सहकार्याने विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, संशोधन आणि उद्योग क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी बजावणारे डॉ. गंगाधर मोतीराम वारके आणि ज्योतिष्य व साहित्यिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे अ‍ॅड. डॉ. सोपान विठ्ठल बुडबाडकर यांना ‘महाराष्ट्र जीवन गौरव सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले, तर अन्य मान्यवरांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. वारके यांनी स्वदेशीचा अभिमान बाळगा. तसेच, स्वयंपूर्ण भारतासाठी परदेशात न जाता आपले कौशल्य इथेच उपयोगात आणण्याचा सल्ला युवापिढीला दिला. संपादक किरण शेलार यांनी, अशी प्रेरणा देणारी मंडळी प्रकाशात आणण्यासाठी अशा प्रकारचे पुरस्कार व सोहळे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने केले जात असल्याचे सांगितले. अभिनेत्री संजीवनी जाधव यांनीही आयोजक व सर्व सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या.
 

Gaurav Maharashtracha 2
 
 
 
‘हे’ भावी पिढीचे मार्गदर्शक : आ. केळकर
“कोरोनाचा बाऊ करण्यापेक्षा पुरेशी काळजी घेऊन कोरोनासोबतच काम करावे लागणार आहे. भावी पिढीला मार्गदर्शक ठरावीत. अशा या प्रभूती आहेत. त्यांना पुढे आणणे त्यांचा गौरव करणे, गरजेचे आहे. ‘अक्षरमंच’च्या साथीने स्तुत्य उपक्रम राबवणार्‍या दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष कौतुक आहे, अशी इमानदार माणसे असतील, तर मोदींना अभिप्रेत असलेला ‘नवभारत’ घडेल,” असे कौतुगोद्गार आ. संजय केळकर यांनी काढले.
 
 
 
संकटाच्या छाताडावर पाय रोवून काम करा
अश्रूंचे ‘मार्केटिंग’ न करता, कोणतीही सवंग लोकप्रियता न विकता निर्धाराने महाराष्ट्र घडवू पाहणार्‍या दै. ‘मुंबई तरुण भारत’ची ‘त्रिसूत्री’ सर्वस्पर्शी आहे. तेव्हा, स्वामी विवेकानंदानी म्हटल्याप्रमाणे न डगमगता संकटांच्या छाताडावर पाय रोऊन धबधब्यासारखे काम करीत राहा, अशा शुभेच्छा कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केल्या.
 
 

Gaurav Maharashtracha 3 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@