खलिस्तानी दहशतवादाची पंजाबवापसी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2022
Total Views |

ludhiyana


पंजाबमधील लुधियाना न्यायालयात डिसेंबरमध्ये झालेल्या स्फोटाचे धागेदोरे हे खलिस्तानी दहशतवादाशी जोडलेले असल्याचे अलीकडेच झालेल्या अटकेतून सिद्ध झाले. पण, त्याचबरोबर ३१ डिसेंबर रोजी मुंबईलाही खलिस्तानी दहशतवादी हल्ल्याचा ‘हाय-अलर्ट’ जारी करण्यात आला होता. तेव्हा, शेतकरी आंदोलन, आगामी पंजाब विधानसभा निवडणुका, कॅप्टन अमरिंदर सिंगांऐवजी आता चन्नींचे मुख्यमंत्री म्हणून लाभलेले कमकुवत नेतृत्व, यामुळे पंजाबला आणि पर्यायाने भारताला अस्थिर करण्याचे उद्योग जोमात आहेत. तेव्हा पुन्हा डोके वर काढणार्‍या खलिस्तानी दहशतवादाची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.
 
पंजाबमधील लुधियाना न्यायालयात दि. २३ डिसेंबरला बॉम्बस्फोट झाला. ज्या लुधियानामध्ये १९९१ मध्ये ‘भिंद्रनवाले टायगर फोर्स’ने भारत सरकारशी शांततेच्या वाटाघाटी केल्या होत्या, तिथे जाणीवपूर्वक हा स्फोट घडवण्यात आला. या बॉम्बस्फोटाला जबाबदार असणार्‍या जसविंदर सिंग मुलतानीला जर्मनीत अटक करण्यात आलेली असून केंद्र सरकारने ‘नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी’ला त्याच्यावर पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत. तो ‘सिख्स फॉर जस्टीस’ या संघटनेशी संलग्न असून या संघटनेवर जुलै २०१९ पासून बंदी घातलेली आहे. त्याचे संबंध बंदी घातल्या गेलेल्या ‘खलिस्तान जिंदाबाद फोर्स’ आणि ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या संघटनांशी सुद्धा आहेत. पंजाब, मुंबई आणि देशाच्या अन्य काही भागांत दहशतवादी हल्ले करण्यासाठी पाकिस्तानात खलिस्तान समर्थक घटकांबरोबर तो कट रचत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’च्या मदतीने लुधियानाचा बॉम्बस्फोट घडवला गेल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. जसविंदर सिंग मुलतानी आणि पाकिस्तानमध्ये ‘बब्बर खालसा’चा दहशतवादी हरविंदर सिंग सिंधू या दोघांनी परस्पर संगनमताने पंजाबमध्ये हल्ला घडवला. संधूवर तर वेगवेगळ्या ३० केसेस असून यात सीमापार अवैधपणे शस्त्रास्त्रे नेणे, खून, अमली पदार्थाची विक्री हे आरोप आहेत.लुधियानाच्या न्यायालयात बॉम्ब नेणारा गगनदीप याच मुलतानीच्या संपर्कात होता. हा गगनदीप आधी पोलीस हेड कॉन्स्टेबल होता. त्याला अमली पदार्थांची विक्री केल्याच्या गुन्ह्यामुळे २०१९ साली सेवेतून बडतर्फ केले होते. लुधियानाच्या स्पेशल टास्क फोर्सने याची चौकशी केली होती. त्याला २५ महिने तुरुंगात ठेवून सप्टेंबरमध्ये जामीनावर सोडण्यात आले. त्यानेच हा हल्ला प्रत्यक्षात घडवला आणि त्यात तो ठार झाला. तसेच शेतकर्‍यांच्या नेत्यांना ठार करण्याविषयी एका केसमध्ये हरियाणा पोलिसांनी एका व्यक्तीला पकडले होते. त्याच्याद्वारे मुलतानीचे नाव आधी समोर आले होते. त्याने पंजाबमधील युवकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी भरती करून घेण्यासाठी सोशल मीडिया - फेसबुक, ट्विटर, युट्यूब, व्हॉटसअ‍ॅप, टेलिग्राम आणि सिग्नल यांचा वापरही केला. त्याने पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’चा हस्तक असणारा जिब्रान आणि पाकिस्तानमधील राणा तसीम, इमरान आणि अन्य काहींशी संपर्क ठेवला होता. या स्फोटामुळे एकेकाळी संपलेला खलिस्तानी दहशतवाद पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे.


खलिस्तानी दहशतवादाचा आढावा


खलिस्तानी दहशतवाद हा थेट शीख धर्माशी जोडला गेलेला आहे. साधारणपणे १९८० नंतर पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी आणि त्यासाठी दहशतवादी कारवायांची सुरुवात झालेली दिसून येते. त्याला पाकिस्तानची मदत होती.त्यात पंजाबच्या राजकीय परिस्थितीचा प्रभावही महत्त्वाचा आहे. ‘शिरोमणी अकाली दल’ हा पक्ष १९७२ साली पंजाब विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. पंजाबातच शिखांचा पक्ष पराभूत झाला, हे शल्य मोठे होतेच आणि यातूनच ‘धार्मिक आणि राजकीय’ स्थान डळमळीत झाल्याची भावना होती. शिखांची अस्मिता जागृत करून आपले राजकीय हेतू साध्य करणे हा उपाय दिसत होता. मग या राजकीय पक्षाने १९७३ साली ‘आनंदपूर साहेब ठराव’ करून पंजाबला जास्तीत जास्त राजकीय स्वायत्तता देशांतर्गत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले. तसेच शीख धर्माला हिंदू धर्मापासून स्वतंत्र मानावे हे या ठरावात मुख्यतः होते. यांना जर्नेलसिंग भिंद्रनवाले हे शिखांचे १४वे जथेदार किंवा प्रमुख होते येऊन मिळाले. यामुळे शिखांचे ऐक्य प्रभावीपणे साधले गेले.पुढे अकाली दल आणि भिंद्रनवाले त्यांनी १९८२ साली संयुक्तपणे ‘धरम युद्ध मोर्चा’चा प्रारंभ केला. याने ४१० जणांचा बळी घेतलेला आहे. नंतर १९८३ साली भिंद्रनवाले यांनी स्वतःची अटक टाळण्यासाठी ‘अकाल तख्त’चा आधार घेतला. सुवर्णमंदिरात त्यांनी आश्रय घेतला. मग जून १९८४ मध्ये त्याच्यासाठी ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ झाले. भिंद्रनवाले भारतीय सैन्याकडून ठार मारले गेले. परिणामी, १९८४ ऑक्टोबर अखेरीस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच शीख असणार्‍या सुरक्षारक्षकांनी केली. नंतर शीखविरोधी दंगली उसळल्या. काँग्रेस समर्थक आणि शीख यांच्यात हिंसक चकमकी झाल्या आणि स्वतंत्र खालिस्तानची मागणी जास्त तीव्र झाली.


भारतात शीख सुरक्षित नाहीत, या भावनेला पाठिंबा मिळू लागला. शीख धर्माच्या लोकांसाठी स्वायत्त अशा ‘खालसालॅण्ड’ची निर्मिती व्हावी, ही मागणी होऊ लागली. यानंतर फुटीरतावादी गटाला आर्थिक आणि राजनयिक आधार काही घटक देऊ लागले. काही अशिक्षित तरुण तर केवळ ‘मजा’ म्हणून सुद्धा या खलिस्तानवादी चळवळीला येऊन मिळाले होते. खलिस्तानसाठी भारत आणि पाकिस्तानमधील पंजाब आणि काही प्रदेश त्यांना हवा होता.

खलिस्तानच्या निर्मितीसाठी सक्रिय संघटना

पंजाबला आणि काही भागाला स्वतंत्र खलिस्तान बनवावे, ही मागणी जोर धरू लागली. अनेक दहशतवादी संघटनांनी त्यासाठी देशाच्या विरुद्ध कारवाया सुरु केल्या.
१ भिंद्रनवाले/खलिस्तान टायगर फोर्स
‘भिंद्रनवाले टायगर फोर्स’ ही १९८४ ला स्थापन झालेली संघटना खलिस्तानच्या निर्मितीसाठी १९८७ ते १९९७ दरम्यान सक्रिय होती. त्यांनी १९९१ मध्ये लुधियानामध्ये भारत सरकारशी शांततेच्या वाटाघाटी केल्या होत्या. त्यावेळी चंद्रशेखर हे पंतप्रधान होते. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी ‘आयएसआय’च्या मदतीने या वाटाघाटी उधळून लावायचा प्रयत्न केला होता.

 
२. बब्बर खालसा
या संघटनेवर भारतात बंदी आहे. दि. २३ जून, १९८५ ला कॅनडाच्या मोंट्रेयलहून दिल्लीला येणार्‍या ‘एअर इंडिया फ्लाईट १८२’ ला या संघटनेने बॉम्बने उडवले. त्याच दिवशी न्यू टोकियो नारिता इंटरनॅशनल एअरपोर्टवर एका बॅगेमध्ये बॉम्बस्फोट घडवला, तर २००७ रोजी लुधियाना तेथे सिंगार सिनेमा कॉम्प्लेक्स त्यांनी उडवले. विशेष म्हणजे, त्यासाठी पाकिस्तानात तीर्थयात्रेसाठी जाऊन शस्त्रे आणि प्रशिक्षण मिळवून बिकानेरहून सीमा ओलांडून आले होते.
३. खलिस्तान कमांडो फोर्स
स्वतंत्र खलिस्तानचे ध्येय बाळगणार्‍या या संघटनेने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियंतसिंग यांची हत्या केली. म्हणून या संघटनेवरही बंदी घातली आहे.


४. खलिस्तान लिबरेशन फोर्स
 
स्वतंत्र खलिस्तानसाठी सशस्त्र कारवायांसाठी १९८६ साली या संघटनेची स्थापन करण्यात आली. काश्मीरच्या दहशतवाद्यांसह हातमिळवणी करून भारतातील लष्करी ठिकाणांवर या संघटनेने हल्ले केले होते.त्याच्याशी संलग्न असणार्‍या ‘खलिस्तान लिबरेशन आर्मी’ यांनी दि. १२ डिसेंबर, १९८७ रोजी नऊ पंजाब पोलिसांना ठार केले. जुलै १९९० मध्ये चंदिगढला पोलीस स्टेशनचा भाग यांनी स्फोटात उडवून लावला, पंजाब सरकारमधील मंत्री बलवंत सिंग यांची १९९० मध्ये हत्या केली, आठ रेल्वे पोलिसांचीही हत्या केला आणि ‘डेरा सच्चा सौदा’च्या प्रमुखांवर २००८ मध्ये हल्ला घडवून आणला. पंजाबच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख रुल्डा सिंग यांचीही हत्या केली. तसेच १९८४च्या शीखविरोधी दंगलीतील मुख्य आरोपी डॉ. बुध प्रकाश कश्यप यांची हत्या अशा विविध हिंसक कारवाया घडवून आणल्या. तसेच पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’ने ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’च्या हरमिंदर सिंग मिंटोची मदत घेतली होती. गृहमंत्रालयानुसार ही ४०वी खलिस्तानी संघटना आहे, ज्यावर बंदी घातली गेली.

५. सिख्स फॉर जस्टीस


अमेरिकास्थित हा गट भारतातून पंजाबने स्वतंत्र व्हावे आणि खलिस्तानची निर्मिती व्हावी, यासाठी २००७ लागुरपतवंत सिंग पन्नू यांनी ‘एनजीओ’ बिगर सरकारी संस्था म्हणून स्थापन केली. त्याला जुलै २०२० ला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केले आहे. त्यांनी २०१९ मध्ये त्यांनी स्वतंत्र पंजाबसाठी सार्वमत घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले, म्हणून त्यांच्यावर बंदी घातली गेली. यांना पाकिस्तानच्या ‘आयएसआय’द्वारे पैसा पुरवला जातो. ‘कर्तारपूर कॉरिडोर’चा वापर ‘रेफरेंडम २०२०’साठी करून घेतला होता. भारतीय लष्करातील शीख सैनिकांनी उठाव करण्यासाठी त्यांना भडकावणे आणि काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे देशविरोधी उद्योगही या संघटनेने वेळोवेळी केले.भारताच्या ‘एनआयए’ने या संघटनेवर खटला दाखल केलेला होता. तसेच २०२०च्याशेतकरी आंदोलनातसुद्धा त्यांचा सहभाग होता. खलिस्तान समर्थक ४० संकेतस्थळांवर जुलै २०२० मध्ये भारताने बंदी घातली. त्यांच्या विरोधात ‘इंटरपोल’ने ‘रेड कॉर्नर नोटीस’ बजावली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये या संस्थेची सदस्य महिला मलेशियात ‘आयएसआय’च्या काही सदस्यांसह स्थानिक राजकीय नेत्याच्या हत्येच्या कट प्रकरणी पकडली गेली.‘सिख्स फॉर जस्टीस’ने नवा खलिस्तानचा नकाशा ऑक्टोबर २०२१ प्रसिद्धदेखील केला होता. त्यात केवळ पंजाबच नाही, तर हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थानचे काही जिल्हे आणि उत्तर प्रदेशचा काही भाग समाविष्ट केल्याचे दिसून येते. त्यावर नेटीझन्सनी बरीच टीका केली होती.

६. खलिस्तान जिंदाबाद फोर्स


शिखांसाठी स्वतंत्र खलिस्तानसाठी निर्माण करण्यासाठी सक्रिय असणार्‍या या दहशतवादी संघटनेवर २०१८पासून बंदी आहे. २००९ मध्ये ऑस्ट्रियातील व्हिएन्नातील गुरुद्वारा रविदासवर हल्ला केला होता. ज्यात ‘डेरा साच खंड’चे प्रमुख रामा नंद ठार झाले होते.

देशाच्या अखंडतेला धोका


पंजाबमधील दहशतवाद शीख धर्माच्या अस्मितेसाठी होता आणि आता त्याला पुन्हा पेटवले गेले आहे. शीखांचे वेगळे राष्ट्र हवे, कारण भारतात शीख सुरक्षित नाहीत, अशी भावना तीव्र होती. शीख आणि हिंदू वेगळे आहेत, हे वारंवार पटवून देण्यात आले. त्यासाठी शिखांनी आपल्या धार्मिक चिन्हांचा, प्रतीकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. ‘शीख अस्मिता’ ही देशापेक्षा वरचढ ठरवली.

यासारखी कारणे पाहता हा धार्मिक दहशतवाद होता यात शंका नाही. शिवाय त्याला पाकिस्तानची मदत होती. भारतापासून जितके घटक फुटून वेगळे होतील, तितके ते पाकिस्तानला स्वतःचेयश वाटते. कारण, ‘अखंड हिंदुस्थान’ तयार होऊ न देणे हेच त्याचे ध्येय आहे. पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा झाला. त्यासाठी भारताने मदत दिली होती. याचा प्रतिशोध घेण्याची एकही संधी पाकिस्तान अजूनही सोडत नाही. खलिस्तानच्या रुपात ही मोठी संधी त्याला सातत्याने खुणावत असते. ‘नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी’ने गुज्जरसिंग निज्जारला डिसेंबर २०२० मध्ये अटक केली. खलिस्तानवादी संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तो सोशल मीडियावर सक्रिय झाला होता. खलिस्तानची मागणी करणे म्हणजेच मुळात देशाच्या सुरक्षेला बाधा आणणे आहे. केवळ धार्मिक तेढ वाढवून आणि स्वतंत्र धार्मिक अस्मिता भडकावून देशाचे तुकडे करणारे घटक यात सक्रिय आहेत. याला सामान्य जनतेचा पाठिंबा कधीच नव्हता. पंजाबचे भूराजकीय स्थान देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी पाकिस्तानला तेथे अस्थैर्य असणे हिताचे आहे म्हणून खलिस्तानचे मृगजळ दाखवून शीख जनतेला फसवले जाते.
समृद्ध पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या आहारी जाणारी पिढी हे मोठे आव्हान आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानला अमली पदार्थांचे मार्केट, पैसा आणि भारताचे तुकडे पडणे यात स्वारस्य आहे.परदेशात शीख तरुणांना यात फसवून पाकिस्तान भारताला पोखरतो आहे. यासाठी सदैव सजग असणारी राष्ट्रभक्त शीख जनता मोठ्या प्रमाणात हवी आहे. आपल्या धर्मासाठी बलिदान देणारा शिखांचा इतिहास जगाला ठाऊक आहे. ज्या इस्लामी शासकांनी हालहाल करून शिखांच्या धर्मगुरूंना ठार केले होते, त्यांचेच वंशज जणू आधुनिक काळात वावरत आहेत. दुर्दैवाने शीख समाजातील काही तरुणांना त्याचा विसर पडलेला दिसतो. राष्ट्रासाठी बलिदान देणारे, धर्मासाठी त्याग करणारे शीख अशी ओळख पुसून स्वतंत्र खलिस्तानसाठी दहशतवादी बनलेले शीख असा प्रवास पाकिस्तानमार्गे चालू आहे. विशेष म्हणजे, या नव्या खलिस्तानच्या नकाशात कर्तारपूरचा समावेश नाही. कारण, पाकिस्तानला अखंड ठेवून भारताचे तुकडे करू पाहणारी ‘आयएसआय’यामागे आहे.

रुपाली कुळकर्णी-भुसारी



@@AUTHORINFO_V1@@