ठाणे महापालिकेत रखडलेल्या वेतनासाठी सभापतींनी मागितली लाच

09 Sep 2021 21:19:17

sanjay bhoir_1  

ठाणे महापालिकेत टक्केवारीचा खेळ - भाजपचा आरोप
ठाणे  :  राज्यात मागील काही महिन्यांपुर्वी वसुली आणि टक्केवारीच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु आहे. माजी गृहमंत्र्यांनी दिलेले १००  कोटींच्या वसुलीचे लक्ष्य आणि त्यावरुन महाराष्ट्राला बसलेले हादरे यातुन खळबल माजलेली असतानाच टक्केवारीचा आणखी एक प्रकार शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेत घडला आहे. कोरोनाकाळात ठाणे शहरामध्ये काम केलेल्या काही कामगारांचे थकित असलेले वर्षभराचे वेतन अदा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेतील टक्केवारीची चर्चा पुन्हा एकदा जोमाने सुरु झाली आहे.
“कोरोना महामारीच्या काळामध्ये जुलै २०१९  ते ऑक्टोबर २०२०  या काळात ठाणे शहर वाहतुक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी काही कर्मचार्यांनी ट्राफिक वॉर्डनने काम केले होते. मात्र वाहतुक शाखेत वर्षभर सेवा देऊनही संबंधित अनेक कर्मचार्यांचे वेतन ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने अदा करण्यात आले नव्हते. थकित वेतनाबाबत कर्मचार्यांनी विचारणा केली असता वेतन हवे असल्यास एकुण वेतनाच्या ४  टक्के रक्कम लाच स्वरुपात देण्याची मागणी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी केली. मात्र आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे संबंधित कर्मचार्यांना त्यांचे थकित वेतन अदा करण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्याचे महापालिका आयुक्त तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थायी समितीच्या सभापतींवर तात्काळ कारवाई करावी.“ अशी मागणी ठाणे भाजपचे शहर चिटणीस दत्ता घाडगे यांनी म्हटले आहे.




 
Powered By Sangraha 9.0