कोकणाला अश्मयुगीन ठेवा लाभलेल्या कातळशिल्पांचा उलगडा करुन ती संवर्धित करण्यासाठी झटणार्या भाई रिसबूड यांच्याविषयी...
कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचा वारसा जगासमोर आणणारा हा माणूस. कोकणात शाश्वत पर्यटन सुरू करण्यासाठी धडपडणारा. कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी जीवाचे रान करणारा. आजवर या माणसाने कोकणातील ७२ गावांमधून १,६०० कातळशिल्पांचा उलगडा केला आहे. प्रकल्पाचे संकट असताना या कातळशिल्पांना संवर्धित करण्यासाठी सध्या ते प्रयत्नशील आहेत. कातळशिल्पांचा हा वाटाड्या म्हणजे सुधीर (भाई) रिसबूड.
रिसबूड यांचा जन्म दि. ५ ऑगस्ट, १९७३ रोजी दापोलीमध्ये झाला. लहान असतानाच वडिलांच्या नोकरीमुळे रिसबूड कुटुंबीय हे रत्नागिरी शहरात स्थायिक झाले. त्यावेळी रत्नागिरी शहर हे मोठे नव्हते. त्यामध्ये खेडेगावाचा वास होता. त्यामुळे भाईंचे बालपण हे खेडेगावातील वातावरणात गेले. अगदी खेडेगावातील मुले दैनंदिन जीवनात ज्या ज्या काही गोष्टी करतात, त्या सर्व गोष्टी भाईंना अनुभवण्यास मिळाल्या. ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’मधून डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय सुरू केला. दरम्यानच्या काळात रिसबूड कुटुंबीय रत्नागिरी शहरामध्ये परिचित असलेल्या आणि सांस्कृतिक ठेवण लाभलेल्या घाणेकर आळीत राहण्यासाठी आले. आळीतील वास्तव्यादरम्यान २००५ पासून भाईंचा कोकणातील सांस्कृतिक ठेव्यांशी जवळचा संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली. दिवाळीत तयार केल्या जाणार्या गडकिल्ल्यांमुळे भाईंमध्ये कोकणातील ऐतिहासिक वारसांच्या संवर्धनाचे बीज रोवले गेले. २००५ साली ’मनातील किल्ला’ या संकल्पनेसह नरेंद्र घाणेकर आणि घाणेकर आळी मित्रमंडळींनी आळीत तयार केलेल्या किल्ल्याला माध्यमांमधून बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे असे किल्ले तयार करण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे किल्ला तयार करण्यापूर्वी त्यावर संशोधन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले.
पुढच्या वर्षी पन्हाळगड आणि विशालगड ही किल्ल्यांची जोडगोळी त्यांनी तयार केली. केवळ प्रतिकृती तयार न करता चलचित्रांच्या माध्यमांतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवण्यात आले. पुढल्या काळात अगदी २०१४ पर्यंत किल्ले तयार करण्याचा आणि त्यासाठी दोन ते तीन महिने संशोधन करण्याचा हा प्रवास सुरू राहिला. किल्ल्याची प्रतिकृती ‘थ्री-डी’ झाली. विविध प्रदर्शनामध्ये त्यांंचे सादरीकरण सुरू झाले. दरम्यानच्या काळात भाईंनी कॅमेरा घेतला. किल्लांचे सर्वेक्षण करताना आणि कामानिमित्त फिरताना त्यांना पक्षीदर्शन होऊ लागले. त्यांच्या उत्सुकतेपोटी भाईंनी आपल्या घराच्या आसपास दिसणार्या पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यास सुरुवात केली. त्यावेळी इंटरनेट किंवा तज्ज्ञ सहज उपलब्ध नसल्यामुळे पुस्तकांच्या माध्यमातूनच त्यांची माहिती जाणून घेतली. रत्नागिरीच्या आसपास राहुल सोहनी, प्रणव परांजपे यांच्यासमवेत फिरून पक्षीनिरीक्षण केले. घाणेकर आळीतील स्नेहसंमेलनादरम्यान या पक्ष्यांची छायाचित्र दाखवून मुलांमध्ये त्यांच्याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. पक्षीनिरीक्षणाचा छंद वाढत गेल्यावर त्यांनी लहान मुलांसाठी ’कोकणातील पक्षी’ हे पुस्तक लिहून काढले. मुलांनादेखील आपल्या खाऊच्या पैशांमध्ये हे पुस्तक विकत घेता येईल, असे त्याचे मूल्य ठेवले.
रत्नागिरीमध्ये फिरत असताना त्यांना येथील स्थानिक असून कोकणातील बर्याच गोष्टी आपल्याला माहिती नसल्याची जाणीव झाली. या भूमीत शाश्वत पर्यटनाची क्षमता आहे. मात्र, आपल्यालाच त्याच्याविषयी माहिती नसल्यामुळे त्यांची प्रसिद्धी होत नाही, हे त्यांना समजले. त्यामुळे ’आडवळणावरचे कोकण’ या संकल्पनेअंतर्गत त्यांनी रत्नागिरी आणि आसपासचा परिसर पालथा घालण्यास सुरुवात केली. पाणथळींवरील पक्ष्यांच्या सर्वेक्षणादरम्यान भाईंचा समविचार लोकांशी संपर्क आला. त्यामुळे त्यांचा एक गट तयार झाला. या ग्रुपच्या माध्यमातून कोकणातील ऐतिहासिक आणि जैविक वारसा जतन करण्याच्या कामाला पुढल्या काळात मूर्त रूप मिळत गेले. २०१२ साली भाईंची कातळशिल्पांशी ओळख झाली. राजापूर तालुक्यातील निवळी, देवी हसोळ, बारसू येथील सड्यांवर आढळणारी कातळशिल्प त्यांच्या नजरेखालून गेली होती. शिवाय प्र. के. घाणेकर यांनीदेखील कातळशिल्पांविषयी प्राथमिक माहिती दिली होती. मात्र, २०१२-१५ या काळात कातळशिल्पांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.
पुढल्या काळात धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मदतीने भाईंचा कातळशिल्प शोधाचा प्रवास सुरू झाला. २०१५ साली बारसूच्या सड्यावर फिरताना एका धनगराच्या मदतीने या मंडळींनी गोवळ येथून ४२ कातळशिल्पांच्या समूहाचा उलगडा केला. त्यानंतर या कातळशिल्पांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. सड्यांवर वावरणार्या मंडळींना गाठून त्यांच्याकडून कातळशिल्पांच्या ठावठिकाणांची माहिती घेऊन आणि स्व-अभ्यासातून पुढे आलेल्या ठोकताळ्यातून कातळशिल्पांची नवीन ठिकाणे शोधून त्यांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू झाले. सोबतच अगदी पहिल्या दिवसापासून या कातळशिल्पांचा अभ्यास, त्यांचा शास्त्रीय नोंदी, लोकांकडून मिळणार्या पारंपरिक माहितीचे संकलन करण्याचे काम सुरू ठेवले. आजतागायत या मंडळींनी ७२ गावांमधून १,६०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा उलगडा केला आहे. २०१८ साली या समविचारी लोकांनी ’निसर्गयात्री’ या संस्थेची नोंदणी करून विविध कामांना सुरुवात केली. त्यामध्ये सागरी कासव संवर्धन, सड्यांचे संवर्धन आणि शाश्वत पर्यटन अशा उपक्रमांचा समावेश आहे. कोकणातील अश्मयुगीन वारसा लोकांसमोर आणून त्यांविषयी समाजामध्ये जनजागृती करणार्या भाईंना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!