डॉ. विजय भटकर यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2021
Total Views |

Bhatkar  _1  H




पुणे :
सुप्रसिद्ध संगणकतज्ज्ञ ‘पद्मविभूषण’ डॉ. विजय पांडुरंग भटकर यांना यंदाचा ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बंगाली साहित्य क्षेत्रातील प्रतिथयश संस्था कोलकातास्थित ‘श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालय’ यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कोलकाता येथे १९१८ मध्ये स्थापित, ‘श्री बडाबाजार कुमारसभा ग्रंथालय’ आज देशातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचे एक सुप्रसिद्ध नाव आहे. ते केवळ ग्रंथालय नाही, तर राष्ट्रीय वारसा पुढे नेणारी ही एक शैक्षणिक आणि साहित्यिक संस्था आहे.


एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोरोनाचे नियमांचे पालन करीत निमंत्रितांच्या उपस्थितीत पुण्यात ‘भांडारकर संस्थे’च्या सभागृहात येत्या गुरूवार, दि. ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. भटकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


‘समरसता गुरुकुलम्’चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधर हे आभासी पद्धतीने सहभागी होऊन या समारंभास संबोधित करतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रेमशंकर त्रिपाठी यांनी दिली.



‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान’ हा पुरस्कार ‘श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालय’ संस्थेने १९९० साली सुरू केला असून पुरस्काराचे यंदा ३१ वे वर्ष आहे. संस्थेतर्फ पहिला पुरस्कार डॉ. श्रीधर भास्कर वेर्णेकर यांना प्रदान करण्यात आला होता. गेल्या वर्षी ज्येष्ठ पत्रकार, लेखक हृदय नारायण दीक्षित यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आलेले होते.



डॉ. विजय भटकर यांचा परिचय


‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘महाराष्ट्र भूषण’ यासारख्या अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या डॉ. विजय भटकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यामधील मूर्तिजापूर तालुक्यातल्या मुरंबा गावात दि. ११ ऑक्टोबर, १९४६ रोजी झाला. मूर्तिजापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपुरातील ‘विश्वेश्वरय्या नॅशनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ (व्हीएनआयटी) येथून अभियांत्रिकीची पदवी संपादित केली. त्यानंतर ‘आयआयटी’ मुंबई येथून त्यांनी एम.टेकचे शिक्षण पूर्ण केले. त्यासोबतच वडोदरा येथील ‘सयाजीराव गायकवाड विद्यापीठा’तून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ’आयआयटी’ दिल्ली येथून पीएच.डी पदवी संपादित केली.


शैक्षणिक प्रवास पूर्ण झाल्यानंतर डॉ. भटकर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ’इलेक्ट्रॉनिक्स कमिशन’मध्ये दहा वर्षे कार्यरत होते. त्यानंतर ते देशभरातील विविध संस्थांमध्ये आपले योगदान देत राहिले. डॉ. भटकर यांनी १९९३ साली ’परम-८००’ आणि १९९८मध्ये ’परम-१०,०००’ हे सुपर कॉम्प्युटर्स बनवले असून विविध संस्थांच्या माध्यमातून देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन कोलकाता येथील ‘श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालय’ या सुप्रसिद्ध संस्थेतर्फे यंदाचा ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर झाला आहे.


श्री बडाबाजार कुमारसभा ग्रंथालय: संस्था परिचय


कोलकाता येथे १९१८ मध्ये स्थापित, ‘श्री बडाबाजार कुमारसभा ग्रंथालय’ आज देशातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचे एक सुप्रसिद्ध नाव आहे. ते केवळ ग्रंथालय नाही, तर राष्ट्रीय वारसा पुढे नेणारी ही एक शैक्षणिक आणि साहित्यिक संस्था आहे. बडाबाजार एक उत्तम दर्जेदार वाचनालय असून त्यात विविध प्रसंगी चर्चासत्रे, व्याख्याने, साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यांची ३० पेक्षा जास्त प्रकाशने आहेत. तीन अखिल भारतीय स्तरावरील पुरस्कार ‘विवेकानंद सेवा सन्मान’, ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा शिखर प्रतिभा सन्मान’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ सन्मानाने संस्थेच्या कामाला वेगळेपण दिले आहे. जागरूक आणि सक्षम संस्था म्हणून ‘श्री बडाबाजार कुमारसभा ग्रंथालय’ गतिशील आहे.





@@AUTHORINFO_V1@@