नवीन खेळाडू मास्टरब्लास्टर सचिनकडून, क्रिकेटचे धडे गिरवत असतात, ते त्यांच्या खेळाचे, स्टाईलचे आणि स्टॅमिना सांभाळायचे तंत्र मॉडेलिंगमधून शिकत असतात. या अनुकरणातून खेळाडूंना प्रेरणा, कौशल्य आणि भावनिक समतोल कसा साधायचा याचे धडे मिळतात. वर्तणुकीच्या सुदृढीकरणामुळे एखादी व्यक्ती त्याला मिळालेल्या बक्षिसांमुळे, प्रोत्साहनामुळे ती खास वागणूक सुदृढ किंवा मजबूत करते. त्यामुळे खेळाचे विशेष कौशल्य आणि खेळाची गुणवत्ता व दर्जा खेळाडू सुधारू शकतो.
माणसाच्या व्यक्तिमत्त्वात त्याच्या आयुष्यातील यश लपलेले आहे. अर्थात, यशाची परिभाषासुद्धा प्रत्येक व्यक्तीसाठी खास असते. खेळाच्या दुनियेत यशाची अभिव्यक्ती खूप महत्त्वाची ठरते. संशोधनातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू आणि खेळाची एकंदरीत तयारी व यश यांची सांगड घातली गेली आहे. याशिवाय व्यक्तिमत्त्ववैशिष्ट्याच्या आरोग्यमय सवयी व शारीरिक व्यायाम यांच्याशी संबंध दर्शविणारे अनेक शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. मानसशास्त्रीय सिद्धान्तात व्यक्तिमत्त्वाचे विविध प्रकार यावर भरपूर संशोधन झाले आहे. फार पूर्वी हॅन्स आइझेक आणि रेमंड कॅटेल या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचे घटक अनुवांशिक असतात आणि ते स्थानिक असतात, असे सुचविले होते. या अनुवांशिक सिद्धान्तानुसार माणसाला जे व्यक्तिमत्त्व पूर्वजांकडून जन्मजात मिळाले, त्यात नंतर फारसा बदल होणार नाही, याला ‘ट्रेट थिअरी’ म्हणतात. यात मुख्यत्वेकरून दोन गट आहेत. अ गटात (टाईप ए) स्पर्धात्मक प्रवृत्ती, उच्च महत्त्वाकांक्षा प्रभावी असते आणि सहनशीलता कमी दिसून येते. या ‘अ’ गटातील लोकांना मनाविरुद्ध काही घडले किंवा मनासारखे अपेक्षित यश मिळाले नाही, तर त्याचा फ्यूज उडून जातो वा ‘शॉर्ट सर्किट’ होते. या गटातील खेळाडूंचा मनावरचा कंट्रोल जातो.
भावनिक तोल ढळतो. अपेक्षाभंगावर त्यांना मात करता येत नाही, ते अमर्याद आक्रमक होतात. वाईट शब्द वापरतात. शिवीगाळ करतात. खेळाच्या मैदानावर स्पर्धकास शारीरिक हल्लेही करतात. आपण या गोष्टी टीव्हीवर अनेकदा पहिल्या आहेत. जगप्रसिद्ध टेनिस खेळाडू सेरेना विलीयम अत्यंत कुशल खेळाडू; पण तिनेसुद्धा तिच्या स्पर्धकाला शिवीगाळ करताना आपण पाहिले. डीएगो मॅरडोना फुटबॉल प्लेअर, ज्याला या खेळातील देव मानले जाते, तोसुद्धा अत्यंत आक्रमक. फुटबॉलच्या मैदानात उत्तम; पण जेव्हा तो एखाद्या कॅमेरामनला मारझोड करतो, तेव्हा खेळनीतीचा अपमानच होतो. कितीतरी असे खेळाडू आहेत, जे खेळासाठी प्रसिद्ध आहेत. पण, ‘अ’ टाईपच्या व्यक्तिमत्त्वामुळे ‘मी परमेश्वरापेक्षा मोठा’ म्हणून अत्यंत वाईट वागणुकीसाठी कुप्रसिद्ध आहेत. अर्थात, यांचा अंगभूत जुनून आणि आकाशाचीच मर्यादा मानायची प्रवृत्ती त्यांचा खेळ झुंझार आणि प्रेक्षणीय बनविते.
आपण कपिलदेवची स्पर्धात्मक प्रवृत्ती आणि तडाखेबाज क्रिकेट पाहिलेले आहे. सुुरुवातीची तारुण्यातली वर्षे सोडली, तर अनुभवाने हा खेळाडू प्रगल्भ कॅप्टन झाला आणि त्याने पाहता पाहता थाटात ‘वर्ल्ड कप’ जिंकून भारतात आणला. त्याच्या आक्रमकतेच्या खेळाला एक शानदार चमक आली. त्या आक्रमकतेत एका दिमाखदार राजाच्या वागणुकीची झलक प्रकर्षाने लोकांना दिसून आली. अर्थात, चिडक्या आणि आक्रमक खेळांडूचा मैदानावरच्या वेडेपणात प्रेषक एक वेगळीच मजा चाखतात तो भाग वेगळा. बर्याच जणांना आपल्याच नैराश्याजनक आक्रमक भावना हे खेळाडू व्यक्त करतात की काय, असं वाटतं.
दुसर्या गटात ‘ब’ प्रवृत्तीचे अगदी विरुद्ध धु्रवावर वस्तीला असणारे लोक असतात. त्यांच्यात सौम्यता असते. सहनशीलता असते. विपरीत परिस्थितीला समजून घेण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्यात चंचलता कमी असते व धीरगंभीरता अधिक असते. मूड स्थिरावलेला असतो. महत्त्वाकांक्षा मोठी असते. यशाची मनीषा असते. पण, तरीही ते शांत असतात. चिंतेला मुठीत बंद करून सामना करायची त्यांची वृत्ती असते. अवघड परिस्थितीत हातातोंडाशी आलेला घास निसटून जात असतानासुद्धा आपली विधायकता आणि कल्पकता वापरून आपली ‘नैया’ पैलतीरी पोहोचवायचे अजब कसब या व्यक्तींकडे असते.
माही धोनीला आपण कितीवेळा आपल्या हृदयाचे ठोके चुकत असताना मैदानावर खरोखर परिस्थिती शांतपणे, निर्भयपणे आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून हाताळताना पाहिले आहे. मैदानावरील आपत्कालीन परिस्थितीचा तो योग्य आढावा घेतो. फलंदाजी करत असो, ‘विकेटकिपिंग’ करत असो वा कप्तानपदाची जबाबदारी असो, माही आपल्या विचारांना चालना देताना दिसतो. कर्मभूमीवर पुढचा पवित्रा काय घ्यायचा, कुठली स्ट्रॅटेजी वापरायची, कुठला प्यादा कुठे सरकवायचा, याचं उत्तम बुद्धिबळ तो खेळतो. संधीचा फायदा कसा उचलायचा हे माही, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रवीड यांच्याकडून तरुणांनी शिकावे. कधी चौक्यांची आणि छक्क्यांची आतशबाजी करायची आणि कधी दम घ्यायचा याचा हिशोब या मंडळींना चांगला समजतो. खेळामध्ये आक्रमकता हा त्या खेळाचा अविभाज्य घटक असतो. फुटबॉल आणि रग्बीसारखे खेळ आक्रमकतेच्या शस्त्राशिवाय खेळता येत नाहीत. पण, मैदानावरची ती आक्रमकता खिलाडू प्रवृत्तीची असते, विधायक असते. रिंगणाबाहेरची आक्रमकता चिडीची किंवा रडीची असते, म्हणून विनाशकारी असते, अवास्तव असते.
व्यक्तिमत्त्व विकासाचा दुसरा एक महत्त्वाचा सिद्धान्त असे सांगतो की, व्यक्तिमत्त्व हा स्थिर प्रवृत्तीचा भाग नसून, ते सामाजिक आणि परिस्थितीजन्य स्थित्यंतरानुसार वा बदलांनुसार सतत बदलत असते. आपल्या सभोवताली घडणार्या प्रसंगानुरूप वा आपण ज्या माणसांमध्ये वावरत असतो, त्यांचा आपल्यावर किती प्रभाव पडतो, यावरही काही गोष्टी बदलत जातात. यात महत्त्वाचा आणि लक्षणीय मुद्दा असा आहे की, आपल्या बाह्य परिस्थितीच्या प्रभावावरही व्यक्तिमत्त्वाची जडणघडण अवलंबून असते. त्यात वागणुकीचे अनुकरण किंवा मॉडेलिंग जितके महत्त्वाचे, तितकेच त्या वागणुकीचे सुदृढीकरण (reinforcement)सुद्धा विश्लेषणीय ठरते. नवीन खेळाडू मास्टरब्लास्टर सचिनकडून, क्रिकेटचे धडे गिरवत असतात, ते त्यांच्या खेळाचे, स्टाईलचे आणि स्टॅमिना सांभाळायचे तंत्र मॉडेलिंगमधून शिकत असतात. या अनुकरणातून खेळाडूंना प्रेरणा, कौशल्य आणि भावनिक समतोल कसा साधायचा याचे धडे मिळतात. वर्तणुकीच्या सुदृढीकरणामुळे एखादी व्यक्ती त्याला मिळालेल्या बक्षिसांमुळे, प्रोत्साहनामुळे ती खास वागणूक सुदृढ किंवा मजबूत करते. त्यामुळे खेळाचे विशेष कौशल्य आणि खेळाची गुणवत्ता व दर्जा खेळाडू सुधारू शकतो. उत्तम खेळ खेळण्याची प्रवृत्ती व कल खेळाडूमध्ये प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि विविध बक्षिसांनी विकसित होते. अर्थात, या प्रवृत्तीचे हावरेपणात रूपांतर होऊ नये, नाहीतर खेळाचा स्वार्थी ‘बिझिनेस’ बनतो.
-डॅा. शुभांगी पारकर