कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांची नियुक्ती केली आहे
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कामकाजावर कोलकाता उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश न्या. मंजुला चेल्लुर देखरेख ठेवणार आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसेचे सत्र सुरु झाले होते. प्रामुख्याने भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांसह सर्वसामान्य नागरिकांना त्यामध्ये लक्ष्य करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकाराची सीबीआय आणि एसआयटी चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले होते.
उच्च न्यायालयाने १९ ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालामध्ये हत्या आणि बलात्काराच्या प्रकरणांची चौकशी एसआयटीतर्फे करण्याच येईल, असे म्हटले होते. न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश त्याचवेळी दिले होते, त्यानंतर आता कोलकाता उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश न्या. मंजुला चेल्लुर यांची एसआयटीच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याअंतर्गत न्या. चेल्लुर यांना नियुक्त केलेल्या कामासंदर्भात कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्याचा, वास्तव्य करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला असून त्याची संपूर्ण जबाबदारी प. बंगालच्या मुख्य सचिवांवर सोपविली आहे.
प. बंगाल विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर
केंद्रीय निवडणूक आयोगाने प. बंगालमधील भवानीपूर, शमशेरगंज आणि जंगीपूर या तीन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. मतदान ३० सप्टेंबर रोजी तर मतमोजणी ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.