डोंबिवली बलात्कार प्रकरणातील २१ आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

29 Sep 2021 19:19:51
rape photo_1  H 





डोंबिवली : डोंबिवलीतील अल्पवयीन तरूणींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात या आरोपींना आज हजर करण्यात आले होते. गुन्हा दाखल होताच पोलिसानी २४ तासांत अटक केलेल्या आरोपीना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यात वाढ करुन पुन्हा ४ऑक्टोबर्पयत पोलिस कोठडी वाढविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.



ही घटना संवेदनशील असल्याने जलद गती न्यायालयात खटला चालविण्यात आला आहे. या प्रकरणातील २१ आरोपींना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अल्पवयीन तरूणींवर तिच्या प्रियकराने बलात्कार करीत एक व्हिडीओ तयार केला होता. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या तरूणींवर अन्य तरूणांनी देखील बलात्कार केला. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणातील २३ आरोपींना अटक केली होती. त्यापैकी २१ आरोपींना मानपाडा पोलिसांनी या आधी न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणात वापरण्यात आलेली विविध वाहने अजून जप्त करणे बाकी आहे.


तसेच तरूणींवर नशेच्या पदार्थाचा वापर करून बलात्कार करण्यात आला होता. त्याचा वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी वेळ मागितली आहे. पोलिसांकडून आज पुन्हा सात दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. परंतु न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सात ते आठ वकील खटला लढवित आहेत. न्यायालयात आरोपींना आणल्यानंतर प्रथम सात -सात आणि आठ जणाचा गट करून सुनावणी करण्यात आली.
 आरोपींना नावे विचारून पोलिसांकडून काही त्रास आहे का हे विचारले.



त्याला आरोपींनी नाही असे उत्तर दिले. पोलिसांना तपासासाठी आठ दिवस हा पुरेसा वेळ दिला होता. मात्र तरीही त्यांनी तपासासाठी आणखी वेळ मागितल्याने पोलिस काय करीत होते असा प्रश्न बचाव पक्षाच्या वकीलांकडून विचारला गेला. हे प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याने आरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या बाहेर एकच गर्दी केली होती. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.  







 

Powered By Sangraha 9.0