मुंबई : सध्या आयपीएल २०२१ ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळी नुकतेच झालेल्या सनरायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात हैद्राबाद संघाने स्पर्धेतील दुसरा विजय साजरा केला. १० सामान्यांनंतर हैद्राबादच्या खात्यामध्ये फक्त ४ गुण जमा असल्याने आता प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र, असे असले तरीही, सर्वांच्या नजरा या डेव्हिड वॉर्नरलाच शोधात होत्या. तो मैदानावर दिसला नाही, आणि सोशल मिडियावर चर्चांना उधान आले. ऑरेंज आर्मीत वॉर्नरने आपला शेवटचा सामना खेळला आहे, असे मतही दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केले.
आधी सनरायझर्स हैद्राबादचा यशस्वी कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नरची ओळख होती. तर, आयपीएल २०२१मध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. याचा परिणाम म्हणून त्याला अनेकवेळा संघातून वगळण्यात आले. विशेष म्हणजे नुकतेच राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये तो साधा मैदाबाहेरही दिसला नाही. त्याला हैद्राबाद संघातूनच डच्चू दिल्याची चर्चा सुरु झाली. वॉर्नर पुन्हा हैद्राबादसाठी खेळताना दिसणार नाही, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. मात्र, यावर सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी वॉर्नरच्या अनुपस्थितीवर स्पष्टीकरण दिले.
प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस पत्रकार परिषदेत सांगितले की, "आमच्या संघात बरेच युवा खेळाडू आहेत आणि या सामन्यापूर्वी आम्ही ठरवले, की आम्ही संघात काही बदल करणार आहोत. युवा खेळाडूंना स्टेडियमचा अनुभव मिळण्यासाठी डेव्हिड वॉर्नरने हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. आमच्याकडे बरेच खेळाडू आहेत, जे हॉटेलमध्ये राहिले आणि त्यांना मैदानावर राहण्याचा अनुभवही नव्हता. त्यामुळे आम्हाला त्या सर्व तरुणांना जास्तीत जास्त अनुभव द्यायचा आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर, केदार जाधव आणि शाहबाज नदीम हे खेळाडू मैदानावर आले नाहीत." असे स्पष्ट केले आहे.