पाकी अण्वस्त्रांवर तालिबानचा डोळा

28 Sep 2021 21:41:37

taliban_1  H x

ज्या दिवसापासून अफगाणिस्तानवर ‘तालिबान राज’ प्रस्थापित झाले, त्या दिवसापासूनच या माथेफिरू दहशतवाद्यांच्या हाती नेमकी किती आणि कोणकोणती शस्त्रास्त्रे लागली आहेत, याचे अनेक कयास बांधले गेले. अमेरिकेने सैन्य माघारी घेताना अफगाणिस्तानातील त्यांच्या शस्त्रास्त्रांची विल्हेवाट लावली असली, तरीही काही शस्त्रास्त्रे, सैनिकी वाहनांवर मात्र तालिबानने कब्जा केलाच.

त्याविषयीच्या बातम्याही कालांतराने बाहेर आल्या आणि अमेरिकेच्या या घोडचुकीची किंमत कशी निर्दोष अफगाणींबरोबर अख्ख्या जगालाही मोजावी लागेल, यावरूनही वादविवाद रंगले. त्याच सुमारास दबक्या आवाजात आणखीन एक चिंतेचा सूर आळवला गेला. तो म्हणजे, तालिबानच्या हाती घातक अण्वस्त्रे लागली तर... अफगाणिस्तान हा अण्वस्त्रसंपन्न देश सुदैवाने नसला तरी त्याचा शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या भात्यात मात्र दीडशेहून अधिक अण्वस्त्रांचा शस्त्रसाठा असल्याचे आकडेवारी सांगते. पण, जर अण्वस्त्रे पाकिस्तानात असतील, तर अफगाणिस्तानमध्ये बसलेले तालिबानी त्यांचा ताबा कसे घेऊ शकतात, असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक. परंतु, खुद्द अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार राहिलेल्या एका जबाबदार अधिकार्‍याने यासंबंधीचा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद भूषविलेले जॉन बॉल्टन यांनी ही भीती व्यक्त नुकतीच व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारपदी राहिलेले बॉल्टन यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याकडे आजघडीला भारतासह अन्य देशांनाही अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, तालिबानने अफगाणभूमीत जरी जम बसवून उच्छाद मांडला असला, तरी आगामी काळात तालिबान आपला मोर्चा पाकिस्तानकडेही वळवू शकतो. त्यातच तालिबान आणि पाकिस्तान सरकार, तेथील लष्कर आणि गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’चे घनिष्ट संबंध अजिबात लपून राहिलेले नाहीत. तसेच तालिबानला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील ‘ड्युरंड रेषे’ची सीमाही मान्य नाही. तसेच पश्चिम पाकिस्तानातील पश्तूनबहुल भाग हा अफगाणिस्तानचाच प्रदेश असल्याचे ते मानतात. तेव्हा, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पोसलेले हे कट्टर तालिबानी अफगाणिस्तानमध्ये काहीसे स्थिरस्थावर झाल्यावर आपला मोर्चा पाकिस्तानकडेही वळवू शकतात. त्यामुळे ज्या विषारी सापाला पाकिस्तानने गेली कित्येक वर्षे आपल्या फायद्यासाठी दूध पाजले, ते विषारी तालिबान अधिक ताकदवर होऊन पाकिस्तानचेच लचके तोडण्याचे मनसुबे बाळगून आहे. तसे झाल्यास पाकिस्तानातील अण्वस्त्रांचे काय होणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो.


अण्वस्त्रांची भयाण दाहकता एखाद्या देशाला, तेथील नागरिकांच्या आयुष्याला कसे उद्ध्वस्त करू शकते, याचा कटू अनुभव जपानवरील हिरोशीमा-नागासाकीच्या हल्ल्यानंतर अवघ्या जगाने घेतला. त्यानंतरच अशा हुकूमशाहीप्रधान, कट्टरतावादी विचारसरणीच्या देशांच्या हाती अण्वस्त्रे लागू नये, म्हणून आजही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न सुरूच आहेत. पण, दुर्दैवाने संयुक्त राष्ट्रसंघासारख्या जागतिक संघटनेलाही अण्वस्त्रांचा प्रचार-प्रसार रोखण्यात यश आलेले नाहीच. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानवर तालिबानी टोळधाडीने आक्रमण केले, तर तेथील अण्वस्त्रे या धर्मांधांच्या हाती लागणार नाहीत, याची आजघडीला कोणीही शाश्वती देऊ शकत नाहीच.एकीकडे अमेरिकेत ही चिंता व्यक्त केली जात असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानच्या एका मौलानाने जामिया हफ्सा इमारतीवर तालिबानी झेंडा फडकावण्याचा प्रताप केला. इस्लामाबादेतील पोलीस जेव्हा हा झेंडा खाली काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मौलाना महाशयांनी त्यांना चक्क पिटाळून लावले. याउलट चित्र दिसले ते अफगाणिस्तानात. पाकिस्तानातून अफगाणिस्तानमध्ये मदत साम्रगी घेऊन जाणार्‍या ट्रकवरील पाकिस्तानचा झेंडाच तालिबानींनी आवेशाने उखडून फेकला.


म्हणजेच काय तर पाकिस्तानातील कडव्या धर्मांधांना पाकिस्तानातही तालिबानी राजवटीची स्वप्ने पडू लागली आहेत, तर दुसरीकडे तालिबानच्या लेखी पाकिस्तानला फारशी किंमत नाहीच. त्यातच पाकप्रणीत ‘हक्कानी नेटवर्क’ आणि तालिबानमधील उफाळून आलेल्या सुंदोपसुंदीमुळे आगामी काळात ‘तालिबान विरुद्ध पाकिस्तान’ संघर्ष अधिक तीव्र होण्याचीच शक्यता अधिक आहे.



Powered By Sangraha 9.0