मुंबई : सोमवारी देशाभरात केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक पुकारली होती. यावेळी काही शेतकऱ्यांनी देशात विविध ठिकाणी शांततेत आंदोलने केली. मात्र, मागील काही आंदोलनांचे परिणाम बघता या आंदोलनात घुसून आपला हेतू साध्य करू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांपासून शेतकरी आंदोलकांनी दूर राहण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर गाझीपुर सीमेवर झालेल्या एका आंदोलनात कॉंग्रेसच्या एका नेत्याने घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी त्यांना घराचा रस्ता दाखवला.
सोमवारी 'संयुक्त किसान मोर्चा'च्या नेतृत्वाखाली हा भारत बंदची घोषणा करण्यात आली. याचा अनेक राजकीय पक्षांचा पाठींबा आहे. मात्र याचा दरम्यान दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी थेट गाझीपूर सीमेवर पोहचले. परंतु, आंदोलकांनी मात्र 'हे राजकीय आंदोलन नाही' असे सांगत चौधरी यांना घरचा रस्ता दाखवला. यानंतर त्यांनादेखील माघार घेत या आंदोलनाच्या ठिकाणाहून बाहेर पडावे लागले. याचा एक व्हिडियो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच वायरल होत आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते प्रविण मलिक यांनी यावेळी सांगितले की, "भारत बंदला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही राजकीय नेत्यांचे आभार मानतो. परंतु, आमच्या प्रश्नांचा आणि मंचाचा राजकारणाशी संबंध नाही. आम्ही राजकीय पक्षांना आमच्या मंचावर परवानगी देणार नसल्याचे आम्ही आधीच जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही त्यांना शेतकरी आंदोलन स्थळापासून थोड्या अंतरावर आपले आंदोलन करण्याची विनंती केली."