आत्मविश्वास माणसाचा सर्वसामान्य विश्वास आणि अपेक्षा यामध्ये रूजलेला असतो. अनेक व्याख्या आत्मविश्वासाचे वर्णन करतात, पण प्रामुख्याने आत्मविश्वासाचे वर्णन करताना व्यक्तीला आपली क्षमता आणि अपेक्षा याची खोली नक्की समजली पाहिजे आणि त्याचा आपण आपल्या यशप्राप्तीसाठी कसा व्यवस्थित उपयोग करून घेऊ शकतो, याचे सार्थ गणित समजले पाहिजे.
‘आत्मविश्वास’ ही माणसाच्या यशाची एक महत्त्वाची ‘मास्टर की’ किंवा ‘गुरुकिल्ली’ आहे. यशस्वी व्यायामपटू, धावपटू किंवा इतर खेळाडूंनी आत्मविश्वास हा मानसिक सक्षमता आणि लवचिकता यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानलेला आहे. खेळाच्या कौशल्याबरोबरच या सफल आणि कुशल खेळाडूंना आपल्या मानसिक शिक्षणात आत्मविश्वास घडवायचा आणि तो टिकवायचा, यावर अधिक भर देण्यावर जोर दिलेला आहे, हे का महत्त्वाचे आहे? तर आत्मविश्वास हा कायम स्थिरावणारा भाव नाही. तो जितका खेळाडूंच्या उत्तम तयारीसाठी आणि निर्णयात्मक विजयासाठी महत्त्वाचा आहे, तितकाच तो कुठल्याही क्षणी कमजोर होऊ शकतो, हे जाणून घेणेही अत्यंत महत्त्वाचे ठरते. स्त्रियांच्या ‘सॉकर’मध्ये सुप्रसिद्ध असलेली मिय हॅम म्हणते की, “आत्मविश्वास म्हणजे नक्की काय, हे लोकांना खर्या अर्थाने कळलेलेच दिसत नाही. ती खरेतर दैनंदिन बाब आहे. आत्मविश्वास टिकवणे ही कठीण गोष्ट आहे.” खेळामध्ये आत्मविश्वास टिकवायचा असेल, तर त्याचे मनोभावे दिवसागणिक संगोपन करावे लागते. तुम्ही मैदानावर गेलात आणि दिव्याचे बटण चालू केल्यावर प्रकाशित होणार्या दिव्यासारखा आत्मविश्वास नसतो. माझा आत्मविश्वास पूर्ण आहे, असं म्हणून आत्मविश्वास येत नाही. त्याला पूर्ण लक्ष केंद्रित करून जोपासावे लागते, अनेक खेळाडूंचा आत्मविश्वास अगदी मोक्याच्या क्षणी डळमळतो आणि त्यांना पराभव पत्कारावा लागतो. त्या अर्थाने आत्मविश्वास ही मनाची अत्यंत नाजूक स्थिती आहे. विजयाच्या शिखराजवळ पोहोचून यशाचा वंचित झालेला सक्षम खेळाडू केवळ आत्मविश्वासाने दगा दिल्याने कुठल्याकुठे घरंगळत गेले. आत्मविश्वासाच्या दोलायमान स्थितीवर खेळाडूचा सर्वोत्कृष्ट वा निकृष्ट निकाल आपण क्रीडा स्पर्धेत पाहतो. खेळाच्या स्पर्धेत जिंकू वा मरू, अशी स्थिती असताना किंवा हाता-तोंडाशी आलेला विजय निसटू पाहताना जी उत्कट आणि चिवट झुंज द्यायची सक्षमता आणि मनाचा कणखरपणा धावपटूंना वा इतर खेळाडूंना लागतो, तो त्यांच्या स्थिर चित्रात तितक्याच अविरतपणे स्थिरावलेल्या आत्मविश्वासाने येत असतो. खेळाडूंचे मानसिक सामर्थ्य विशेषतः अटीतटीच्या झुंजीत आणि आणीबाणीच्या परिस्थितीत ते याच दृढ आणि भक्कम आत्मविश्वासाच्या जोरावर! हा आत्मविश्वास खर्या अर्थाने शिवाजी महाराजांचा व त्यांच्या विश्वासू मराठ्यांच्या विशेषतः बाजीप्रभू देशपांडे आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं’ म्हणणार्या तानाजी मालुसरेंच्या सक्षमतेचा आहे, गंभीर आहे, अतूट आहे. हा आत्मविश्वास अनवाणी पायाने केवळ आत्मविश्वासाच्या स्नायूंच्या बळावर धावणार्या ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंगचा आहे. खेळाडूचा आत्मविश्वास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. हे जाणून खेळाडूंना अगदी लहानपणापासून तो कसा घडवायचा आणि मुख्य म्हणजे कसा टिकवायचा, यावर मुलांच्या पालकांनी आणि प्रशिक्षकांनी काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
आत्मविश्वास माणसाचा सर्वसामान्य विश्वास आणि अपेक्षा यामध्ये रूजलेला असतो. अनेक व्याख्या आत्मविश्वासाचे वर्णन करतात, पण प्रामुख्याने आत्मविश्वासाचे वर्णन करताना व्यक्तीला आपली क्षमता आणि अपेक्षा याची खोली नक्की समजली पाहिजे आणि त्याचा आपण आपल्या यशप्राप्तीसाठी कसा व्यवस्थित उपयोग करून घेऊ शकतो, याचे सार्थ गणित समजले पाहिजे. तथापि मैदानावर खेळ खेळताना या आत्मविश्वासाच्या अनेक पातळ्यांचेसुद्धा खेळाडूला भान असण आवश्यक आहे. उदा. आपला वैयक्तिक आत्मविश्वास कळला, तरी बॅडमिंटन किंवा टेनिसमध्ये तुम्ही डबल किंवा जोडीने खेळता तेव्हा आपल्या जोडीदाराचा आत्मविश्वास, त्यात आपली भूमिका कशी असावी, याबद्दल आत्मविश्वास, आपल्या हॉकीसारख्या, टीमवरचा विश्वास, प्रशिक्षकावरचा विश्वास संस्थात्मक विश्वास अशा अनेक पातळ्यांवर विश्वासाचे थर पसरलेले आहेत. त्या सगळ्या थरांचा खोलवर आढावा घेणे खेळाडूंना त्याक्षणी आवश्यक आहे. मनू भाकर... अत्यंत सक्षम आणि कुशल अशी भारताची प्रसिद्ध शूटिंग खेळाडू.. तिचे अपयश तिच्या प्रशिक्षकामुळे झाले असावे, असे सांगितले जाते. जसपाल राणा या प्रशिक्षकाने तिला अजिबात ‘सपोर्ट’ केला नाही, असे तिने नंतर व्यक्त केले. ऐनवेळी त्याने तिला काही स्पर्धांच्या ‘इव्हेंट’मध्ये खेळायला मनाई केल्यामुळे तिने तिचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावला. याच्या अगदी विरुद्ध उदाहरण म्हणजे भारताची महान धावपटू जिला ‘पायोली एक्सप्रेस’ म्हणून ओळखले जाते, अशी पी. टी. उषा आणि ‘द्रोणाचार्य’ सन्मानाने गौरविलेले तिचे गुरू ओम नांबियार यांची गुरुशिष्य जोडी. ओम नांबियार यांचा अलीकडेच ऑगस्टमध्ये मृत्यू झाला तेव्हा पी. टी. उषा अत्यंत भावूक होऊन म्हणाली की, “माझ्या गुरुच्या या इहलोकातून जाण्याने माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक प्रकाश लुप्त झाला आहे. माझ्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.” गुरू किंवा प्रशिक्षकाची एखाद्या खेळाडूच्या सर्वार्थाने बनविण्यात आणि त्यांचे आत्मविश्वासाचे बळ वाढविण्यात जबरदस्त भूमिका असते. याशिवाय ‘पार्टनर’ आणि ‘टीम’चे अनमोल सहकार्यसुद्धा अमूल्य आहे. ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर आपल्या गुरुंबद्दल रमाकांत आचरेकरांबद्दल भरभरून बोलत असतो. असे गुरू आणि असे यशस्वी शिष्य म्हणजे खेळाच्या दुनियेतील एक महान सुवर्णयुगच असते. (क्रमशः)
- डॉ. शुभांगी पारकर