मुंबई : माजी उपमहापौर, मालाड प्रभाग क्रमांक ४५ चे भाजप ज्येष्ठ नगरसेवक राम बारोट (वय ७५) यांचे रविवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्यावर सोमवार २७ सप्टेंबरला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९९२ पासून सलग सहा वेळा मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या डॉ. राम बारोट यांनी उपमहापौर पदासह पालिकेत सुधार समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष व आरोग्य समिती अध्यक्ष ही पदेही भूषवली होती.
मालाड विधानसभेमधूनही त्यांनी आमदारकीसाठी निवडणूक लढवली होती. मालाड पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या सबवेसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. हा सबवे म्हणजे मालाडकरांसाठी त्यांनी दिलेली ही एक अनमोल भेट आहे. वाढत्या वयातही सामाजिक कार्यात स्वतःला लोटुन दिलेल्या डॉ. बारोट यांचे मालाडकरांशी कौटुंबिक संबंध होते. डॉ. बारोट यांच्या निधनामुळे भाजपाने एक सच्चा कार्यकर्ता गमावला आहे.