‘एनएससीएन-आयएम’चा खरा चेहरा; नागा शांतता करार

25 Sep 2021 20:45:27

vividha 5_1  H

बुधवारीच मणिपूरचे मोठे नागा नेते अ‍ॅथोआं अबोनमै यांचे अपहरण व हत्या ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालीम’ (एनएससीएन-आयएम) च्या बंडखोर गटाने तामेंग्लाँग येथे केली. या गटाशी काही कारणामुळे अबोनमै यांचे मतभेद झाले होते. तेव्हापासून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पोलीस संरक्षण असतानाही ही कारवाई केली गेली असल्यामुळे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेंद्र सिंग अत्यंत चिडले आहेत व यापायी अधिकार्‍यांसह १६ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारने पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली चौकशीचे आदेशही दिले आहेत. या गुन्ह्यातील गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.

नागा शांतता प्रयत्नातील केंद्र सरकारतर्फे प्रमुख संवादक म्हणून भूमिका निभावणारे नागालँडचे तत्कालीन राज्यपाल आर. एन. रवि यांनी तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या आठवड्यात नागा शांतता करारातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्र सरकारने आता गुप्तचर यंत्रणेचे माजी विशेष संचालक ए. के. मिश्रा यांना नागा गटांसोबत शांतता चर्चा करण्यासाठी नियुक्त केलेले आहे. आसामचे आणि नागालँडचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि नेफियू रिओ यांनी मंगळवारी दिमापूर येथे ‘एनएससीएन-आयएम’चे सरचिटणीस थुईंगांग मुईवाहची भेट घेतली.

पडद्यासमोर या सगळ्या हालचाली चालू असताना पडद्यामागे ‘एनएससीएन-आयएम’ या दहशतवादी संघटनेच्या सैन्याधिकार्‍याने अरुणाचलातील तिराप, चांगलांग आणि लाँगडिंग या नागालँडच्या सीमावर्ती जिल्ह्यातील संसद सदस्यांसाठी एक धमकीवजा परिपत्रक जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, स्थानिक आमदारांनी अरुणाचल सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा आणि असे न करणारे सामान्यजन किंवा नेतेमंडळी कोणीही नागा समाज विरोधक किंवा ‘अँटिनागा’ म्हणून गणले जातील.त्याचे असे झाले आहे की, लाँगडिंगच्या जिल्हा अधिकार्‍यांनी जारी केलेल्या ‘अनुसूचित जातीं’च्या प्रमाणपत्रांमध्ये ‘नागा’ हा शब्द वगळलेला आहे. हा नागा जनजातींचा अपमान आहे आणि त्याचा निषेध न करणारे नागा समाजविरोधी आहेत, असे या दहशतवादी संघटनेचे मत आहे.

गमतीचा भाग असा की, नोक्ते, तांगसा आणि चांगलांगमधील अनुसूचित जमाती (एसटी) प्रमाणपत्रांमध्ये जोडलेला ‘नागा’ शब्द ‘सार्वजनिक जनमत चाचणीच्या आधारावर’ भारतीय संविधानात आवश्यक सुधारणांद्वारे नुकताच बंद करण्यात आला आहे. तिराप, चांगलंग आणि लोंगडिंग (टीसीएल)या जिल्ह्यांत राहणार्‍या लोकांना नागालँडशी जोडून घेण्याची कधीच इच्छा नव्हती. परिणामी, ते अरुणाचलचेच नागरिक आहेत. परंतु, या दहशतवादी कारवाया करणार्‍या गटांना या भूभागावरचे आणि इथल्या समाजावरचे प्रभुत्व अजिबात सोडायचे नाही. त्यांच्यासाठी इथले लोक कधीही पैसे काढता येणार्‍या स्वयंचलित मशीनप्रमाणे आहेत. या भागांतून पैसे उकळणे त्यांना सोपे जाते. पण, ‘नागा’ शब्दच या जनजातींच्या प्रमाणपत्रांमधून वगळला गेल्यामुळे स्वाभाविकतः सोन्याची अंडी देणारी कोंबडीच हातातून हिसकावल्यासारखी त्यांची अवस्था झालेली आहे आणि भारत सरकारच्या या खेळीचा त्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘टीसीएल’ जमातींना पूर्ण ‘एसटी’ दर्जा देऊन मोदी सरकारने चतुराईने केलेल्या कारवाईमुळे ते भयंकर संतापले आहेत. आजवर रिमोटकंट्रोलचा वापर करावा, तशा प्रकारे गुंडागर्दी करीत या गुंडांनी अरुणाचलातील या जिल्ह्यांची संसाधने अक्षरशः लुटली आहेत. ज्यांनी त्यांना विरोध केला, त्यांना अत्यंत क्रौर्याने मारून टाकले. याचे ताजे उदाहरण म्हणजे गेल्याच वर्षी स्थानिक आमदार तिरोंग अबोह यांची हत्या ‘एनएससीएन-आयएम’च्या गुंडांनी घडवून आणली. या हत्येतील प्रमुख आरोपी म्यानमारमध्ये कुठेतरी मजेत जीवन जगत आहे. भारतीय संघराज्यावर प्रेम करणारे, निष्ठावान अशा अनेक लोकांच्या हत्या अशाच प्रकारे गेली अनेक वर्षे केल्या जात आहेत.लोंगडिंगच्या ‘डीसीं’ना वर उल्लेखलेले धमकीवजा पत्र देऊन त्यांनी भारताच्या प्रशासन व्यवस्थेलाच आव्हान देण्याचे धाडस केले आहे. या भागातील अधिकारीवर्ग, नेतेमंडळी आणि सामान्य लोकांना दहशतवादी गट कशाप्रकारे वेठीस धरतात आणि धमकावतात, हे समजण्यासाठी हे पत्र म्हणजेच एक मोठा पुरावा आहे. अशा गोष्टी नेहमीच घडत आल्या असल्या तरी त्या कधीही सार्वजनिक होऊ शकत नाहीत किंवा केल्या जात नाही, असे म्हणू. या वेळी हे चेतावणी पत्र जिल्ह्यातील प्रशासन प्रमुखांनाच देण्यात आलेले असल्यामुळे यावर चर्चा झडत आहेत. या प्रकरणावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहेच. ‘टीसीएल’ लोक (तिराप, चांगलांग, लाँगडिंगमधील जनता) शांतताप्रेमी आहेत. ‘गन फॉर ए गन’ हा उपाय असू शकत नाही, हे ते जाणतात. परंतु, अशा किती लोकांचे अजून जीव जाणार या विचाराने अस्वस्थही होत राहतात.

कारण बुधवारीच मणिपूरचे मोठे नागा नेते अ‍ॅथोआं अबोनमै यांचे अपहरण व हत्या ‘नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालीम’ (एनएससीएन-आयएम) च्या बंडखोर गटाने तामेंग्लाँग येथे केली. या गटाशी काही कारणामुळे अबोनमै यांचे मतभेद झाले होते. तेव्हापासून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पोलीस संरक्षण असतानाही ही कारवाई केली गेली असल्यामुळे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेंद्र सिंग अत्यंत चिडले आहेत व यापायी अधिकार्‍यांसह १६  पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारने पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली चौकशीचे आदेशही दिले आहेत. या गुन्ह्यातील गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.
नागा शांतता करार सहजासहजी फलद्रूप होऊ नये, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. परंतु, भारत सरकार आणि भारतीय जनता यांच्या संयुक्त प्रयत्नाने लवकरच आपल्याला या मेहनतीची गोड फळे चाखायला मिळतील, अशी अशा नक्कीच निर्माण झाली आहे.

अमिता आपटे





 
Powered By Sangraha 9.0