अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ नये – पंतप्रधान नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2021
Total Views |
modi_1  H x W:

संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुधारणा अत्यंत गरजेच्या
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : अफगाणिस्तानमधील नाजुक परिस्थितीचा वापर अन्य देशांनी आपल्या स्वार्थासाठी करू नये, याकडे जागतिक समुदायास लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करतात, त्यांनादेखील दहशतवादाचा तेवढाच धोका आहे; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून सुनावले आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या ७६ व्या महासभेस संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, अफगाणिस्तानच्या सध्याच्या नाजुक स्थितीचा फायदा जगातील अन्य कोण्या देशाने आपल्या स्वार्थासाठी घेऊ नये, यासाठी जागतिक समुदायाने अतिशय काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. जगातील जे देश दहशतवादाचा वापर राजकीय हत्यार म्हणून अन्य देशांविरोधात करीत आहेत, त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी – ती म्हणजे दहशतवादाचा त्यांनाही तेवढाच धोका आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी चीन आणि पाकला इशारा दिला आहे.
 
 
जगातील समुद्री संसाधनांचा जबाबदारीने वापर होणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी मार्ग हा जागतिक वारसा आहे. त्यामुळे त्यांना विस्तारवादापासून वाचविणे ही जागतिक समुदायाची जबाबदारी आहे. त्यासाठी सुरक्षा परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेच्या काळात झालेली सहमती ही जगाला मार्गदर्शन ठरणार असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
 
 
करोना संसर्गाचे मूळ आणि जागतिक इज ऑफ डुईंग बिझनेस मानांकनाच्या प्रकरणामध्ये संयुक्त राष्ट्रांसह अन्य महत्वाच्या जागतिक संस्थांच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्याचप्रमाणे करोना संसर्गाची स्थिती, जगभरात सुरु असलेली छद्मयुद्धे (प्रॉक्सी वॉर), दहशतवाद आणि सध्याच्या अफगाणिस्तानच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघटनेवर अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात टिकून रहायचे असल्यास संयुक्त राष्ट्रांना सुधारणा करणेही अत्यंत आवश्यक असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
 
 
करोना संसर्गाने जागतिक अर्थव्यवस्थेतही बदलाची गरज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. जागतिक पुरवठा साखळीमध्ये बदल गरजेचा असून त्यासाठी भारताने आघाडी घेतली आहे. भारतातील नवोन्मेष संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरत आहे. मर्यादित साधनसंपत्ती असतानाही भारताने करोनाविरोधी लस संशोधन आणि उत्पादनात आघाडी घेतली आहे. करोनाची जगातील पहिली डिएनए लस भारताने विकसित केली असून १२ वर्षांपुढील लोकसंख्येत ती दिली जाणार आहे. आरएनए लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे तर नाकावाटे घेण्याच्या लशीवरही संशोधन भारतात संशोधन सुरू आहे. त्यामुळे जगातील सर्व लसउत्पादकांना भारतात येऊन उत्पादन करण्याचे निमंत्रण देत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@