नवी दिल्ली : “कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात अर्थव्यवस्थेचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने आश्वासक धोरणे जाहीर केली. उद्योगस्नेही व्यवस्था अधिक मजबूत केली. त्यामुळेच २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) २०.१ टक्क्यांवर गेला,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच ‘रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी व्यवसाय सुलभता’ या विषयावरील ‘वेबिनार’ला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, “कोरोना संसर्गाच्या गंभीर स्थितीमुळे देशाच्या विकासाचा वेग मंदावला होता. परंतु, सर्वच क्षेत्रांत सरकारच्या आश्वासक धोरणांमुळे, सर्व भागधारकांच्या वचनबद्धतेमुळे २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीत देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर २०.१ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. सध्या आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन्हींविषयी अतिशय आव्हानात्मक काळ आहे.
त्यामुळे उद्योगस्नेही, त्रासमुक्त असे पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने धोरणांची पुनर्रचना करून उद्योगांना पाठबळ देण्यात सरकार आघाडीवर आहे. देशातील सर्वांगीण आणि एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी. ‘गतिशक्ती’ योजनेचा राष्ट्रीय बृहत आराखडा १०० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ‘गतिशक्ती’ योजनेचा बृहत आराखडा राष्ट्रीय पायाभूत सुविधा कार्यक्रमाची रूपरेषा प्रदान करेल आणि रसद खर्च कमी करून पुरवठा साखळी सुधारत भारतीय उत्पादनांना अधिक स्पर्धात्मक बनवण्याचा उद्देश आहे. भारतातील महामार्ग क्षेत्र कामगिरीत आणि नवोन्मेषात आघाडीवर आहे आणि सरकारने खासगी विकासकांच्या स्वारस्याचे नूतनीकरण करून देशातील रस्ते बांधणीला गती देण्यासाठी अनेक प्रकल्प यशस्वीपणे आणले आहेत,” असे गडकरी यावेळी म्हणाले.