पाकिस्तान ते ‘चिनी’स्तान

24 Sep 2021 21:55:42
pakisatn_1  H x


२०२५ साली पाकिस्तान ‘चिनीस्तान’ होणार आहे. नुकतेच पाकिस्तानने चिनी अ‍ॅकॅडमी, अनुसंधान आणि बायोटेक्नोलॉजिकल फर्मसोबत एक करार केला. त्यानुसार ५० लाख चिनी कामगार पाकिस्तानमध्ये काम करणार आहेत. भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान २०२५ मध्ये सहजपणे म्हणूनच ‘चिनीस्तान’ होणार आहे. मात्र, याचे सोयरसुतक पाकिस्तानच्या सरकारला नाही की, प्रशासनालाही नाही. कारण, इमरान खान सरकार तर दुसर्‍या देशांनी दिलेल्या भेटवस्तू लपवण्यात व्यस्त आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इमरान खान यांनी ज्या ज्या देशात दौरा केला, तिथे त्यांना त्या त्या देशांनी काही ना काही भेटवस्तू दिल्या. त्यापैकी सौदीच्या राजकुमाराने सोन्याची एके-४७ बंदूक दिली, कुणी रत्नजडित सोन्याचे पेन भेट दिले, तर कुणी सोन्याचे कपलिंग, अंगठी. यावर पाकिस्तानच्या एका नागरिकाने तिथल्या माहितीच्या आधारे इमरान खान यांना काय काय भेटवस्तू मिळाल्या याविषयी अर्ज केला. मात्र, इमरान सरकारने याबद्दल देशाला माहिती देण्याचे चक्क नाकारले. म्हणूनच असा प्रश्न उपस्थित होतो की, देशाचे पंतप्रधान म्हणून मिळालेल्या भेटवस्तू इमरान यांना वैयक्तिक म्हणूनच ठेवायच्या आहेत का?


यावरून आठवले भारताचे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वैयक्तिक भेटवस्तूंचा लिलाव केला होता. त्यातून आलेले पैसे भारतीय जनतेच्या हितासाठी वापरले होते. पण, अर्थात कुठे मोदी आणि कुठे इमरान! असो. मुद्दा असा की, चीनने पाकिस्तानला ‘चिनीस्तान’ बनवायचा यशस्वी प्रयत्न सुरू केला असताना तेथील सरकार दुसर्‍या देशांनी दिलेल्या भेटवस्तू लपवण्यात व्यस्त आहे. याच पार्श्वभूमीवर एक विशेष घटना अशीही की, आशिया खंडात पाकिस्तानने चीनला पायघड्या घातल्या. मात्र, आफ्रिका खंडातील ‘रिपब्लिक ऑफ घाणा’ आणि ‘रिपब्लिक ऑफ काँगो’सारख्या देशांनी चीनने त्यांच्याकडे गुंतवलेल्या आर्थिक निवेशाला काढता पाय घ्यायला लावले आहे. या दोन्ही देशांनी म्हटले आहे की, आमच्या देशात गुंतवणूक करणारे देश आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले. मात्र, आम्हाला त्याचा फायदा झाला नाही. तसेच चीनचा व्याजदर जास्त असल्याने त्यामुळे देशाची आर्थिकता कोलमडते. त्यामुळे चीनने विकासाकरिता केेलेली गुंतवणूक मागे घ्यावी.


या दोन देशांनी घेतलेली भूमिका चीनसाठी मोठी धक्कादायक आहे. जे आफ्रिकेतील या दोन देशांना जमले, ते पाकिस्तानला जमले नाही. उलट बुडत्याचा पाय खोलात तशी पाकिस्तानची गत. त्यातच पाकिस्तानच्या जन्मापासूनची भूमिका म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर।’ त्यामुळे पाकिस्तान येणार्‍या काळातील आपल्या ‘चिनीस्तान’ या स्वरूपाबाबत काय भूमिका घेतो, याबाबत जगही फारसे उत्सुक नाही. मात्र, पाकिस्तान हा ‘चिनीस्तान’ बनल्यामुळे चीन कुरापती काढण्यात आणखी सशक्त होईल. ते तसे होऊ नये, अशीही जगाची इच्छा आहे. नाहीतर चीन म्हणजे आधीच मर्कट त्यात प्यायला दारू आणि त्यात त्याच्या हातात कोलीत. बाकी पाकिस्तान्यांना होऊ घातलेल्या ‘चिनीस्तान’बद्दल काही वाटत नाही, यातच त्या देशाचे दैन्य आहे, हे नक्की.


दुसरीकडे जगाच्या पाठीवर उद्योगक्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. त्यात भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट की, कृषी क्षेत्रात निर्यातदार म्हणून भारताने आपला दबादबा निर्माण केला आहे. भारताने कृषी क्षेत्रात चांगलाच आर्थिक नफा मिळवला आहे. कृषिप्रधान आणि ‘खेड्यांचा देश’ म्हणून ओळख असलेल्या भारताच्या या देदीप्यमान कारकिर्दीचे यश वाखाणण्याजोगे आहे, तर दुसरीकडे चीन आणि पाकिस्तानसंदर्भात मात्र फासे उलटे पडत आहेत. अर्थात, ‘पेराल तसे उगवेल.’ चीनची अतिसाम्राज्यवादाची वृत्ती काही लपलेली नाही. चीनने जगभरात गरीब देशांमध्ये आर्थिक निवेश गुंतवले आहेत. ही गुंतवणूक करताना आपण त्या देशाला विकासकामांसाठी मदत करत असल्याचा आव चीनने आणला आहे. त्याचा बळी आशिया खंडातील अनेक छोटी राष्ट्रे ठरली आहेत. चीनच्या विस्तारवादाला भुलली आणि त्याची मोठी किंमत या राष्ट्रांना भोगावी लागत आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडण्याचा ‘सीपेक’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या सगळ्यांचा परिपाक हा आहे की, २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये मोजून ५० लाख चिनी नागरिक काम करणार आहेत. पाकिस्तानचा जीव केवढा त्यात ५० लाख चिनी राहणार याचाच अर्थ २०२५ सालचा पाकिस्तान हा ‘चिनीस्तान’च होणार आहे.








Powered By Sangraha 9.0