मुंबई : कोकणावासियांचे बहुप्रतिक्षित सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. या विमानतळावर अलायन्स एअरची विमाने उडणार आहेत. ९ ऑक्टोबर पासून चिपी विमानतळावर नियमित सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ही विमानसेवा केंद्र सरकारच्या आरसीएस उडाण योजनेअंतर्गत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आता कोकणात विमानस्वारी उपलब्ध होणार आहे. अलायन्स एअर हे विमान हे ७० सीटर असणार आहे. एटीआर ७२ ६०० एअरक्राफ्ट मुंबई आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणार आहे.
उड्डाण सुरू झाल्यानंतर अलायन्स एअर ही देशातील पहिली देशांतर्गत वाहक असेल जी कोकण विभागातील ग्रीनफिल्ड विमानतळावरून उड्डाणे सुरू करेल. ग्रीनफिल्ड विमानतळाला व्यावसायिक कामकाज सुरू करण्यासाठी विमान सुरक्षा नियामक डीजीसीएकडून गेल्या आठवड्यात एरोड्रोम परवाना मिळाला. अलायन्स एअरने एका निवेदनात म्हटले आहे की, अलायन्स एअर ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्गसाठी दररोज थेट उड्डाणे सुरू करणार आहे. ही सेवा केंद्र सरकारद्वारे संचालित प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत सुरू केली जात आहे.