दिल्ली - रेस्टॉरंट मालकांनीही उघडपणे भारतीय कपड्यांना मागास म्हणून वर्णन करण्याचे काम सुरू केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो दिल्लीतील अंसल प्लाझामधील अक्विला रेस्टॉरंटचा आहे. तेथील एक कर्मचारी महिला पत्रकार अनिता चौधरी यांना सांगत आहेत की, साडी हा स्मार्ट पोशाख नसल्यामुळे ते त्यांना रेस्टाॅरंटमध्ये येण्यास परवानगी देऊ शकत नाहीत.
हा व्हिडिओ अनिता चौधरीने शेअर केला असून अशा क्षुल्लक मानसिकतेवर लोक टीका करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता या १९ सप्टेंबर रोजी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दिल्लीतील अक्विला रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. मात्र, साडीमध्ये पाहून त्यांना रेस्टाॅरंटमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली.. व्हिडिओमध्ये दिसणारे कर्मचारी आधी कपड्यांविषयी बोलले आणि नंतर त्यांच्या मुलीचे वय सांगून त्यांना थांबवू लागले. या घटनेच्या संदर्भात, अनिता या सोशल मीडियावर बोलल्या आहेत. अनितांनी एक सवाल केला आहे की, त्यांना सांगावे की जर साडी आधुनिक किंवा स्मार्ट पोशाख नसेल, तर कोणता ड्रेस घालायचा त्याला 'स्मार्ट आउटफिट' म्हटले जाईल.
विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये देखील दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये असा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी त्या महिलेने नेसलेल्या साडीमुळे वसंत कुंजच्या काइलिन आणि आयव्ही रेस्टॉरंटमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता. या महिला संगीता नाग, गुरुग्राममधील एका खासगी शाळेच्या प्राचार्या होत्या. ज्यांना रेस्टॉरंटचे कर्मचारी म्हणाले होते, "येथे पारंपरिक कपड्यांमध्ये येणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही."