सांस्कृतिक मंत्री रंगकर्मींसाठी काहीच करत नाहीत!

नाट्यगृहे सुरू करण्यावरुन कलाकारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

    दिनांक  22-Sep-2021 13:52:23
|

Uddhav _1  H x
 
मुंबई : कोरोना काळात बंद झालेल्या नाट्यगृहांना पुन्हा सुरू करण्याचा विसर राज्य सरकारला पडला आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मुंबईतील रंगकर्मी २७ सप्टेंबरला सकाळी ११.०० वाजता दादर, शिवाजी पार्क येथे पितृपक्ष श्राद्ध आणि पिंडदान विधी करणार आहेत, अशी माहिती एका परिपत्रकाद्वारे रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र, मुंबईतर्फे केली आहे. राज्यातील सांस्कृतिक मंत्रालय कलाकारांसाठी काहीही करत नसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
नाट्यगृहे सुरू करण्यासाठी तसेच रंगकर्मींनी केलेल्या मागण्यांसाठी ९ ऑगस्ट २०२१ क्रांतीदिनी अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही ‘जागर रंगकर्मींचा’ हे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत सांस्कृतिक मंत्री महोदयांनी आम्हाला भेटीला बोलावले व आमच्या मागण्यांना तत्वत: मान्यता दिली पण अद्याप त्या संबंधीचा लेखी, सरकारी अध्यादेश (G.R) काढलेला नाही, अशी चिंता महाराष्ट्रातील रंगकर्मींनी व्यक्त केली आहे.
 
 
 
'राज्यातील रंगकर्मींनी ३० ऑगस्ट २०२१ रोजी नाट्यगृह आणि चित्रपटगृह सरकारने सुरु करावी यासाठी नटराजाची महाआरती आयोजित केली होती. त्याची दखल घेऊन ‘नाट्यगृह ५ नोव्हेंबर पासून चालू होतील’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली पण मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय रंगकर्मींना मान्य नाही.', अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे.
 
 
 
‘राज्याचं सांस्कृतिक खातं आम्हां रंगकर्मींसाठी काहीही करीत नाही’, अशी ठाम समजूत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींची झाली आहे आणि यामुळे रंगकर्मींची बाजू सरकारकडे न मांडणारं, रंगकर्मींच्या कामी न येणारं सांस्कृतिक खाते तात्काळ बंद करावे ही मागणी जोर धरू लागली आहे. या सरकारमध्ये आपला कुणीही वाली नाही असा विचार जोर धरू लागला आहे. लोकरंजनातून समाजाचे प्रबोधन करणार्‍या कलावंताना आणि कलाप्रकारांना पूर्वीपासून लोकाश्रय आणि राजाश्रय मिळाला. मात्र सध्या हा राजाश्रय दुरापास्त झाला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
 
 
 
ज्ञात-अज्ञात अशा सर्व पितरांच्या ऋणांचे स्मरण पितृपंधरावड्यात केले जाते. त्यांच्यामुळे आपण आहोत, याची जाणीव ठेऊन हे स्मरण केले जाते. कलेची जोपासना करणार्‍या रंगकर्मींना कलेचा ठेवा आपल्या पूर्वजांकडून मिळाला आहे. असंख्य प्रतिभावान कलावंतानी त्यांच्या कलांनी आपली संस्कृती जपली, वाढवली. आजची परिस्थिती पाहून जे कलावंत आज हयात नाहीत त्यांनाही नक्कीच वेदना झाल्या असतील, अशी खंत रंगकर्मींची आहे.
 
 
 
त्यांच्या स्मृती जागवत कलेचा जागर पुन्हा सर्वत्र व्हावा यासाठी पितृपक्ष पंधरवड्यातील सोमवार २७ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्रातील रंगकर्मींनी आपापल्या जिल्ह्यात रंगकर्मी आंदोलनाचा भाग म्हणून ‘पितृस्मृती’ श्राद्धविधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. मुंबईतील रंगकर्मी २७ सप्टेंबरला सकाळी ११.०० वाजता दादर, शिवाजी पार्क येथे जमून पितृपक्ष श्राद्ध आणि पिंडदान विधी करणार आहेत, अशी माहिती एका परिपत्रकाद्वारे रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र, मुंबईतर्फे केली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.