अमेरिकेसोबतच्या जागतिक भागिदारीचा आढावा घेणार – पंतप्रधान

"क्वाड" शिखर परिषदेतही सहभागी होणार

    दिनांक  22-Sep-2021 16:01:46
|
modi_1  H x W:


पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : अमेरिका दौऱ्यामध्ये व्यापक जागतिक जागतिक भागिदारीचा आढावा घेणे, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत सामरिक सहकार्य मजबूत करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिकेस रवाना होण्यापूर्वी केले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून (२२ ते २५ सप्टेंबर) अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांनी आपल्या दौऱ्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, अमेरिकेसोबतच्या व्यापक जागतिक भागिदारीचा आढावा घेऊन ती अधिक मजबूत करण्यास भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे जागतिक महत्वाच्या प्रश्नांविषयीचे सहकार्य दृढ करणे आणि जपान व ऑस्ट्रेलियासोबत सामरिक सहकार्य बळकट करण्यावर विशेष भर दौऱ्यामध्ये दिला जाणार आहे.
 
 
दौऱ्यादरम्यान अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला जाईल. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आम्ही आपली मते मांडू. विशेषत: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्याच्या संधींबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचीही भेट घेणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
त्याचप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह पहिल्या क्वाड लीडर्स शिखर परिषदेत मी व्यक्तिशः सहभागी होणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, यंदाच्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या आभासी शिखर परिषदेच्या निष्कर्षांचा आढावा घेण्याची आणि हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आमच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित भविष्यातील सहभागाला प्राधान्य देण्याची संधी या शिखर परिषदेच्या निमित्ताने मिळणार आहे.
 
 
यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सुगा यांचीही स्वतंत्रपणे भेट पंतप्रधान मोदी घेणार आहेत. दोन्ही देशांसोबतच्या भारताच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणे आणि प्रादेशिक सहकार्यावर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे दौऱ्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेस संबोधित करणार आहेत. त्यावेळी जागतिक करोना संसर्ग, दहशतवादाचा सामना करण्याची गरज, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांसह जागतिक स्तरावरील आव्हानांवर ते भाष्य करणार आहेत.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.