समर्थ म्हणतात की, हे निंदक उगीच बाष्कळ बडबड करीत आहेत, नसत्या उठाठेवी करत आहेत, असे तुम्हाला वाटते ना, तसेच या निंदकांनी केेलेली निंदा वृथा, विनाकारण आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या निंदेचा कशाला विचार करता, ती निंदा मनावर घेण्याचे तुम्हाला कारण नाही. निंदकांच्या निंदेमुळे आपल्या कार्यात विक्षेप येऊ देऊ नये. समर्थ पुढे सांगतात की, तुमचा तुमच्यावर विश्वास नाही. तुमची देहबुद्धी गेली नाही, मग इतरांना दोष देण्यात अर्थ नाही.
निंदा, स्तुती हे माणसाच्या जीवनात येणारे रोजचे अनुभव आहेत. ‘निंदा’ या विषयावर अनेकांनी लिहिले आहे. निंदा करणारे निंदक, निंदा सहन करणारे सहनशील, तसेच निंदा सहन न झाल्याने क्रोधित होणारे किंवा दु:खी होणारे अशी माणसे समाजात पूर्वी होती, आज आहेत आणि यापुढेही राहणार आहेत, तेव्हा निंदेबद्दल विविध दृष्टिकोन समजून घेऊन समर्थ ‘निंदा’ या विषयावर काय म्हणतात, ते आपण पाहून भगवद्गीतेच्या १२ व्या अध्यायात श्लोक क्र.१३ ते २० यात भगवंतानी आपल्याला प्रिय असलेल्या भक्तांची लक्षणे सांगितली आहेत. त्यात सांगितलेली लक्षणे अंगी बाणणे ही एक कठोर साधना आहे. त्यातील गुण आत्मसात करून त्याप्रमाणे वागणे हीसुद्धा कठोर थोर तपस्या आहे, त्यातील एका श्लोकात म्हटले आहे की, ‘निंदा-स्तुती’ दोन्ही सारखीच मानणारा भक्त भगवंतास प्रिय असतो. तो श्लोकार्थ असा आहे-
तुल्य निन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचि्त।
याचा अर्थ निंदा व स्तुती दोन्ही समान मानणारा, वाणीचे संयमन करणारा मौनी मननशील आणि जे प्राप्त होईल, त्यात समाधान मानणारा भक्त परमात्म्याला आवडतो. तरीही सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाला इतरांनी त्याची केलेली स्तुती आवडते. पण, कोणी निंदा केली, तर ते मात्र कोणालाही आवडत नाही. इतकेच नव्हे, तर निंदा सहन न झाल्याने त्याचा मनावरचा ताबा सुटतो. प्रत्येकाला वाटत असते की, माझे मत बरोबर आहे. या अहंभावाला निंदेमुळे प्रतिबंध होतो. त्यातून क्रोध उत्पन्न होतो. त्या क्रोधाचे पर्यवसान पुढे कसे होते, हे गीतेत छान सांगितले आहे. क्रोधातून संमोह म्हणजे अविवेकीभाव उत्पन्न होतो. खरे-खोटे समजेनासे होते. संमोहाने स्मृतिभ्रंश होतो, स्मृती भ्रष्ट झाली की, बुद्धी काम करीत नाही आणि बुद्धिनाश म्हणजे सर्वनाशच! यासाठी निंदेकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय करावी, निंदा करणे हा निंदकाचा स्वभाव असतो. समर्थांनी ‘दासबोधा’त म्हटले आहे की, ‘निंदक पाहे उणी संधी।’ म्हणजे निंदक तुमच्यातील उणिवा शोधून संधी मिळेल तेव्हा तुमची निंदा करतो, त्यात त्याला आनंद असतो. आपल्या उणिवा आपल्याला समजत नाहीत किंवा आपल्याला ते मान्य नसते. उणिवा शोधण्याचे काम निंदक करीत असतो, म्हणजे एक अर्थाने तो आपल्याला मदत करीत असतो. मानसशास्त्र असे सांगते की, आपल्यातील उणीव, दोष, कमीपणा याची मनाला जाणीव झाली की, मन ते सुधारण्याचा प्रयत्न करते. निंदकांनी केेलेल्या टीकेमुळे आपल्यात सुधारणा घडून येते, असा सकारात्मक दृष्टिकोन आपण बाळगला तर निंदकाचा राग येण्याचे कारण नाही. काही वेळा समाजात वावरताना असाही अनुभव येतो की, तुमच्या वागण्या-बोलण्यात काहीही उणीव किंवा दोष नसताना निंदक अकारण तुमची निंदा करीत सुटतात. ही निंदा बहुतेक तुमच्या पाठीमागे केली जाते. अशावेळी तुमच्यावर टीका करताना, तुमची निंदा करताना, ती केवळ द्वेष-मत्सरातून केलेली असू शकते. तुमची प्रगती, चांगुलपणा निंदकांना सहन होत नसावा, त्यामुळे काहीतरी क्षुल्लक कारणावरून ते तुमची निंदा करण्याची संधी सोडत नाहीत. अकारण निंदा हे तुमच्या प्रगतीचे द्योतक आहे, असे समजून तिकडे दुर्लक्ष करावे. यासाठी संत तुकारामबाबा म्हणतात की, ‘निंदकाचे घर असावे शेजारी.’ हा निंदक शेजारीच असल्याने रोज त्याची भेट होऊन त्याच्या निंदेतून आपले दोष समजतील. परंतु, सर्वसाधारण माणसाला निंदक समोर नको असतो. त्याला स्तुती करणार्यांचा सहवास प्रिय असतो. स्तुती ऐकल्याने आपला ‘स्व’ सुखावतो, अर्थात केलेली स्तुती तुमच्यातील चांगल्या गुणांसाठी असेल, तर त्यातून प्रोत्साहन मिळेल, तुमची उमेद वाढेल. पण, काही जण तुमची अकारण स्तुती करून तुमच्या अंगी नसलेले गुण तुमच्या ठिकाणी दाखवून तुमची वाहवा करतात. असे असेल तर निश्चित समजावे की, त्या स्तुतिपाठकांच्या मनात काहीतरी स्वार्थी हेतू आहे. अकारण स्तुती हानिकारक असते, तेव्हा खोटी स्तुती ऐकण्यापेक्षा टीका करणारा निंदक परवडला, निदान तो आपले दोष दाखवून आपण सुधारण्याची संधी मिळवून देतो. सर्वसाधारणपणे आपण असे समजतो की, हे निंदक उगीच बाष्कळपणा करतात. हे दुसर्याची उठाठेव का करतात? या निंदकांत काही अर्थ नाही. अशावेळी समर्थ सांगतात की -
जरी जनें बाष्कळ म्हणावी।
नसतीच करिती उठाठेवी।
तरी मिथ्या जाणोनि जीवीं।
आपण कासया धरावी॥ (जुना दासबोध)
समर्थ म्हणतात की, हे निंदक उगीच बाष्कळ बडबड करीत आहेत, नसत्या उठाठेवी करत आहेत, असे तुम्हाला वाटते ना, तसेच या निंदकांनी केेलेली निंदा वृथा, विनाकारण आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या निंदेचा कशाला विचार करता, ती निंदा मनावर घेण्याचे तुम्हाला कारण नाही. निंदकांच्या निंदेमुळे आपल्या कार्यात विक्षेप येऊ देऊ नये. समर्थ पुढे सांगतात की, तुमचा तुमच्यावर विश्वास नाही. तुमची देहबुद्धी गेली नाही, मग इतरांना दोष देण्यात अर्थ नाही.
तुझे ठायीं नाही विश्वास।
आणि जनांस ठेविसी गुणदोष।
वादविवाद करुनि सावकाश।
देहबुद्धी धरिसी॥ (जु.दा.)
देहबुद्धी कमी केली तर निंदेने दु:ख कसे होईल? समर्थांच्या मते निंदा ही परमार्थासाठी उपकारक आहे. लोकांना असे वाटत असते की, इतरांनी मला म्हणजे माझ्या देहाला मान द्यावा. सर्वांनी मला नमस्कार केला पाहिजे, जर कोणी अशा माणसाला नमस्कार केला नाही, तर त्याचा त्याला राग येतो. ही माणसे स्वत:ला ‘पारमार्थिक’ म्हणवतात. नुसते तोंडाने म्हणावे की, मी ब्रह्म आहे आणि या देहाची कोणी निंदा केली तर त्याचा राग यावा हे विसंगत नाही का? देहाची कोणी निंदा केली, तर काय यांचा परमार्थ बुडणार आहे का? देहनिंदेने राग आला तर त्याचा विवेक मावळला असे समजावे. समर्थ सांगतात-
जरी देह हा निंदिला।
तरी काय परमार्थ बुडाला?
जवळून विवेकाला। देशोधडी केलें॥ (जु.दा.)
निंदा ऐकून जर तुम्हाला राग आला, फार वाईट वाटले, चेहर्यावरचा आनंद जाऊन तो दु:खी दिसू लागला, तर ती देहबुद्धी नाही का? असे समर्थ विचारतात. खर्या पारमार्थिकाला स्तुतीने आनंद होणार नाही आणि निंदेचे दु:ख वाटणार नाही.
स्तुती होता आनंदला। तो निंदा होता रडला।
या दोहीमध्ये न सापडला। तोचि धन्य॥
देहातील झालेल्या माणसाला निंदा-स्तुती दोन्ही सारख्याच असतात. निंदा करणे हा या लोकांचा स्वभाव आहे. राम प्रत्यक्ष परब्रह्म आहे. ज्याचे वर्णन वेदही करू शकत नाहीत, अशा रामालाही निंदकांनी सोडले नाही. मग त्यापुढे आपण क:पदार्थ आहोत, तेव्हा आपली निंदा झाली, तर वाईट वाटण्याचे कारण नाही. समर्थ सांगतात-
जनीं निंदिता सूटला कोण आहे।
जना सर्वदा सर्व निंदून राहे।
जया वर्णितां शीणली वेदवाणी।
जनें निंदिला राम कोदंडपाणी॥
आपल्या ठिकाणी अहंकार आणि देहबुद्धी असल्याने निंदकाच्या निंदेला आपण महत्त्व देतो. निंदा ऐकून वाईट वाटते किंवा निंदकाचा राग येतो. निंदक कोणालाही सोडत नाहीत, असे जरी असले तरी समर्थांनी जाता-जाता निंदकांना फटकारले आहे. समर्थ म्हणतात, हे निंदक मत्सरी आहेत. पापरूपी आहेत. ते अतिकर्कशपणे चांगल्या माणसांबद्दल व्यर्थ बरळत आहेत. तेव्हा-
तया वाजटा मर्कटा कोण पुसे।
सदा सर्वदा भूंकती श्वान जैसे।
भुंकणे हा श्वानाचा स्वभावधर्म आहे, एक भुंकला की आपण का भुंकतो हे न समजता इतर श्वानही भुंकू लागतात. तीच गत निंदकांची असते. पण, निंदकांच्या अशा भुंकण्याला, बरळण्याला कोण किंमत देतो. आपण ते मनावर घेऊ नये. त्यांच्या माकडचाळ्यांना कोणी विचारत नाही.
- सुरेश जाखडी