जहन्नुम-ए-तालिबान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2021   
Total Views |

taliban_1  H x
 
तालिबानच्या अनैतिक अफगाण कब्जाला एक महिना उलटून गेला, तरी अपेक्षेप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये अद्याप काहीही स्थिरस्थावर नाही. नामधारी सरकार सत्तेत आल्यानंतरही अफगाणिस्तान अजूनही अराजकाच्या गर्तेत तडफडत आहे आणि तेथील अनिश्चितता आणि अशांततेला पूर्णविराम कधी लागेल, याचे भाकीत वर्तविणे आज तर अगदी कर्मकठीणच. खरंतर अफगाणिस्तानमधून नुकत्याच समोर आलेल्या तीन घटना आणि पाकिस्तानातील यासंबंधीच्या दोन घटनांवर नजर टाकली असता, अफगाणिस्तानातील अस्वस्थता कशी दिवसेंदिवस वेगाने धगधगते आहे, याची कल्पना यावी.
 
अफगाणिस्तानातून आलेल्या तीन बातम्यांवर सर्वप्रथम एक नजर टाकूया. बातमी क्र. १ - ‘इस्लामिक स्टेट’ अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तामधील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली . बातमी क्र. २ - अफगाणिस्तानातील महिला कर्मचार्‍यांनी घरीच बसावे, असे काबूलच्या महापौरांचे आदेश. बातमी क्र. ३ - अफगाणिस्तानातील विदेश मंत्रालयातील ८० टक्के कर्मचार्‍यांनी देश सोडून केलेले पलायन. तसेच आधी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानातून आलेल्या दोन बातम्याही तितक्यात चिंताजनक म्हणाव्या लागतील. एक म्हणजे, पाकिस्तानातील एका मदरशावर तालिबानी झेंडा फडकावण्याचा झालेला प्रकार आणि दुसरे म्हणजे, अमेरिकेने मागे सोडलेल्या शस्त्रास्त्रांनी भरून पाककडे निघालेल्या एका ट्रकचा तालिबानने घेतलेला ताबा. आता यांसारख्या काही निवडक घटनांचा एकत्रित अन्वयार्थ लावायचा झाल्यास हे तर अगदी सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते की, अफगाणिस्तानमध्ये कुठल्याच स्तरावर काहीही आलबेल नाही.
आता तालिबानसारख्या दहशतवादी गटाने संपूर्ण अफगाणिस्तानचा घास घेतल्यानंतरही या देशात दहशतवादी हल्ल्यांचे प्रयोजन ते काय, असा प्रश्न पडावा. कारण, तालिबानचे सरकार म्हणजेच इस्लामिक ‘शरिया’ कायद्यानुसार चालणारे शासन. मग आता तिथे कुठल्याही परदेशी शक्तीविना इस्लामिक राजवट असताना ‘इसिस’कडून साखळी बॉम्बस्फोटांचे नेमके औचित्य ते काय? याचे उत्तर म्हणजे पूर्वीपासूनच तालिबान आणि ‘इसिस’चा छत्तीसचा आकडा! कारण, तालिबानचे लक्ष्य हे केवळ अफगाणिस्तानची सत्ता काबीज करण्याचे होते, तर ‘इसिस’ला हवा आहे तो वैश्विक जिहाद! म्हणूनच इस्लामिक इराक, सीरिया उद्ध्वस्त केल्यानंतर आता ‘इसिस’ने त्यांचा मोर्चा अफगाणिस्तानकडे वळवलेला दिसतो. तालिबान सरकार सत्तेत आल्यानंतरचा ‘इसिस’चा हा पहिला दहशतवादी हल्ला होता, याचाच अर्थ आगामी काळातही अशाप्रकारच्या हल्ल्यांनी अफगाणिस्तान पुन्हा हादरू शकते. म्हणजेच, आता अफगाणिस्तानातील सत्तासंघर्षात तालिबान आणि ‘इसिस’ या दोन्ही इस्लामिक कट्टरतावादी संघटनांचा ‘जिहाद’च्या नावाखाली जीवे मारण्याचा रक्तरंजित खुनशी खेळ खेळला जाईल.
 
 
त्यातच केवळ ‘इसिस’ नाही, तर ‘इसिस-के’, सत्तेत वाटेकरी असलेले ‘हक्कानी नेटवर्क’ आणि अन्य दहशतवादी संघटनाही तालिबानला प्रभावहीन करून अफगाणिस्तानवर आपले आधिपत्य सिद्ध करण्यासाठी अतिशय सक्रिय झालेल्या दिसतात. त्यामुळे परदेशी शक्तींपेक्षा इस्लामिक दावेदारांकडूनच तालिबानच्या गादीला सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे तालिबान या इस्लामिक शक्तींना बंदुकीतून रोखणार की बातचित करून, त्यावरही या देशाचे, येथील जनतेचे भवितव्य अवलंबून आहेच. त्याचबरोबर देशांतर्गत पातळीवर महिलांवर नवनवीन निर्बंध लादले जात असताना, काबूलच्या महापौरांनी तर महिला कर्मचार्‍यांना थेट घरी बसण्याचे आदेश दिले. त्यामुळे कदाचित काही दिवसांनी अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर आधीच बुरख्यात नखशिखांत लपवलेल्या महिला रस्त्यावरही दिसेनाशा होतील. दुसरीकडे तालिबान इतर देशांनी त्यांच्या सरकारला मान्यता द्यावी म्हणून प्रयत्नशील असतानाच, त्यांच्या विदेश मंत्रालयातील ८० टक्के कर्मचार्‍यांनी पलायन केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही तालिबानप्रणित अफगाणिस्तानसाठी आगामी काळ अत्यंत खडतर असेल, हे वेगळे सांगायला नको.दुसरीकडे पाकिस्तानातून आलेल्या दोन बातम्यांनीही पाकिस्तानचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. एक तर पाकचा अमेरिकन शस्त्रास्त्रांवर डल्ला मारायचा कुटील डाव आणि तालिबानसाठी पाकिस्तानातील काही गटांत वाढीस लागणारी सहानुभूती. त्यामुळे अफगाणिस्तानातील ‘जहन्नुम-ए-तालिबान’मुळे आधीच अंधकारमय या देशाचे भविष्य आणखीन काळोखात ढकलले गेले आहे, हे नक्की!
 
 


 
 
 
@@AUTHORINFO_V1@@