बारमालकांकडील वसूलीचे पैसे अनिल देशमुखांच्या ट्रस्टमध्ये; वाझेचा मोठा खुलासा

17 Sep 2021 17:09:58
sachin vaze_1  
मुंबई - मुंबई पोलिसांचे माजी एपीआय सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांच्या सांगण्यावरून वसुली केल्याचे वाजे यांनी म्हटले आहे. वाजे यांनी निवेदनात उघड केले की, देशमुख यांनी त्यांना बार आणि हॉटेल मालकांकडून पैसे उकळण्यास सांगितले होते.
 
 
वाझेने देशमुखांवर असेही आरोप केले आहेत की, माजी मंत्री हे हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये निर्देश देत असत. परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव सांगून, वाझे यांनी दोन मंत्र्यांवर आरोप केला की, त्यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीच्या आदेशांना परवानगी देण्यासाठी दहा पोलीस उपायुक्तांकडून (डीसीपी) ४० कोटी रुपये गोळा केले. सचिन वाजे यांनी ईडीसमोर दिलेल्या निवेदनामध्ये वर्ष २०२० मध्ये मुंबईतील १० डीसीपींच्या बदलीबाबत खुलासा केला आणि सांगितले की, त्यावेळी महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी पोस्टिंगसाठी ४० कोटी घेतले होते. ईडीने सचिन वाझे यांना मुंबईत बदली पोस्टिंगबद्दल माहिती आहे का ?, अशी विचारणा केली होती. त्यावर सचिन वाझे म्हणाले की, जुलै २०२० मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १० डीसीपींच्या बदल्यांचे आदेश दिले होते. ज्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब खूश नव्हते आणि त्यांना आदेश मागे घेण्यास सांगितले.
 
 
 
 
वाझे पुढे म्हणाले, “मला कळले की त्या पोलीस अधिकाऱ्यांकडून ४० कोटी रुपये घेतले गेले, त्यापैकी २० कोटी अनिल देशमुख यांनी त्यांचे वैयक्तिक सचिव संजीव पालांडे यांच्याकडून आणि २० कोटी अनिल परब यांनी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून घेतले." वाजे यांनी सांगितले की, ते १६ जून २०२० रोजी सह्याद्री अतिथीगृहात अनिल देशमुख यांना भेटले. जेथे माजी गृहमंत्र्यांनी त्यांना सांगितले की, एका चांगल्या प्रकरणावर आपण एकत्र काम करु. यानंतर अनिल देशमुख वाझे यांच्याकडून अनेक प्रकरणांची माहिती जाणून घेत असत. ईडीच्या आरोपपत्रात आरोप करण्यात आला आहे की देशमुख यांना ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून सुमारे ४.७० कोटी रुपये मिळाले आणि हे पैसे देशमुख कुटुंबीयांनी व्यवस्थापित केलेल्या 'श्री साई शिक्षण संस्था' ट्रस्टला दान केले. सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने देशमुख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तपास सुरू केला. परम बीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर सीबीआयने हा गुन्हा दाखल केला होता.
Powered By Sangraha 9.0