अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; ईडी,सीबीआयनंतर आता घरावर इनकम टॅक्सचा छापा

17 Sep 2021 14:42:58
anil deshmukh_1 &nbs



नागपूर - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये अजून वाढ होणार असल्याची शक्यता आहे. कारण, ईडी आणि सीबीआयानंतर आता आयकर विभागाने देशमुखांच्या घरांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी ११.३० च्या दरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशमुखांच्या नागपूर येथील घराची झाडाझडती घेतली.
 
 
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील अडचणी कमी होण्याची चिन्ह नाहीत. आज आयकर विभागाने देशमुखांच्या नागपुरामधील काटोल, मुंबईतील ज्ञानेश्वरी आणि NIT कॉलेजवर छापा टाकून झाडाझडती केली. याआधी अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडी आणि सीबीआयाने दोन वेळा धाडी टाकल्या होत्या. अनिल देशुख यांना आतापर्यंत ईडीने चार वेळा समन्स बजावलं आहे. पण अनिल देशमुख एकदाही ईडीसमोर चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. याआधी २५ जून, २६ जून ५ जुलै आणि २ ऑगस्टला ईडीने समन्स बजावलं होतं.
 
 
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. याप्रकरणी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. सचिन वाझे आणि अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांना देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबिर सिंह यांनी या पत्रात केला होता.मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये घेतले तरी महिन्याला ४० ते ५० कोटी वसूल होतील, असा आरोप सिंह यांनी या पत्रात केला होता. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Powered By Sangraha 9.0