‘कन्फ्युशियस’ आणि ‘इस्लाम’च्या युतीमुळे संस्कृती संघर्ष – सीडीएस जनरल बिपीन रावत

17 Sep 2021 13:55:35
rawat_1  H x W:


जनरल रावत यांचे अफगाणिस्तानवर प्रथमच थेट भाष्य
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पाश्चात्त्य जगताचा विरोध करण्यासाठी ‘कन्फ्युशियस’ आणि ‘इस्लाम’ हे एकमेकांशी युती करू शकतात. त्यामुळे संस्कृती संघर्ष होण्याची शक्यता असल्याचे मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी नुकतेच केले. अफगाणिस्तामध्ये चीनची भूमिका याविषयी एका कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 
सीडीएस जनरल रावत यांनी आपल्या संबोधनात अमेरिकी राज्यशास्त्रज्ञ सॅम्युअल हटिंग्टन यांच्या ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’ या संकल्पनेचा संदर्भ दिला. ते म्हणाले, असे घडेल अथवा नाही, हे येणारा काळच स्पष्ट करेल. मात्र, सध्या सिनीक (कन्फ्युशिअस) आणि इस्लामी संस्कृतीमध्ये एकप्रकारची संयुक्तता पहायला मिळत आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीचा सामना करण्यासाठी ‘कन्फ्युशियस’ आणि ‘इस्लाम’ हे परस्परांशी युती करण्याची शक्यता दिसते. चीन सध्या इराण आणि तुर्कीसोबत मैत्री करून अफगाणिस्तानात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे लवकरच चीनचा अफगाणिस्तानात प्रवेश झालेला असेल. जगाच्या कल्पनेपेक्षाही वेगाने चीनचा उदय झाला आहे. त्यामुळे तालिबान नियंत्रित अफगाणिस्तानात घडणाऱ्या घडामोडींविषयी भारताने वेट अँड वॉचचे धोरण ठेवले आहे. भविष्यात काय होईल, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, कदाचित आतापर्यंत कल्पनाही न केलेले बदल अफगाणिस्तानात होऊ शकतात; अशी शक्यताही जनरल रावत यांनी व्यक्त केली.
 
 
पाकिस्तानसारखा कमकुवत देश भारताला नेहमीच छद्म युद्धामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सीडीएस जनरल रावत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मात्र, खरे तर पाकिस्तान आमच्या पूर्वेकडील शत्रूच्या (चीन) हातातील बाहुले आहेत. दक्षिण चिनी समुद्रात चीनने आक्रमकता दाखविली आहे. त्यामुळे थेट आक्रमकता अथवा तंत्रज्ञानाचा वापर, यासाठी भारताला सज्ज राहणे आवश्यक आहे. त्यामुळेच भारताने आता आपल्या सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्रांसाठी रॉकेट फोर्सच्या निर्मितीकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल यांच्यामध्येही समन्वय निर्माण केला जात आहे, असेही जनरल रावत यांनी यावेळी नमूद केले.
 
 
यापुढे युद्धात तंत्रज्ञान केंद्रस्थानी राहणार
 
 
वाढत्या चिनी आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर भारताला युद्धामध्ये तंत्रज्ञानाला सर्वाधिक महत्व द्यावे लागणार आहे. कारण, यापुढील युद्धे ही पारंपरिक पद्धथीने लढली जाणार नाहीत. शत्रू यापुढे सामरिक जाळे, उर्जा प्रकल्प, बँकिंग, वाहतूक आणि दूरसंचार व्यवस्थेस लक्ष्य करण्याची सर्वाधिक क्षमता आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0