एका दिवसात २ कोटी लसीकरणाचा टप्पा पार

17 Sep 2021 20:00:24

vaccination_1  
नवी दिल्ली : १७ सप्टेंबर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. याचदिवशी भारतीयांनी एका अनोखा आणि सकारात्मक विक्रम नोंदवला आहे. आजच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी फक्त ९ तासांत देशातील २ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले. अंदाजे प्रत्येक सेकंदला ५२७ पेक्षा जास्त तर एका तासाला अंदाजे १९ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. तर, रात्री ८ वाजेपर्यंत अंदाजे २ कोटी २३ लाखहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. अशी कामगिरी करत भारताने लसीकरणात जागतिक विक्रम केला असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.
 
 
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे ७७.७७ कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले आहे. विशेष म्हणजे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या लसीचे ६.१७ कोटींपेक्षा जास्त डोस आहेत. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची गती वाढली असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी २७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी देशात एक कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली होती. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी देशातील लसीकरण मोहिमेला गती देण्याचे आवाहन केले होते.
 
Powered By Sangraha 9.0